मानाच्या गणपतीने अन्य मंडळांचा विचार करण्याची गरज! अनेकांच्या मनातला विचार ओठांवर; अपर पोलीस अधिक्षकांचेही आवाहन..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
वाद्य वाजवण्यास रात्री बाराची मर्यादा लागू झाल्यापासून संगमनेरच्या मुख्य गणेश विसर्जन मिरवणुकीतील मानाच्या काही मंडळांसह अन्य सार्वजनिक गणेश मंडळांची घुसमट सुरु झाली आहे. त्याला कारणही तसेच आहे, सकाळी आठच्या सुमारास मानाच्या गणरायाची मिरवणूक सुरु होत असल्याने रात्रीपासूनच मुख्यमिरवणुकीचा संपूर्ण मार्ग ‘सील’ केला जातो. त्यामुळे मुख्य मिरवणुकीशिवाय गणेश विसर्जन करु इच्छिणार्‍या अन्य मोठ्या सार्वजनिक मंडळांना अकोले बायपास रस्त्याने शहराबाहेरच आपला आनंद साजरा करावा लागतो. पूर्वी संगमनेरची मुख्य विसर्जन मिरवणूक दुपारी चार वाजता सुरु व्हायची, त्यामुळे सकाळच्या सत्रात गवंडीपूर्‍यापासून माळीवाड्याकडे येणारा रस्ता सर्व मंडळांसाठी खुला असायचा. दिवसभर शहराच्या मेनरोडवर एका मागोमाग गणपती मंडळांची रिघ लागायची, दिवसभर हा रस्ता अबालवृद्धांच्या गर्दीने ओसंडलेला असायचा. अगदी वीज मंडळ, बस आगार, नगरपालिका यांची मंडळेही याच रस्त्याने वाजतगाजत जातं. दुपारनंतर सुरु होणार्‍या मुख्य विसर्जन मिरवणुकीत मानाची मंडळे विद्युत रोषणाईने सजवलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीवरील देखाव्यांसह मिरवणुकीत सहभागी होतं. पहाटे उशिरापर्यंत हा विसर्जन सोहळा सुरु असायचा. मात्र 25 वर्षांपूर्वी ‘मानभंगा’चा दुर्दैवी प्रसंग घडला आणि त्यानंतर दोन वर्षांनी वाद्य वाजवण्याच्या वेळेवर मर्यादा आल्या, त्यामुळे संगमनेरच्या ऐतिहासिक गणेश विसर्जन मिरवणुकीच्या सौंदर्यालाही उतरती कळा लागली.
लोकमान्य टिळकांनी पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवल्याच्या दुसर्‍याच वर्षी मालपाणींच्या खासगी मालकीच्या रंगारगल्ली स्थित सोमेश्‍वर मंदिरात श्रींची स्थापना होवून संगमनेरातही या उत्सवाला सार्वजनिक स्वरुप प्राप्त झाले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने  मेनरोडवरील कोष्टी समाजाचे चौंडेश्‍वरी मंदिर, साळीवाड्यातील साळी समाजाचे जिव्हेश्‍वर मंदिर, राजस्थानी ब्राह्मण समाजाचे जगदीश मंदिर, माहेश्‍वरी समाजाचे बालाजी मंदिर, चंद्रशेखर चौकात ब्राह्मण समाजाचे श्रीराम मंदिर, नेहरु चौकातील तट्ट्या मारुती मंदिर, माळीवाड्यातील माळी समाजाचे मारुती मंदिर, अरगडे गल्लीतील मारुती मंदिर, नवघर गल्लीत क्षत्रिय समाजाचे खंडोबा मंदिर अशा वेगवेगळ्या ठिकाणच्या समाज मंदिरांमध्ये श्रींची स्थापना होवू लागली व दहा दिवस त्या पुढ्यात विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आडून स्वातंत्र्य लढ्यासाठीची एकजुटता वाढवण्याचे काम सुरु झाले.
