‘जत्रा शासकीय योजनांची-सर्व सामान्यांच्या विकासाची’ अभियान प्रभावीपणे राबवा! जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ; पूर्वतयारी आढावा बैठकीत दिल्या अधिकार्यांना सूचना
नायक वृत्तसेवा, नगर
शासकीय योजना लोकाभिमुख करुन त्यांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी ‘जत्रा शासकीय योजनांची-सर्व सामान्यांच्या विकासाची’ हे अभियान 15 एप्रिल ते 15 जून 2023 या कालावधीत राबविण्याचे शासनाने ठरविले आहे. त्या अनुषंगाने आपल्या जिल्ह्यात हे अभियान प्रभावीपणे राबवून अभियानांतर्गत विविध योजनांच्या माध्यमातून 75 हजार लाभार्थ्यांना योजनांचा थेट लाभ द्यावा, अशी सूचना जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी सर्व विभागप्रमुखांना दिल्या आहेत.
‘जत्रा शासकीय योजनांची-सर्व सामान्यांच्या विकासाची’ या अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पूर्वतयारी आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील, उपजिल्हाधिकारी क्षीरसागर यांच्यासह तहसीलदार व सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. प्रारंभी मुख्यमंत्री सचिवालयाच्या जनकल्याण कक्षाच्या अधिकार्यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे मार्गदर्शन केले. नियोजन विभागामाध्ये शासन निर्णयान्वये जत्रा शासकीय योजनांची-सर्व सामान्यांच्या विकासाची असे हे अभियान सर्व जिल्ह्यात एकाच कालावधीत राबविण्यात येत असून त्याचे समन्वयन मुख्यमंत्री सचिवालयाच्या जनकल्याण कक्षामार्फत करण्यात येणार आहे. अभियानाच्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर जनकल्याण कक्ष देखील स्थापन करण्यात येणार आहे.
या अभियानात नागरिकांना, शासकीय योजनांशी निगडीत कार्यालयांचे प्रतिनिधी व विविध दस्तऐवज उपलब्ध करून देणारे अधिकारी व कर्मचारी एका छताखाली एकत्र येऊन विविध योजनांचे लाभ देतील. जिल्हाधिकारी हे अभियानाचे जिल्हाप्रमुख असतील व इतर सर्व विभाग हे जिल्हाधिकार्यांशी समन्वय ठेऊन काम करतील. या उपक्रमाची पूर्वतयारी 15 एप्रिल, 2023 ते 15 मे, 2023 या कालावधीत करण्यात येईल. या कालावधीत नागरिकांना विविध विभागांच्या योजनांची माहिती पोहचविणे, प्रस्तावित लाभार्थ्यांची यादी तयार करणे तसेच त्यांच्याकडून अर्ज भरुन घेण्यात येतील. प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान 75 हजार लाभार्थ्यांना थेट लाभ देण्याचे उद्दिष्ट असेल. लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी जिल्हास्तरावर / तालुका स्तरावर कार्यक्रमाचे आयोजनही केले जाणार आहे.
15 जून 2023 पर्यंत चालणारे हे अभियान लोकचळवळ म्हणून राबविले गेले पाहिजे. यासाठी सर्वांनी सांघिक प्रयत्न करुन अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व विभागप्रमुखांनी उत्तम नियोजन करावे. आपला जिल्हा मोठा असल्यामुळे सुमारे दीड लाख लाभार्थ्यांना लाभ देण्याचे उद्दिष्ट या अभियानातंर्गत जिल्ह्याने ठेवले आहे. योजनानिहाय लाभार्थ्यांची माहिती विहीत नमुन्यात भरुन द्यावी. या अभियानाचा आढावा नियमितपणे घेतला जाईल. त्यामुळे विभागप्रमुखांनी जबाबदारीने व दक्षतेने काम करुन जत्रा शासकीय योजनांची-सर्व सामान्यांच्या विकासाची हे अभियान नियोजनबद्ध राबवून यशस्वी करावे, असे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी सांगितले.