कुप्रसिद्ध नयन तांदळे टोळी दहा दिवसांच्या कोठडीत! श्रीरामपूरचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके करणार सर्व गुन्ह्यांची उकल..
नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
मालमत्ता गुन्ह्यांमध्ये जिल्हाभरात दहशत माजवणार्या नयन तांदळे टोळीवर पारनेर तालुक्यातील सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर आता या टोळीवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे. अहमदनगरच्या विशेष मोक्का न्यायालयाने तांदळे टोळीतील कुख्यात चौघा आरोपींना दहा दिवसांसाठी पोलीस कोठडीत पाठवले आहे. या प्रकरणाचा तपास श्रीरामपूरचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्याकडे देण्यात आला असून पुढील दहा दिवसांत ते या आरोपींकडून कोणकोणते गुन्हे कबुल करुन घेतात याकडे अवघ्या जिल्ह्याचे लक्ष केंद्रीत झाले आहे.
पुणे येथील निवासी असलेल्या अक्षय चखाले यांच्या फिर्यादीवरुन पारनेर तालुक्यातील सुपा पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाचा तपास सुरु असतांना दाखल गुन्हा तांदळे टोळीने केल्याचे समोर आल्यानंतर या टोळीतील नयन राजेंद्र तांदळे, विठ्ठल भाऊराव साळवे, शाहुल अशोक पवार व अमोल छगन पोटे या चौघांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या चौकशीतून या टोळीने सुपा आणि तोफखाना (अहमदनगर) पोलीस ठाण्याच्या हद्दित जवळपास 20 गुन्हे केल्याचे समोर आले.
या टोळीतील सदस्य कोणताही कामधंदा न करता संघटीतपणे राहून लोकांना धमकावणे, हिंसाचार करणे, धमकी देणे, धाक निर्माण करुन आर्थिक लुट करणे, जबरदस्तीने जबरी चोर्या व दरोडे घालून दहशत निर्माण करणे यासारखे गुन्हे करीत असल्याचेही तपासातून समोर आले. सदर टोळीच्या गुन्ह्यांची व्याप्ती लक्षात घेवून पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर अधीक्षक सौरभ अग्रवाल व उपअधीक्षक अजित पाटील यांनी सदर टोळीवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई व्हावी यासाठी नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे प्रस्ताव सादर केला होता.
या प्रस्तावाला गेल्या आठवड्यात (ता.21) मंजूरी मिळाल्यानंतर अहमदनगर शहर उपअधीक्षकपदी असतांना भरीव कामगिरी बजावणार्या व सध्या श्रीरामपूर उपअधीक्षकपदी असलेल्या संदीप मिटके यांच्यावर नयन तांदळे टोळीचा तपास वर्ग करण्यात आला. मिटके यांनी अहमदनगरमधील आपल्या कारकीर्दीत तेथील गुन्हेगारीचा बिमोड करण्यासह समाजात पोलिसांविषयी आदर निर्माण करण्याच्या दृष्टीने भरीव काम केले होते. त्यातून अहमदनगर व परिसरातील गुन्हेगारांचा इतिहासही त्यांना ज्ञात असल्याने तांदळे टोळीचे कारनामे समोर आणण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुखांनी या टोळीच्या गुन्ह्यांची उकल करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविली.
त्यानुसार उपअधीक्षक मिटके यांनी वरील चारही आरोपींना आज अहमदनगरच्या विशेष मोक्क न्यायालयासमोर हजर केले. यावेळी त्यांनी चारही आरोपींना 14 दिवसांसाठी पोलीस कोठडीत पाइवण्याची विनंती केली. त्याला आरोपीच्यावतीने अॅड.आवारे, अॅड.दांगट, अॅड.श्रीमती साबळे यांनी जोरदार विरोध केला. मात्र मिटके यांच्यासह सरकार पक्षाकडून अॅड.श्रीमती कापसेयांनी जोरदार युक्तिवाद करुन या टोळीची दहशत आणि त्यांच्यापासून समाजाला असलेला धोका, दरोडे घालण्याची त्यांची पद्धत अशा वेगवेगह्या पैलूंवर न्यायालयाचे लक्ष केंद्रीत केले. त्यामुळे न्यायालयाने त्यांचा युक्तिवाद ग्राह्य धरुन नयन तांदळे टोळीतील चारही आरोपींना दहा दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठविले.
दक्षिणेतील अहमदनगर व पारनेर तालुक्यात दहशत माजवणार्या या टोळीने आजवर अनेक चोर्या, दरोडे व हिंसाचाराच्या घटना घडवून आणल्या आहेत. त्याच्यासह या टोळीचे पाळेमूळे खोदून काढण्याचे आव्हानही उपअधीक्षक मिटके यांच्यासमोर आहे. यापूर्वीच्या त्यांच्या कामगिरीचा विचार करता तांदळे टोळीची दहशत संपवण्यासह त्यांनी केलेल्या सर्व गुन्ह्यांची उकल करण्यात ते यशस्वी होतील असा विश्वास पोलीस दलातील त्यांच्या सहकार्याकडून व्यक्त केला जातोय.