स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्राची निर्मिती होवून पुढील 10/20 वर्षात आणखी काही सावजनिक गणेश मंडळांची भर पडली. स्वातंत्र्यानंतर दहा दिवसांच्या या उत्सवात पुण्याच्या धर्तीवर विसर्जनाचा सोहळा सुरु झाला. शहर व आसपासच्या सुकेवाडी, समनापूर, घुलेवाडी, कासारवाडी, वाघापूर, रायतेवाडी अशा ठिकाणचे गणपती मंडळही त्यात सहभागी होवू लागले. त्यातून आघाडीवर कोणी राहावे अशा वादाच्या ठिणग्या पडू लागल्याने प्रशासनाकडून हस्तक्षेप होवून स्थापना वर्षाप्रमाणे गणपती मंडळांना मिरवणुकीत सहभागाचे क्रमांक अर्थात मानाचे क्रमांक देण्यात आले. पूर्वी मंदिरात बसणारे बाप्पा स्वातंत्र्यानंतर आणि विशेषतः राज्याच्या निर्मितीनंतर मांडवात बसू लागल्याने त्या-त्या ठिकाणचे गणपती त्या परिसराच्या अथवा चौकाच्या नावाने ओळखले जावू लागले, कालांतराने त्यात वाढही झाली.
गेल्या अडीच दशकापर्यंत संगमनेरात विसर्जनाच्या दोन मिरवुणका निघायच्या दुपारी चार वाजता मानाच्या सोमेश्‍वर रंगारगल्ली मंडळाच्या गणपतीचे पूजन होवून मुख्य विसर्जन मिरवणूक सुरु व्हायची. तो पर्यंत गवंडीपूरा ते नगरपालिका हा मुख्य मिरवणुकीचा मार्गही शहरातील सर्व गणेश मंडळांसाठी खुला असायचा. त्यामुळे सकाळपासूनच गवंडीपूर्‍यापासून मेनरोडवर गणेश मंडळांची अक्षरशः रिघ लागायची. सार्वजनिक बांधकाम विभाग, वीज मंडळ, राज्य परिवहन महामंडळ, नगरपालिका विमा कंपनी, राजेंद्र, राजपाल, हत्ती बिडी या सारख्या कितीतरी आस्थापनांचे गणपतीही कर्मचारी व अधिकारी  मोठ्या जल्लोशाने नाचतनाचत मेनरोडने विसर्जनासाठी घेवून जातं. दुपारी साडेतीनच्या सुमारास मुख्य विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावरील सर्व मंडळे पुढे काढून हा मार्ग ‘सील’ व्हायचा, त्यानंतर शहराच्या मुख्य विसर्जन मिरवणुकीला सुरुवात व्हायची, त्यावेळी कधीकधी रात्रभर मिरवणुका सुरु राहून दुसर्‍या दिवशी दिवस उजेडल्यानंतरही श्रींचे विसर्जन झाल्याचे असंख्य दाखले आहेत.

2002 साली वरीलप्रमाणे मुख्य मिरवणुकीला सुरुवात होवूनही खंडोबा गल्ली मंडळाचा गणपती मानाच्या गणपतीच्या मार्गात राहिल्याने मोठा वाद निर्माण झाला. प्रशासनाकडून वारंवार विनवण्या होवूनही मानाच्या मंडळाचे कार्यकर्ते मिरवणूक काढण्यास तयार नसल्याने शहरात तणावही वाढला होता. तत्कालीन जिल्हाधिकारी विमलेंद्र शरण यांनी पहाटेच्या सुमारास संगमनेरात येवून घडल्या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त केली व पुढील वर्षीपासून (2003) विसर्जनाच्या पहिल्या दिवशी रात्रीच मुख्य मिरवणुकीचे सर्व रस्ते ‘सील’ करण्याचा निर्णय होवून दुपारी चार वाजता सुरु होणारी मुख्य विसर्जन मिरवणूक सकाळी आठ वाजता सुरु होवू लागली. त्यामुळे मिरवणुकीत सहभाग घेण्यास इच्छुक नसलेल्या मंडळांना पर्यायी मिरवणूक मार्गच नसल्याने त्यांची कोंडी होवून अशा मंडळांना अकोले बायपाससारख्या शहराच्या बाहेरच्या रस्त्यांचा वापर करुन आपल्या बाप्पांना निरोप द्यावा लागतो. त्यातून निर्माण झालेली नाराजी गेली अनेक वर्ष बहुतेक मंडळांच्या मनात खद्खद्त आहे.
