‘सत्ताधारी’ म्हणवण्यासाठी ‘चिन्हावर’ निवडून यावे लागते! आमदार खताळांकडून ‘त्या’ वक्तव्याची खिल्ली; पहिल्याच आयोजनात लोकांची मनंही जिंकली..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
महायुतीचे आमदार अमोल खताळ यांच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाचे औचित्य साधून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रविवारी झालेली आभार यात्रा कमालीची यशस्वी ठरली. अगदी महामार्गावरील वाहनयात्रेपासून ते प्रत्यक्ष सभास्थानाच्या आयोजनापर्यंत पदोपदी प्रत्येक गोष्टीचे नेटके नियोजन दिसून येत होते. कोणतीही संस्था, कारखाना अथवा राजकीय पार्श्वभूमी नसतानाही पहिल्यांदाच आमदार झालेल्या सामान्य शेतकर्याच्या मुलाने हजारोंच्या संख्येने जमवलेला हा जनसमुदाय संगमनेरातील बदललेल्या राजकीय स्थितीचे दर्शन घडवत होता. आपल्या आवाहनातून उसळलेला जनसागर पाहून भारावलेल्या आमदार अमोल खताळ यांनीही ‘घुलेवाडी’ कीर्तनाचा धागा पकडून दोन दिवसांपूर्वीच्या ‘शांती मोर्चा’तील वक्तव्यांवर ‘आभार यात्रे’तून निशाणा साधला. यावेळी त्यांनी आमदार सत्यजीत तांबे यांच्या नावाचा थेट उल्लेख करीत ‘सत्ताधारी’ आणि ‘विरोधक’ यातील फरक समजतो का? अशा शब्दात त्यांची ‘खिल्ली’ उडवली. सत्ताधारी होण्यासाठी पक्षाच्या चिन्हावर निवडून यावे लागते असा कोपराही त्यांनी दिला. पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अनुपस्थितीमुळे मनसोक्त ‘बॅटींग’ची संधी मिळालेल्या आमदारांनी संगमनेरच्या चार दशकांच्या राजकीय इतिहासाला वळसा घालून शांती मोर्चातील प्रत्येक वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. यावेळी त्यांनी आपल्या पहिल्याच जाहीर भाषणातून संगमनेरच्या विकासकामांसाठी निधींची जंत्रीच वाचून त्यातील निम्म्याहून अधिक कामांना उपमुख्यमंत्र्यांच्या मुखातून मंजूर्याही मिळवल्या, त्यात बांसनात गेलेल्या ‘पुणे-नाशिक’ सेमी-हायस्पीडचाही समावेश असल्याने त्यांची ही खेळी उपस्थित हजारोंची मनं जिंकणारी ठरली.

रविवारी (ता.24) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत महायुतीचे आमदार अमोल खताळ यांनी ‘आभार यात्रे’चे आयोजन केले होते. त्यासाठी जाणताराजा मैदानावर जर्मन हँगर पद्धतीच्या मांडवासह उपमुख्यमंत्र्यांच्या हॅलिपॅडसाठी संगमनेर महाविद्यालयाचे मैदानही तयार करण्यात
आले होते. रविवारी दुपारी उपमुख्यमंत्र्यांच्या आगमनानंतर महाविद्यालय ते आमदार खताळ यांचे कार्यालय या संपूर्ण रस्त्यावर दुतर्फा तुफान गर्दी झाली होती. त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांना लोकांचे अभिवादन स्वीकारण्यासाठी वाहनाच्या फूटरेसवर उभे राहावे लागले, तेथूनच वाहनयात्रेला सुरुवात होवून संगमनेरकरांचा त्याला भरभरुन प्रतिसादही मिळाला. जयजवान चौकात क्रेनच्या सहाय्याने त्यांना भलामोठा हार घालण्यात आला. उपमुख्यमंत्र्यांचा वावर असलेल्या सर्वच रस्त्यांवर भगवे झेंडे, फ्लेक्स यांची प्रचंड भरमार असल्याने शहराचा एकभाग भगवा झाला होता.

फटाक्यांच्या आतषबाजीत कार्यालयाच्या उद्घाटनानंतर उपमुख्यमंत्र्यांचा ताफा सभास्थळी आला, त्यावेळी बैठक व्यवस्था पूर्ण होवून तितकीच मंडळी आजूबाजूला उभे असल्याचे दृष्यही दिसले. प्रचंड गर्दीत काहींनी हुल्लडबाजी करीत सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी प्रतिबंधित केलेल्या क्षेत्रात शिरण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांना सौम्य लाठ्यांचाही वापर करावा लागला. याच कार्यक्रमात आमदार अमोल खताळ यांनी भारतनगर
गटार दुर्घटनेत मृत्यू झालेल्या तरुणाच्या कुटुंबियांना राहिलेल्या 20 लाखांचा धनादेशही जाहीरपणे दिल्याने त्याचा मोठा प्रभाव उपस्थित समुदायावर झाला. यावेळी एकतर्फी टोलेबाजीची संधी मिळालेल्या आमदारांनी उपस्थितांचा विजयाचे शिलेदार असा उल्लेख करीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अनुपस्थितीचा उल्लेख केला.

शिवसेना नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या टीकेला कामातून उत्तराच्या तत्वाचे आपण निवडून आल्यापासूनच पालन करीत असल्याचे सांगताना त्यांनी गेल्या आठ महिन्यांचा आलेख मांडला. कोणतीही शिक्षण संस्था, कारखाना अथवा दूधसंघ नसतानाही जमलेला हा अफाट जनसागर
चाळीस वर्षांची दहशत आणि दादागिरी झुगारुन उत्स्फूर्तपणे जमल्याचा टोलाही त्यांनी दिला. माजी आमदारांनी संगमनेर तालुका नेहमी दुष्काळी ठेवण्याचा प्रयत्न केला असा गंभीर आरोप करताना त्यांनी भोजापूर चारीचा दाखला देताना स्वतःला ‘जलनायक’ म्हणवणारे तालुक्यासाठी खरे ‘खलनायक’ ठरल्याची जहरी टीकाही आमदार खताळ यांनी केली. संगमनेरच्या जनतेने चाळीस वर्षांच्या सत्तेचा माज उतरवल्याचे सांगत त्यांनी घुलेवाडीतील प्रकरणाला हात घातला.

हिंदुत्त्ववादावर बोलणार्या कीर्तनकारावर यांच्या स्वीय्यसहाय्यकाने हल्ला केल्याचा आरोप करुन त्यांनी सुरुवात तुम्ही केली तर, त्याचा शेवट कोणीतरी करणारच असल्याचे सांगत त्यांनी कीर्तनकाराने पाया पडल्याच्या आरोपावरही भाष्य केले. आपल्या परिवाराला वारकरी संप्रदायाची परंपरा असल्याची पृष्टी जोडताना सामान्य शेतकर्याच्या मुलाला मतदाररुपी जनतेने दिलेल्या संधीचे सोनेच करणार असल्याचे सांगत त्यांनी आमदार
सत्यजीत तांबे यांच्या दिशेने आपला मोर्चा वळवला. आपले ध्येय केवळ विकासाचे असून गेल्या आठ महिन्यात विरोधकांचीही कामे केल्याचे त्यांनी सांगितले. मात्र जनतेने नाकारल्यानंतरही काहीजण विविध मार्गांनी ‘कमबॅक’ करण्यासाठी खोटेनाटे आरोप करुन सहानुभूती मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत असल्याची टीका त्यांनी केली.

चाळीस वर्षांच्या दुष्काळाचा शिक्का पुसण्यासाठी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या खात्याचा परिपूर्ण लाभ मिळवणार असल्याची ग्वाही देत त्यांनी शहरातील 20 हजार 416 मालमत्ता धरकांमधील 50 टक्के संगमनेरकरांना शास्तीमाफीचा लाभ मिळाल्याचे सांगितले. निवडून आल्यानंतर
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी ‘जायंट किलर’ अशी उपाधी देताना ‘विकासासाठी कधीही निधी कमी पडू देणार नाही’ या उपमुख्यमंत्र्यांच्या ‘वचना’ची आठवण करुन देत आमदार खताळ यांनी सध्याच्या ज्वलंत पुणे-नाशिक सेमी-हायस्पीड रेल्वेमार्गासह औद्योगिक वसाहत, महिला व बालकांसाठी सुसज्ज रुग्णालय, कॉटेज रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा व सुविधा, बसस्थानकावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी वाढीव जागेसह भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी जागा व निधी.

शहागडाचे (पेमगिरी) ऐतिहासिक महत्त्व आणि तेथील काही एकरांत विस्तारलेल्या वटवृक्षाचा उल्लेख करीत पर्यटन विकासाच्या संधीचा ऊहापोह, जलशुद्धीकरण प्रकल्प, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ), कौशल्य विकास भवन, म्हाडा व सिडकोच्या धर्तीवर शहरातील कतारवस्ती व संजयगांधी नगर झोपडपट्टीचा विकास अशा विविध कामांची जंत्रीच मांडून त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून त्यातील अनेक कामांची मंजुरी व निधीही मिळवला. त्यांची ही कृती उपस्थित हजारोंच्या समुदायाची मनं जिंकणारी ठरली. संगमनेरची बाजारपेठ ऐतिहासिक आहे, ती सधन होण्यात माजीमंत्र्यांचा कोणताही हातभार नसल्याचे सांगत त्यांनी येथील उद्योजक व व्यापार्यांमुळे बाजारपेठेचा लौकीक असल्याचे सांगितले. मध्यंतरी काही बगलबच्चांनी गावातील प्रतिष्ठीत व्यापार्यांना ‘ब्लॅकमेल‘ करण्याचेही उद्योग घडले, त्यांच्यावर खंडणीचे गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिल्याचेही आमदार खताळ यांनी यावेळी बजावले.

शांती मोर्चात आमदार सत्यजीत तांबे यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेताना आमदार अमोल खताळ यांनी ‘सत्ताधारी कशाला म्हणतात?’ असा सवाल करीत जोरदार पलटवार केला. स्वतःला सत्ताधारी म्हणवण्यासाठी पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवून विजय मिळवावा लागतो, असा टोलाही त्यांनी हाणला. एखाद्या मंत्र्यांच्या दालनात जावून त्यांना कागद देताना फोटो काढायचे आणि सोशल माध्यमात व्हायरल करायचे यातून कोणी सत्ताधारी होत नसतो असा कोपरा देताना त्यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ‘मामा-भाच्याने’ महायुतीच्या उमेदवाराविरोधात काम केल्याचे सांगत उपमुख्यमंत्र्याचे लक्षही त्याकडे वेधले.

एका शेतकर्याने दूधसंघाकडून शोषण सुरु असल्याची तक्रार आपल्याकडे दिल्याचे सांगताना आमदार खताळ यांनी तालुक्यातील यांची दहशत आठ महिन्यात मोडून काढल्याचे हे उदाहरण असल्याचे सांगताना आगामी जिल्हा परिषद, पंचायत समित्या व नगरपालिका निवडणुकीसाठी वज्रमुठ आवळण्याचे आवाहनही केले. त्याला उपस्थितांनी टाळ्या आणि शिट्ट्या वाजवून मोठा प्रतिसाद दिला. एकंदरीत निवडून आल्यानंतर पहिल्यांदाच आणि त्यातही पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अनुपस्थितीत झालेला हा कार्यक्रम परिपूर्ण यशस्वी ठरला. वाहनयात्रा, सभा या दोन्ही ठिकाणी लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद विरोधकांना विचार करण्यास भाग पाडणारा होता. या कार्यक्रमाच्या संपूर्ण आयोजनातील सूत्रबद्धता पाहणार्या व अनुभवणार्या प्रत्येकाच्या मनात स्थान मिळवून गेली.

