‘अखेर’ पोक्सोतील आरोपी झाला गजाआड! पोलिसांची भूमिका मात्र संशयास्पद; आरोपीच्या जामीनाचा मार्ग केला प्रशस्त..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
वडगाव पानमधील अल्पवयीन मुलीच्या चेहर्‍यावर अ‍ॅसिडफेक झाल्याच्या घटनेने अवघा तालुका सून्न होवून त्या विरोधात आंदोलन करीत असतानाच संगमनेर शहरात अवघ्या सहा वर्षांच्या चिमुरडीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाला होता. या प्रकरणात एका जागृक महिलेने वेळीच आरडाओरड केल्याने 27 वर्षीय नराधम युवराज सिताराम हासे (रा.घोडेकरमळा) हा घटनास्थळावरुन पसार झाला, मात्र सदरची घटना समजल्यानंतर पीडित मुलीच्या नातेवाईकांनी आरोपीच्या घरी जावून त्याला बेदम चोपल्याने त्यात तो जखमी झाला होता. त्यामुळे त्याच्याविरोधात पोक्सोतंर्गत गुन्हा दाखल होवूनही पोलिसांनी त्याला अटक करण्याचे टाळले होते. मात्र त्याच्यावरील उपचार पूर्ण होताच शहर पोलिसांनी आज पहाटे त्याच्या अटकेचे सोपस्कार पूर्ण करीत आपली चामडी वाचवण्याचा प्रकार केला. खरेतर आरोपीने विद्यमान प्रकरणासह यापूर्वी चार मुलींशी अशाचप्रकारे गैरकृत्य केल्याची चर्चा असल्याने पोलिसांकडून त्याच्या कोठडीची मागणी होवून त्याला चार-आठ दिवस कारागृहात डांबण्याची गरज होती, प्रत्यक्षात मात्र तपासी अधिकारी न्यायालयात मूग गिळून बसल्याने आरोपीला पोलीस कोठडी ऐवजी न्यायालयीन कोठडी मिळाली असून त्याच्या सुटकेचा राजमार्गही तयार झाला आहे. त्यातून तपासी अधिकार्‍याबाबत संशय निर्माण झाला असून पोलिसांची असंवेदनशीलताही उघड पडली आहे.


गेल्या मंगळवारी (ता.17) वडगाव पानमधील एका 12 वर्षीय मुलीवर शाळेतून घरी जात असताना एका विकृताने विनाकारण अ‍ॅसिड फेकल्याने त्यात ती गंभीर जखमी झाली. या घटनेचे पडसाद संपूर्ण तालुक्यासह राज्यातही उमटल्याने मोठा जनक्षोभ निर्माण झाला. या घटनेविरोधात संतप्त झालेल्या नागरिकांनी बुधवारी (ता.18) वडगावपान फाट्यावर आंदोलन पुकारले. भरउन्हात येथील आंदोलन पेटलेले असतानाच तेथून दहा किलोमीटर अंतरावर संगमनेर शहरात एका वसाहतीत असलेल्या काटवनात शहरातील घोडेकर मळ्यात राहणार्‍या युवराज सिताराम हासे (वय 27) याच्या विकृतीने कळस गाठला होता.


आरोपीने आसपासच्या भागात हिंडताहिंडता एका वसाहतीत राहणार्‍या अवघ्या सहा वर्ष वयाच्या चिमुरडीला हेरुन तिचा पाठलाग केला आणि ती खाऊ घेवून आनंदाने बागडत आपल्या घराकडे जात असताना रस्त्यातील काटवनाच्या परिसरात त्याने तिला अमानुषपणे फरफटत नेवून तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केला. मात्र हा विकृत ‘त्या’ भागात फिरत असतानाच एका जागृक महिलेला त्याचा संशय आल्याने तिने आपले संपूर्ण लक्ष त्याच्याकडे केंद्रीत केले होते. त्यामुळे त्याने ‘त्या’ चिमुरडीला काटवनात ओढताच तिने तेथे धाव घेतली. त्यामुळे आरोपी तेथून पळून गेला आणि धडू पाहणारा मोठा अनर्थ टळला.


या प्रकारानंतर घाबरलेली ती चिमुरडी रडू लागल्याने ‘त्या’ महिलेने मायेने तिची विचारपूस करीत तिला घरी नेवून सोडले व सोबतच आरोपीची ओळखही सांगितली. या भयानक दूष्कृत्याने संताप अनावर झालेल्या पीडित मुलीच्या नातेवाईकांनी थेट आरोपीच्या घोडेकरमळ्यातील घरी जावून त्याला बेदम चोपून काढले व त्याला पोलीस ठाण्यात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी परिसरातील काहींनी मध्यस्थी करीत प्रतिष्ठेचा खोटा आव आणून पीडितेच्या नातेवाईकांवर दबाव आणला. धक्कादायक म्हणजे या प्रकरणाची कुणकूण लागताच एका सामाजिक कार्यकर्त्याने शहरातील एका पत्रकाराच्या मदतीने पोलिसांना पाचारण केले.


