कोरोनामुळे साईमंदिर भाविकांना दर्शनासाठी ‘पुन्हा’ बंद! 5 ते 30 एप्रिलपर्यंतचा कालावधी; इतिहासात तिसर्‍यांदा राहणार बंद

नायक वृत्तसेवा, शिर्डी
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने ‘ब्रेक दि चेन’ या धोरणांतर्गत सोमवार (ता.5) सायंकाळपासून ते 30 एप्रिलपर्यंत साईमंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली आहे.

याशिवाय साईसंस्थानची भक्तनिवास व्यवस्थाही या काळात बंद असेल, प्रसादालय व कॅन्टीन सुद्धा बाहेरून येणार्‍या भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रसादालयात केवळ रुग्णालय व कोविड सेंटरच्या रुग्णांसाठीच जेवण बनवले जाणार असल्याचेही ठाकरे यांनी स्पष्ट केले. यावेळी मुख्य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, प्रशासकीय अधिकारी डॉ.आकाश किसवे, वैद्यकीय संचालक डॉ.प्रीतम वडगावे, डॉ.मैथिली पितांबरे, मंदिर प्रमुख रमेश चौधरी, संरक्षण प्रमुख परदेशी तसेच विविध विभागांच्या प्रमुखांची उपस्थिती होती.

साईसंस्थानच्या इतिहासात साथीचा संसर्ग रोखण्यासाठी तिसर्‍यांदा मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात येत आहे. 1941 मध्ये कॉलराचा संसर्ग रोखण्यासाठी मंदिर ऐन रामनवमीत बंद ठेवण्यात आले. तसेच शिर्डीत आलेल्या भक्तांना लस टोचण्यात आली. बाहेरून येणार्‍या भाविकांना पोलिसांनी शिर्डीच्या शिवेवर अडवून तेथूनच परत पाठवले. यानंतर कोरोनाचा संसर्ग सुरू होताच 17 मार्च, 2020 रोजी दुपारी तीन वाजेपासून 15 नोव्हेंबर, 2020 रात्री पर्यंत मंदिर बंद ठेवण्यात आले. 16 नोव्हेंबरला मंदिर पुन्हा सुरू झाल्यानंतरही 23 फेब्रुवारी, 2021 पासून दर्शनाच्या वेळा सकाळी सहा ते रात्री नऊ पर्यंत कमी करण्यात आल्या. यामुळे पहाटेची व रात्रीची आरती भक्तांविना होवू लागली.

त्यानंतरही कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेवून 28 मार्च, 2021 पासून वेळेत आणखी कपात करून दर्शनाची वेळ सकाळी सव्वा सात ते रात्री पावणे आठ करण्यात आली. यानंतर सोमवारपासून रात्री आठ वाजेपासून शासनाच्या ब्रेक दि चेन धोरणानुसार पुन्हा मंदिर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, मंदिर काही दिवसांसाठी बंद होणार असल्याने शिर्डीकरांनी दर्शनासाठी मंदिराकडे धाव घेतली.

Visits: 105 Today: 1 Total: 1110234

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *