‘पुणे-नाशिक’ महामार्गाचा प्रवास पुन्हा ‘मृत्यूघंटे’च्या दिशेनेे! अनियंत्रित ठेकेदाराचा मनमानी कारभार; अवघ्या नऊ महिन्यात पंचवीस निष्पापांचा बळी..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
कधीकाळी ‘मृत्यूघंटा’ म्हणून वाहनचालकांच्या मनात धडकी भरवणारा आणि असंख्य दुर्दैवी घटनांमधून शेकडों निष्पाप प्रवाशांचे जीव घेणार्या पुणे-नाशिक महामार्गाला पर्याय म्हणून निर्माण झालेला ‘खेड ते सिन्नर’ नूतन महामार्गही आता प्रवाशांसाठी ‘काळ’ ठरत आहे. गेल्या वर्षभराहून अधिक काळापासून काँक्रीटीकरणाचे काम सुरु असल्याने जागोजागी वळण रस्ते आणि एकेरी वाहतूक करण्यात आली आहे. त्यामुळे एकामागून एक अपघातांची श्रृंखलाच सुरु झाली असून अनियंत्रित ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे प्रदीर्घकाळ सुरु असलेल्या कामाचा फटका निष्पाप प्रवाशांना बसत आहे. त्यातच अहिल्यानगर-मनमाड मार्गाच्या दुरुस्ती कामासाठी त्या मार्गावरील अवजड वाहतूकही आळेफाटामार्गे नाशिकच्या दिशेने वळवण्यात आल्याने या महामार्गावरील वाहनांची संख्याही प्रचंड वाढली आहे. त्यातून वारंवार अपघाती घटना घडून जानेवारीपासूनच्या अवघ्या नऊ महिन्यात 25 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या चार दिवसांतच या महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात एका महिलेसह दोघांचा बळी गेला तर, आठजण गंभीर जखमी झाले आहेत. प्रत्येक अपघातानंतर संतप्त नागरिकांनी काँक्रीटीकरणाचे काम करणार्या ठेकेदाराचा हलगर्जीपणा समोर आणला, मात्र भ्रष्टाचाराची शाल पांघरुन बसलेल्या राजमार्ग प्रधिकरणाच्या पुणे विभागाने प्रत्येकवेळी त्याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला. त्यातून नागरिकांमध्ये रोष निर्माण होवू लागला असून ठेकेदाराविरोधात आंदोलन उभे राहण्याची शक्यता आहे.

उत्तर भारतातून दक्षिण भारतात जाण्यासाठीच्या प्रमुख रस्तेमार्गात पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग महत्वाचा मानला जातो. पूर्वी या महामार्गावर कर्हे, चंदनापूरी, माहुली अशी एका मागोमाग नागमोडी आणि तीव्र चढउताराची वळणं असलेले भयान घाटरस्ते होते. गेल्या दशकापर्यंत सुरु असलेला चंदनापूरी घाट तर, वाहनचालकांच्या मनात अक्षरशः धडकी भरायचा. तीव्र चढ, अचानक
जागेवरच वळण यामुळे वाहनावरील नियंत्रण गमावल्याने या घाटात जवळजवळ रोजच छोटे-मोठे अपघात घडतं. 1990 च्या सुमारास झालेला पुणे-अंमळनेर बसचा अपघात आठवला तर आजही अनेकांच्या मनाचा ठोका चुकतो. अशीच स्थिती कर्हे आणि माहुली घाटातही होती. वारंवार अपघात, त्यातून निष्पाप नागरिकांचे बळी, वाहनांचे नुकसान, पुढे वाढत जाणारी वाहतूक यामुळे शासनाने रस्त्याचे नूतनीकरण करण्याचा निर्णय घेवून 2013 ते 2017 या चार वर्षात वरील अपघाती क्षेत्र सुकर करुन ‘खेड ते सिन्नर’ रस्त्याचे काम पूर्ण केले.

पूर्वी हा महामार्ग शहरातून जात असल्याने गावठाणातही अपघाती घटना घडत. त्यामुळे नूतन मार्गाची निर्मिती करतानाच हा महामार्ग अमृतवाहिनीपासून ते रायतेवाडी फाट्यापर्यंत बाह्यवळण देत शहराबाहेरुन नेण्यात आला. त्यामुळे शहरातील
अपघाताच्या घटनांवर नियंत्रण आले. 2017 साली 70 टक्के पूर्णत्वाच्या बोलीवर सुरु झालेल्या या महामार्गाच्या कामातील शिल्लक कामे मात्र तशीच ठेवण्यात आल्याने दुहेरी मार्गिका असलेला नूतन महामार्ग अस्तित्वात येवूनही अपघाती घटना थांबल्या नाहीत. संगमनेर तालुक्यात घडलेल्या त्या-त्या वेळच्या बहुतेक घटनांच्या मूळाशी ठेकेदाराचा हलगर्जीपणा असल्याचेही उघड होत गेले. मात्र राजमार्ग प्राधिकरणाने प्रत्येकवेळी ठेकेदारांना पाठीशी घालण्याचाच प्रयत्न केला. त्याचा फटका निष्पाप प्रवाशांना बसला.

अपूर्ण कामांमुळे अनेक ठिकाणचे उपरस्ते, रस्ते ओलांडण्याच्या सुविधा यामुळे अपघातांची श्रृंखला सुरु होवून काहीकाळ पुसट झालेला ‘मृत्यूघंटा’ हा भयानक शब्द पुन्हा ठळक झाला. त्यात आता महामार्गाच्या मजबुतीकरणासह काँक्रीटीकरणाचे काम करणार्या ठेकेदाराची भर पडली असून गेल्या वर्षभराहून अधिक काळापासून बोटाखिंड ते कर्हेघाटापर्यंतचे काम घेणार्या या
महाशयांनी इतक्या प्रदीर्घकाळात केवळ घारगाव ते हिवरगाव टोलनाक्यापर्यंतचा एकेरी रस्ता पूर्ण केला आहे. या मार्गाची दुसरी बाजू अद्यापही अपूर्णच आहे. धक्कादायक म्हणजे मजबुतीकरणाच्या नावाखाली काँक्रीटीकरण सुरु असलेल्या या रस्त्याच्या लगत साईडपट्ट्यांना मुरुम वापरणे आवश्यक असताना ठेकेदार सर्रासपणे माती टाकून आपल्या तुंबड्या भरीत आहे, मात्र साधी त्याची दखल घ्यायलाही आजवर कोणीही आलेले नाही.

एक वर्षाहून अधिक काळापासून या ठेकेदाराने मनमानी पद्धतीने वाट्टेल तेथून वळण रस्ते काढून अगदी कासवगतीने काम सुरु ठेवले. सुरुवातीला तर त्याने वळण रस्त्याची, एकेरी वाहतुकीची सूचना देणारे फलक अथवा चिन्ह लावण्याचीही तसदी घेतली नव्हती. त्यामुळे अपघात घडू लागल्याने लोकांनी मागणी केल्यानंतर त्याला उपरती आली. त्या उपरांतही अपवाद वगळता या ठेकेदाराची मनमानी आजही कायम असल्याने पुणे-नाशिक महामार्गावरील प्रवास जीवघेणा आणि कंटाळवाणा झाला आहे.
वारंवार वाहतुकीची कोंडी, अचानक वळण रस्त्यांमुळे अपघातांची शक्यता, एकीकडे काँक्रीटीकरण सुरु असताना दुसरीकडे महामार्गाची झालेली दूरवस्था या ठेकेदाराने दुर्लक्षित केलेल्या गोष्टींमुळे अलिकडील काळात या रस्त्यावरील अपघातांमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यातच सध्या अहिल्यानगर-मनमाड रस्त्याचे कामही सुरु असल्याने त्या मार्गावरील अवजड वाहतूक आळेफाटामार्गे नाशिककडे वळवण्यात आली आहे.

त्यामुळे आधीच ठेकेदाराच्या मनमानीमुळे जागोजागी जाम लागणार्या या महामार्गावरील वाहनांची संख्याही प्रचंड वाढली आहे. त्यातच सध्या सणासुदीचा कालावधी असल्याने अनेक कुटुंब खासगी वाहनातून प्रवास करीत आहेत. अशावेळी झालेले अपघात संपूर्ण कुटुंबाला उध्वस्त करणारे ठरत असून गेल्या चार दिवसांतील घटनांमधून या गोष्टी प्रकर्षाने समोर आल्या आहेत. रस्त्याचे
काम करणारा ठेकेदार मनमानी पद्धतीने काम करीत असल्याने जानेवारीपासूनच्या अवघ्या नऊ महिन्यात बोटा ते कर्हा या संगमनेर तालुक्यातील महामार्गावर घडलेल्या अपघातात 25 निष्पाप जीवाने गेले आहेत. खरेतर यातील ज्या घटनांना ठेकेदाराचा हलगर्जीपणा कारणीभूत आहे त्या प्रत्येक प्रकरणात त्याच्यासह राजमार्ग प्राधिकरणातील संबंधित अधिकार्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची गरज आहे.

सध्या पुणे-नाशिक महामार्गाच्या काँक्रीटीकरणाचे काम सुरु असून आळेखिंड ते हिवरगाव टोलनाका हा रस्ता एकेरी करण्यात आला आहे. घारगावपर्यंतच्या एकेरी रस्त्याचे काम पूर्ण झालेले असल्याने वाहनांचा वेगही वाढला आहे. त्यातच एकेरी वाहतूक असल्याने एकमेकांना ओलांडण्याच्या नादात अपघात घडण्याच्या शक्यता वाढल्या आहेत. गेल्या काही दिवसांतील अवघातही याच कारणाने घडल्याचे दिसून आले आहे. चंदनापूरी घाटाकडून खाली येणार्या
वाहनांचे चालक इंजीन बंद करुन वाहन चालवत असल्याने काही घटना घडल्याचेही समोर आले आहे. एकेरी वाहतूक असलेल्या रस्त्यावरुन वाहने चालवताना वेगावरील नियंत्रणासह कोणतीही घाई टाळावी. ओव्हर टेक करताना अधिक काळजी घ्यावी. आपल्या सोबत आपला परिवार आहे, आपल्या घरी कोणीतरी आपली प्रतिक्षा करतंय याचे भान ठेवून नियंत्रित वेगातच वाहन चालवावे.
रावसाहेब बांबळे
सहाय्यक निरीक्षक, डोळासणे महामार्ग पोलीस

