दोन हजार किलोमीटर वरून आणली ज्योत!
शंभर तरुणांचा सहभाग; दहा दिवसांचा प्रवास

नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्यातील सावरगावतळ येथील मुळगंगा तरुण मित्र मंडळाच्या शंभर तरुणांनी एकत्रित येत दोन हजार किलोमीटरचा दहा दिवसांचा प्रवास करत थेट जम्मू-काश्मीरच्या वैष्णोदेवी येथून ज्योत आणली. या ज्योतीचे गावात ढोल-ताशांच्या गजरात आणि सनई चौघड्याच्या दणदणाटात अभूतपूर्व स्वागत करण्यात आले.

तालुक्यातील सावरगावतळ येथील मुळगगा तरुण मित्रमंडळाने नवरात्रोत्सवात कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची भवानी, माहूरची रेणुका माता, पाथर्डीची मोहटादेवी, वणीची सप्तशृंगी, मुंबईची मुंबादेवी, वज्रेश्वरी इत्यादी ठिकाणांहून ज्योत आणण्याची परंपरा जोपासली होती. मात्र यावर्षी त्यांनी जम्मू-काश्मीरच्या वैष्णोदेवी वरून ज्योत आणण्याचा संकल्प केला. त्यासाठी तब्बल शंभर तरुण एकत्र आले आणि त्यांनी दोन बसेस मधून सामूहिकपणे जम्मू-काश्मीरमधील वैष्णोदेवी धाम गाठले. आणि जवळपास दोन हजार किलोमीटरचे अंतर पार करून माता वैष्णो देवीचे दर्शन घेत तेथून पवित्र ज्योत आणली.

सावरगाव तळ ग्रामस्थांचे ग्रामदैवत मुळगंगामाता ही नवसाला पावणारी देवी आहे. दरवर्षी नवरात्र उत्सवानिमित्ताने गावातील अनेक तरुण महाराष्ट्रातील विविध आदिशक्ती पिठावरून पवित्र अशी ज्योत घेऊन येत असतात. यावेळी गावातील सर्व मळगंगा माता तरुण मित्र मंडळाच्या सदस्यांनी एकमुखी निर्णय घेत यावर्षी नवरात्र उत्सवानिमित्त महाराष्ट्राच्या बाहेर थेट जम्मू- काश्मीर मधील कटरा येथील वैष्णवदेवीचे दर्शन घेऊन पवित्र ज्योत गावात आणण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गावातील सुमारे १०५ तरुणांनी एकत्रित येत दोन लक्झरी बस मधून गावचे ग्रामदैवत मळगंगा मातेचे दर्शन घेऊन १२ सप्टेंबरला वैष्णव देवीसाठी रवाना झाले होते. जातांना राज्यातील विविध देव देवतांचे दर्शन घेऊन मध्यप्रदेश मधील ओंकारेश्वर, उज्जैन, गोकुळ, उत्तर प्रदेश मधील मथुरा, वृंदावन, पंजाब मधील अमृतसर, गोल्डन टेंम्पल, आणि जम्मू काश्मीर मधील वाघा मार्गे कचरा येथील वैष्णवी देवी येथे पोहोचले माता वैष्णव देवीचे मनोभावे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले आणि पुन्हा परतीच्या प्रवासाला निघाले परतीच्या प्रवासाच्या दरम्यान राजस्थानमधील पुष्कर येथे ब्रम्ह मंदिराचं दर्शन घेतलं. अन फायरिंग करण्यानिमित्त सावरगाव तळ येथे आलेले संपत चौधरी यांचे आणि सावरगाव तळकरांचे ऋणानुबंध असल्यामुळे भीलवाडा येथे संपत चौधरी यांनी या ज्योतीचे उत्स्फूर्त स्वागत केले. त्यानंतर राजस्थान आणि मध्य प्रदेश या राज्यातून महाराष्ट्रात आगमन होत या ज्योतीचे सावरगाव तळ येथे आगमन झाल्यावर या तरुणांची व त्यांनी आणलेल्या ज्योतीची वाजत गाजत हर्ष उल्हासात मिरवणूक काढण्यात आली.

या पवित्र ज्योतीचे सावरगाव तळच्या शिवेवर ढोल- ताशाच्या गजरात सनई चौघड्याच्या स्वरात फुलाची मुक्त उधळण करत स्वागत करण्यात आले. पहिल्या माळी पासून गावात विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम दररोज घेतले जात आहेत. या गावाची प्रथा थोडी वेगळी आहे. नवरात्रीनिमित्त गावातील प्रत्येक वाड्याची स्वतंत्र माळ निघत असते. असे नऊ दिवस नऊ माळी गावातून निघत असतात. प्रत्येक माळेला त्या त्या वाड्यातील शालेय व महाविद्यालयीन मुला-मुलींचे वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम ठेवले जात आहेत. मुळगंगा मातेची आरती करून माळेची सांगता होते अशी आगळीवेगळी परंपरा या गावाला लाभली आहे.

Visits: 150 Today: 1 Total: 1412076
