हिवरगाव पावसा टोलनाक्यावर कर्मचार्याची पुन्हा वाहनचालकावर दादागिरी! चालकाला मारहाण करणारा टोल कर्मचारी बडतर्फ, नुकसान भरपाई पण दिली
नायक वृत्तसेवा, संगमनेर
दोनच दिवसांपूर्वी अपघातग्रस्तांनाच अरेरावी करण्याचा प्रकार समोर आला असतांना आता पुन्हा एकदा नाशिक-पुणे महामार्गावरील टोल प्लाझा चर्चेत आला आहे. स्थानिक कर्मचार्याच्या व्यक्तिगत वादातून आज सकाळी एका वाहनचालकाशी मोठी हुज्जत घालण्याचा प्रकार समोर आला असून या प्रकरणी टोल कंपनीने अधिक कठोरतेने पाऊल उचलतांना संबंधित कर्मचार्याला बडतर्फ केले आहे. विशेष म्हणजे या वादातून सदर वाहनाचे मोठे नुकसान झाले होते, मात्र कंपनीने संबंधिताला नुकसान भरपाई देत झाल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे. या संपूर्ण घटनाक्रमावरुन काही स्थानिक कर्मचारीच वाहनचालकांवर दादागिरी करीत असल्याचे वास्तवही समोर आले आहे.
आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास आळेफाटा येथील रहिवासी असलेले श्रीकांत मदने हे आपली कार (क्र.एम.एच.4/एच.वाय.3831) घेवून हिवरगाव पावसा येथील टोल प्लाझावर आले. यावेळी त्यांनी संबंधित टोलबुथवर असलेल्या कर्मचार्याला आपण स्थानिक असल्याचे सांगीतले. मात्र गेल्या काही महिन्यांपासून काही वाहनचालक टोल कर्मचार्यांची फसवणूक करीत असल्याचे समोर आल्याने संबंधित टोल कर्मचार्याने सदरचे वाहन सोडण्यास नकार देत वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र (आर.सी बुक) देण्यास सांगीतले. मात्र सदरचे वाहन मुंबईत नोंदणी झालेले असल्याने त्यावरुन दोघात शाब्दीक चकमक सुरु झाली.
सदर वाहनचालकाने आपण संगमनेर तालुक्यातील स्थानिक रहिवाशी असल्याचे वारंवार सांगूनही सदरचा कर्मचारी काहीएक ऐकूण घेण्यास तयार नसल्याने त्यांच्या हाणामार्याही झाल्या. त्यातून उद्दिग्न झालेल्या ‘त्या’ कर्मचार्याने जवळच पडलेला दगड उचलून तो त्या वाहनाच्या दर्शनीभागावर फेकून मारला. त्यामुळे सदर वाहनाची काच फुटून अन्य किरकोळ नुकसानही झाले. या दोघांतील भांडणाच्या आवाजाने टोल प्लाझावरील अधिकारी व कर्मचारी त्या दिशेने धावले व त्यांनी हा वाद शांत केला.
हिवरगाव टोल प्लाझाचे व्यवस्थापक संजय लोणे यांनी सदर वाहनचालकाची विचारपूस केली असता तो वाहनचालक आळेफाटा येथील रहिवासी असल्याचे त्यांना समजले. मात्र झाला प्रकार अयोग्य असल्याचे मान्य करीत त्यांनी संबंधित कर्मचार्याकडून झालेल्या प्रकाराबाबत त्या वाहनचालकाची माफी मागून वाहनाचे नुकसान भरुन देण्याचे कबुल केले व संबंधित कर्मचार्याची चौकशी करुन त्याला कामावरुन बडतर्फ करण्याचा निर्णय घेतला. त्या वाहनचालकानेही झाल्या कारवाईबाबत समाधान व्यक्त करीत माघार घेतल्याने जवळपास दोनतास चाललेल्या या नाट्यावर पडदा पडला.
वास्तविक महामार्गाच्या निर्मितीनंतर उभ्या राहीलेल्या हिवरगाव टोल प्लाझावर स्थानिक तरुणांना नोकरी द्यावी यासाठी सुरुवातीला निवेदने व आंदोलनेही झाली होती. त्यामुळे टोल कंपनीने आसपासच्या तरुणांची भरती करुन त्यांना सेवेत सामावून घेतले. मात्र त्यातील काहीजण नेहमीच ग्राहकांशी हुज्जत घालीत असल्याचेही वारंवार समोर आल्यानंतर कंपनीकडून त्यांना समजही दिली गेली. त्यातील काहींनी आपला स्वभाव बदलवून घेतला, तर काही तसेच राहीले. त्यातीलच एकाने आज सकाळी हा प्रकार घडवून आणला.
लॉकडाऊन आणि जिल्हा बंदीच्या काळात महामार्गांवरील वाहतुक जवळपास थांबलेली होती. त्यामुळे कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक करुन रस्ते निर्माण करणार्या कंपन्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यातच हिवरगाव टोलनाक्यावर स्थानिक असल्याचा पुरावा दाखविल्यास वाहन टोलशिवाय सोडले जात असल्याने अलिकडच्या काळात या सवलतीचा मोठ्या प्रमाणात गैरवापर होत असल्याचेही समोर आल्याने यापुढे आधारकार्ड ऐवजी वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र दाखवावे लागेल अशी योजना टोल प्लाझाकडून कार्यान्वित होण्याची शक्यता आहे.
हिवरगाव टोल नाक्यावरुन महिन्याभरात सरासरी 36 हजार स्थानिक वाहनांची ये-जा होते. प्रत्यक्षात मात्र त्यातील केवळ दोन हजार वाहनांचीच आमच्याकडे अधिकृतपणे नोंद आहे. यावरुन स्थानिक असल्याचे भासवून होणारी फसवणूक सहज लक्षात येते. मात्र अशा प्रकारावरुन ग्राहकांशी वाद घालणे अयोग्य आहे, त्याचे आम्ही समर्थन करणार नाही. आज सकाळी घडलेला प्रकार अत्यंत चुकीचा असून आम्ही ‘त्या’ कर्मचार्याला बडतर्फ केले असून त्याच्या राहीलेल्या पगारातूनच आम्ही त्या वाहनाचे नुकसान भरुन देणार आहोत. स्थानिक नागरिकांनी यापुढे आपल्या वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र एकदाच दाखवून ते टोलवर नोंदणी करुन घ्यावे.
संजय लोणे
व्यवस्थापक : हिवरगाव टोल प्लाझा