मात्र त्या उपरांतही आरोपीच्या नातेवाईकांकडून दबावतंत्र सुरुच राहिल्याने रात्री उशिरापर्यंत या प्रकरणाची तक्रार होवू शकली नव्हती. अखेर परिसरातील काहींनी ‘त्या’ नराधमाने या प्रकरणापूर्वी तीन लहान मुलींसोबतही असाच प्रकार केल्याचे सांगितल्यानंतर आपल्या लेकीच्या काळजीपोटी तिच्या आईने शहर पोलीस ठाणे गाठले. मात्र तरीही आरोपीच्या नातेवाईकांनी तिचा पीच्छा सोडला नव्हता, धक्कादायक म्हणजे सदरील महिला पोलीस ठाण्यात तक्रार देत असतानाही पैशांचा माज असलेल्या आरोपीच्या पाठीराख्यांनी फिर्यादीला 25 हजार रुपये देण्याचे आमिष दाखवले, मात्र त्याला न जुमानता तक्रार दाखल करण्यात आली.


घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले होते, मात्र त्यावेळी त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत असल्याने उपचारासाठी त्याला सोडण्यात आले होते. शुक्रवारी (ता.21) आरोपी ठिकठाक झाल्याने रुग्णालयातून त्याची सुटका झाली. त्याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी आज पहाटे त्याला अटक केली. 27 वर्षीय अधेड वयाच्या आरोपीने अवघ्या सहा वर्ष वयाच्या मुलीसोबत केलेले कृत्य घृणास्पद आणि अतिशय संतापजनक असण्यासोबतच त्याने त्यापूर्वीही तब्बल तीन मुलींशी असेच दूश्कृत्य केल्याची चर्चा असल्याने पोलिसांकडून या प्रकरणाकडे संवेदनशील दृष्टीने पाहिले जाईल व त्याच्यावर कायद्याची जरब बसेल अशी कारवाई होईल असे सामान्यतः अपेक्षित होते.


मात्र घडले उलटच. एकीकडे शहरात अल्पवयीन मुलींवर एकामागून एक प्रकार समोर येत असतानाही या गंभीर प्रकरणात पोलिसांनी आज अटक केलेल्या युवराज सिताराम हासे या नराधमाला न्यायालयासमोर उभे करुन त्याच्या पोलीस कोठडीची मागणी होण्याची अपेक्षा असताना या प्रकरणाच्या तपासी अधिकार्‍यांना ‘नाग दर्शन’ झाल्यागत ते न्यायालयासमोर मूग गिळून बसल्याने अवघ्या काही मिनिटांच्या पेशीतच आरोपीला पोलीस कोठडी ऐवजी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यातून त्याचा जामीनाचा राजमार्गही तयार झाला आणि या प्रकरणाच्या तपासी अधिकार्‍यांच्या भूमिकेबाबत संशयही बळावला.


खरेतर प्रकरणाच्या तपासी अधिकार्‍यांनी मागील संदर्भासह या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेवून न्यायालयासमोर सविस्तर म्हणणे सादर करुन अधिकच्या तपासासाठी आरोपीची कोठडी मागण्याची नैसर्गिक अपेक्षा होती. मात्र या प्रकरणाच्या तपासात जणू काहीच शिल्लक राहीले नसल्याप्रमाणे सदरील अधिकारी असंवेदनशीलपणे गुपचूप बसून राहिल्याने न्यायालयाने आरोपीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे सोमवारी त्याच्या नातेवाईकांकडून जामीनाचा अर्ज दाखल होवून त्याच्या सुटकेचा मार्गही मोकळा झाला आहे. यातून शहर पोलिसांचा असंवेदनशीलपणा आणि मनमानी कारभार चव्हाट्यावर आला असून वरीष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी वेळीच याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.


या प्रकरणात सुरुवातीपासूनच आरोपीच्या बचावासाठी पुढे आलेल्यांनी खोट्या प्रतिष्ठेचे अवसान आणून फिर्यादीवर दबाव आणण्यासह चक्क पोलीस ठाण्यात असलेल्या फिर्यादीला 25 हजारांची रक्कम देवून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरु होता. मात्र त्याला फिर्यादीने भीक घातली नाही. त्याच पद्धतीने आरोपीला अटक झाल्यानंतर त्याला दीर्घकाळ कारागृहात रहावे लागू नये यासाठी तर तपासी अधिकार्‍यांना कशाचे आमिष दाखवले गेले नाही ना? अशा शंका आता उपस्थित होवू लागल्या असून जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, आमदार अमोल खताळ व आमदार सत्यजीत तांबे यांनी काळ सोकावण्यापूर्वीच या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहून लोकांचा उद्रेक होण्यापूर्वीच सत्य समोर आणण्यासाठी प्रशासनावर दबाव निर्माण करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.


एकीकडे वडगावपानमधील घटनेचा आरोपी हाती लागत नसल्याने पोलिसांच्या तपास पद्धतीवरच प्रश्‍न निर्माण झालेले असताना या घटनेनंतर अवघ्या 24 तासांत घडलेल्या संगमनेरातील या प्रकरणाने जनमानसात मोठा क्षोभ निर्माण झाला होता. मात्र आरोपीच्या डोक्याला इजा झाल्याने पोलिसांनी त्याची अटक टाळली. त्यातून तो बरा झाल्यानंतर खरेतर त्याला अटक होवून त्याची रवानगी पोलीस कोठडीत होण्याची गरज होती. मात्र तपासी अधिकारी न्यायालयासमोर ‘मूग’ गिळून बसल्याने नाईलाजास्तव त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाली आहे. त्यामुळे त्याच्या जामीनाचा मार्गही आता प्रशस्त झाला आहे. या प्रकाराने तपासी अधिकार्‍यासह शहर पोलिसांच्या भूमिकेविषयी जनमानसात संशय निर्माण झाला असून पोलीस लोकांच्या संयमाचा अंत पाहत असल्याचेही बोलले जावू लागले आहे.

Visits: 2 Today: 2 Total: 1587374

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *