‘खाकी’चा दरारा संपला की तपासाची चाकं गंजली? वडगावपान ‘अॅसिड फेक’ प्रकरण; पोलीस अद्यापही अंधारातच..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्यातील वडगाव पान येथील अल्पवयीन मुलीवरील ‘अॅसिड फेक’ प्रकरणाला चार दिवसांचा कालावधी उलटूनही पोलिसांचे हात अद्याप रिकामेच आहेत. विशेष म्हणजे विधानसभेचे कामकाज सुरु असतानाच सदरचा प्रकार घडल्याने त्याचे थेट पडसाद राज्याच्या दोन्ही सर्वोच्च सभागृहातही उमटले, त्यावर गृहराज्यमंत्र्यांनी कठोर कारवाईचे आश्वासनही दिले. मात्र त्यालाही आता शंभर तासांचा काळ लोटला आहे. या दरम्यान कधीकाळी गुन्हेगारांऐवजी फिर्यादीच्याच छातीत धडकी भरवणार्या स्थानिक गुन्हे शाखेसह दोन अधिकारी आणि तब्बल 40 कर्मचार्यांनी जंग जंग पछाडूनही त्यांच्या हाती धुपाटणेच असतांना नाशिकच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनीही दोन दिवस मुख्यालयात तळ ठोकला. मात्र त्यांचा हा दौरा तपासाला ‘बुस्टर’ देण्यापेक्षा त्यांच्या पोलीसी पाहुणचारानेच अधिक गाजल्याने जिल्ह्यातील ‘खाकी’चा दरारा संपला की तपासाची चाकं गंजली अशी शंका निर्माण झाली आहे.

गेल्या मंगळवारी (ता.17) सकाळी साडेअकराच्या सुमारास वडगाव पानमधील डी.के.मोरे विद्यालयात शिकणारी बारा वर्षांची विद्यार्थीनी आपल्या सायकलवरुन घराकडे जात असताना तिच्या घरापासून अवघ्या पाचशे मीटर अंतरावर हाडकीच्या ओढ्याजवळ सदरचा भयंकर प्रकार घडला होता. दुचाकीवरुन आलेल्या आरोपीने सुनसान असलेल्या या रस्त्यावर ‘जाधवांचे घर इकडेच आहे का?’ असे विचारण्याचा बहाणा करीत पीडितेला थांबवले आणि सोबतच्या बाटलीतून आणलेले ‘अॅसिड’ तिच्या चेहर्यावरुन भिरकावून तो पसार झाला. अचानक घडलेल्या या प्रसंगाने भेदरलेल्या त्या चिमुरडीच्या चेहर्याची अॅसिडने आग आग केल्याने तिच्या भयानक किंकाळ्यांनी आसपासच्या नागरिकांनी तिच्या दिशेने धाव घेतली, मात्र तोपर्यंत विकृतीने ग्रासलेला तो ‘अज्ञात’ आरोपी ‘गायब’ झाला होता.

हा प्रकार समोर येताच तालुका पोलिसांनी वरीष्ठांना घटनेची माहिती देत तातडीने तपासाला सुरुवात केली. आमदार अमोल खताळ यांनी ‘औचित्याचा मुद्दा’ मांडून त्याच दिवशी विधानसभेत हा प्रश्न उपस्थित करीत आरोपीचा तात्काळ शोध घेवून कठोर कारवाईची मागणी केली. त्यावर गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी कारवाईचे आश्वासनही दिले. तर, बुधवारी आमदार सत्यजीत तांबे यांनी वरीष्ठ सभागृहात यावर भाष्य करताना ‘अॅसिड’सारखा ज्वलनशिल पदार्थ सहज उपलब्ध होत असल्याकडे शासनाचे लक्ष वेधले. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य वाढल्याने पोलिसांवरील दबावातही मोठी वाढ झाली.

पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, अपर अधिक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी प्रवरा ग्रामीण रुग्णालयात जावून पीडितेची भेट घेतली व संशयीताचे रेखाचित्रही प्रसिद्ध केले. आरोपीच्या शोधासाठी दोन वरीष्ठ अधिकार्यांसह तब्बल 40 कर्मचार्यांचा समावेश असलेली दहा तपास पथकेही तयार केली गेली, मात्र त्या उपरांतही पोलिसांच्या हाती धुपाटणेच आले. विशेष म्हणजे कधीकाळी गुन्हेगारांच्या मनात धडकी भरवणार्या मात्र मागील कालावधीत ‘भाऊ’च्या कारनाम्याने फिर्यादींनाच घाम फोडणार्या स्थानिक गुन्हे शाखेकडूनही या प्रकरणाचा समांतर तपास सुरु आहे, मात्र घटनेला शंभर तास उलटून गेल्यानंतरही या संपूर्ण यंत्रणेचे हात अजूनही रिकामेच आहेत. पोलिसांनी जारी केलेल्या ठोबळ रेखाचित्रातून आरोपीचा उलगडा होत नसल्याने नागरिकांकडूनही अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.

अशातच घटनेच्या तिसर्या दिवशी गुरुवारी (ता.19) नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे व्हाया प्रवरा रुग्णालय अहिल्यानगरला पोहोचले. त्यांच्या कामकाजाची पद्धती आणि दरारा पाहता त्यांची भेट वडगाव पानच्या अॅसिडफेक प्रकरणाच्या तपासाला ‘बुस्टर’ देणारी ठरेल अशी अपेक्षा असताना दुर्दैवाने या भेटीत जिल्हा पोलिसांच्या ‘खास’ आदरातिथ्याशिवाय काहीही विशेष घडल्याचे दिसले नाही. त्यावरुन वरिष्ठ अधिकारी येतात, बैठका घेतात, सूचना देतात आणि निघून जातात; पण ज्या पीडितेवर अन्याय झाला, तिला न्याय मिळवून देणारा आरोपी अद्यापही पोलिसांच्या आवाक्याबाहेरच असल्याचे वास्तव आजही दृष्टीस पडत आहे.

घटनेच्या दुसर्या दिवशी बुधवारी (ता.18) आरोपीच्या अटकेसाठी वडगाव पान फाट्यावर सर्वपक्षीय रास्तारोको आंदोलनही झाले. मात्र या सर्व घडामोडी घडून आता तब्बल शंभर तासांचा कालावधी लोटला आहे. या काळात आरोपी तर दूरच पण पोलिसांना साधे गुन्ह्यामागील कारणही शोधता आलेले नाही. त्यामुळे जिल्हा पोलिसांची ‘तपास क्षमता’ संपली आहे की काय अशी शंका सर्वसामान्य नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे. या प्रकरणाचा तपास करणार्या पथकांना अद्यापही तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि खबर्यांचे नेटवर्क कार्यान्वीत करुनही तपासाची दिशाच सापडत नसल्याचे चित्र सध्या संगमनेर तालुक्यात बघायला मिळत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या मनात पोलिसांच्या कार्यपद्धतीविषयी शंका निर्माण झाली आहे.

संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील अवघ्या 12 वर्षीय चिमुरडीवर झालेला ‘अॅसिड हल्ला’ संपूर्ण समाजाच्या सुरक्षिततेवर झालेला आघात आहे. या घटनेचे तीव्र पडसाद थेट राज्याच्या सर्वोच्च सभागृहांमध्ये उमटल्यानंतर पोलिसांकडून या प्रकरणातील आरोपीच्या मुसक्या आवळल्या जाणं अपेक्षित होतं. मात्र विशेष पोलीस महानिरीक्षकांपासून अपर अधिक्षकांपर्यंतच्या वरीष्ठ अधिकार्यांनी घटनास्थळ, पीडित आणि तपास पथकांशी वारंवार चर्चा करुनही दोन अधिकारी आणि 40 कर्मचार्यांसह स्थानिक गुन्हे शाखेला या घटनेमागील कारणांचाही शोध घेता आलेला नाही. त्यावरुन जिल्हा पोलिसांचा गुन्हेगारांवरील दरारा संपला की तपासाची चाकेच गंजली अशी शंका आता सर्वसामान्य नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे.