संगमनेरची विसर्जन मिरवणूक दुपारी चारऐवजी सकाळी आठ वाजता सुरु होण्याचा निर्णय होवून दोनच वर्ष उलटले तोच 2005 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने ध्वनी प्रदूषणाबाबत कठोर भूमिका घेत रात्री बारानंतर कोणत्याही प्रकारची वाद्य वाजवण्यास मनाई केल्याने पोलिसांनी त्याची कठोर अंमलबजावणी करताना रात्री बारा वाजता वाद्य बंद करण्यास सुरुवात केली. त्यामुळे 20 ते 30 तासांपर्यंत लांबणार्‍या संगमनेरच्या विसर्जन सोहळ्याला वेळेची मर्यादाही आली. अर्थात महानगरांमधील मंडळांची संख्या विचारात घेवून नंतरच्या काळात तेथील निर्णयाबाबत काहीशी लवचिकता स्वीकारली गेली, मात्र संगमनेरच्या ऐतिहासिक मिरवणुकीची वेळ बदलून असंख्य छोट्या-मोठ्या मंडळांच्या मनात निर्माण झालेली नाराजी, खद्खद् मात्र आजही कायम आहे.

अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत मुख्य विसर्जन मिरवणुकीत मानाचे 13 गणपती सहभागी व्हायचे. मात्र मानाच्या पहिल्या मंडळाची मिरवणूक सकाळी आठ वाजता सुरु होवूनही रात्री दहा पर्यंत पालिकेचे प्रवेशद्वार ओलांडीत नसल्याने खुद्द मानाच्या मंडळांनाच हमरस्त्यावर येवून मूकपणे आपले बाप्पा पुढे नेण्याची वेळ आली. त्यातही रात्रीच्या मिरवणुकांसाठी मोठ्या प्रमाणात अतिरीक्त खर्चही होत असल्याने इतका खर्च करुनही केवळ मानाच्या गणपती मंडळाकडून घेतल्या जाणार्‍या अतिरीक्त वेळेच्या कारणाने आपल्या मंडळांच्या बाप्पांना शेवटपर्यंत वाजतगाजतही नेता येत नसल्याने काही मानाच्या मंडळांसह जवळपास डझनभराहून अधिक मंडळांनी गेल्या काही वर्षांपासून मिरवणुकीतील सहभाग थांबवला आहे.

या उपरांतही मानाच्या मंडळाच्या वागणुकीत कोणताही बदल होत नसल्याने मुख्य मार्गावरुन मिरवणूक नेण्याची मनशा असलेल्या काही मंडळांनी त्याला पर्याय शोधण्यास सुरुवात केली असून बाजारपेठ व्यापारी मंडळाने त्याला तोंड फोडले आहे . यंदा मंडळाने आपल्या उत्सवाचा कालावधी तीन दिवसांनी कमी करुन सातव्या दिवशीच बाप्पांचे विसर्जन करण्याचा निर्णय घेतला आहे. व्यापारी मंडळाच्या या निर्णयाने संगमनेरच्या मुख्या विसर्जन मिरवणुकीत आकर्षक देखावा आणि साजेशा ताफ्यांसह सहभागी होणारे आणखी एक मंडळ कमी झाले आहे. या उपरांतही मानाच्या गणपती मंडळाचा मनमानीपणा कायम राहीला तर, येणार्‍या कालावधीत संगमनेरच्या मुख्य विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर सातव्या, आठव्या अथवा नवव्या दिवशीच उर्वरीत मानाच्या गणपतींसह पूर्वीप्रमाणे अन्य सार्वजनिक मंडळांच्या विसर्जन मिरवणुका निघाल्यास आश्‍चर्य होवू नये.

नुकत्याच पार पडलेल्या शांतता समितीच्या बैठकीतही यावरुन चर्चा सुरु झाली होती. बाजारपेठे व्यापारी मंडळाने सातव्या दिवशी विसर्जनाचे नियोजन सांगताना त्यामागील कारणांचाही ऊहापोह केल्यानंतर बहुतेक मंडळांनी त्यांच्या सुरात सूर मिसळला. पूर्वी संगमनेरचे पोलीस उपअधिक्षक व आता श्रीरामपूरचे अपर अधिक्षक असलेल्या सोमनाथ वाघचौरे यांनीही मानाच्या गणपती मंडळाने सामंजस्याची भूमिका घेवून दुपारी चार पूर्वी पालिका ओलांडल्यास संगमनेरच्या ऐतिहासिक विसर्जन मिरवणुकीची परंपरा पुढे कायम राहण्यावर शंका घेताना वेळीच त्यात बदल झाले नाही तर, भविष्यात अन्य मानाची मंडळे पर्यायी दिनी विसर्जन मिरवूक काढण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली. त्यामुळे मानाच्या मंडळाने आपली वैभवशाली परंपरा व मान विचारात घेवून विसर्जन मिरवणुकीच्या वेळेबाबत गांभीर्य दाखवावे अशी अपेक्षा वाढली आहे. 
संगमनेरच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला 130 वर्षांहून अधिक मोठा इतिहास आहे. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केल्याच्या दुसऱ्याच वर्षी संगमनेरातील सोमेश्वर मंदिरात श्रींची प्रतिष्ठापना झाली होती‌. स्वातंत्र्यानंतरच्या काळात या उत्सवाचे स्वरूप बदलत गेल्याने या उत्सवाकडे आनंद सोहळा म्हणून पाहिले जाऊ लागले. त्यातूनच विसर्जनाच्या मोठ्या मिरवणुका काढण्याची परंपराही रुजली‌. मात्र त्यातून पुढे कोणाचा गणपती असा वाद निर्माण होऊ लागल्याने तत्कालीन प्रशासनाने स्थापना वर्षाप्रमाणे मिरवणुकीत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या गणेश मंडळांना मानाचे क्रमांक दिले. तेव्हापासून विसर्जन मिरवणुकीत मानाच्या पद्धतीचे पालन होऊ लागले. ठरलेल्या ‘प्रोटोकॉल’नुसार मानाच्या पहिल्या गणेश मंडळाची मिरवणूक सुरु झाल्यानंतर त्या पुढील मार्गावर अन्य कोणताही गणपती असता कामा नये.
त्यासाठी प्रशासनाकडून मानाच्या पहिल्या गणेश मंडळापासून ते प्रशासकीय सत्कार होणाऱ्या पालिकेच्या प्रवेशद्वारापर्यंतचा मार्ग विसर्जन दिनाच्या पहिल्या रात्रीच बॅरिकेटिंग करुन बंद केला जातो. त्यामुळे ज्या गणेश मंडळांना मुख्य मिरवणुकीत सहभागी न होता शहराच्या मुख्य रस्त्यावरुन विसर्जन मिरवणूक न्यायची आहे, त्यांची अडचण होते. त्यामुळे शहरातील सार्वजनिक मंडळांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली आहे, त्यात आता मानाजी मंडळी सुरत सुरू मिसळू लागल्याने उत्सवाची परंपरा जोपासण्यासाठी सामंजस्याने तोडगा काढण्याची गरज आहे. तरच संगमनेरच्या सार्वजनिक गणेशोत्सवाची ऐतिहासिक आणि वैभवशाली परंपरा पुढील काळातही कायम राहून सार्वजनिक एकोपा टिकून राहील.
Visits: 427 Today: 4 Total: 1414298

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *