पठारभागातील शेतकरी सततच्या संकटांनी त्रस्त दिवाळी साजरी करण्याचा शेतकर्यांना पडला प्रश्न
नायक वृत्तसेवा, घारगाव
ढगफुटीसदृश्य पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान, जनावरांना लम्पीची लागण त्यात भर म्हणून पिकांना बाजारभावही नाही. अशा संकटांनी त्रस्त असलेल्या संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील पोखरी बाळेश्वर येथील शेतकरी हतबल झाले आहेत. पीक पाहणी करावी तर अनेक तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे करावे तरी काय असा प्रश्न पडला असून, दोन-तीन दिवसांवर दिवाळीचा सण येऊन ठेपलेला आहे, मात्र नुकसानीने आर्थिक गणित कोलमडल्याने सण करावा साजरा करावा असा प्रश्न सतावू लागला आहे.
पठारभाग हा नेहमीच दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. या भागातील पोखरी बाळेश्वर येथील शेती ही निसर्गावरच अवलंबून असते. पावसाळ्यात मात्र येथे पाणीच पाणी पाहावयास मिळत. मात्र उन्हाळात येथील नागरिकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागतो. यावर्षी पावसाने परिसरात अक्षरशः थैमान घातले. त्यामुळे सोयाबीन, कांदा, भुईमूग या पिकांसह भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतांना तळ्याचे स्वरूप येवून बांधही फुटून गेले आहेत. यापूर्वी पंचनामे झाले. मात्र ते सरसकट केले नाही. आता पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने सरसकट करावे अशी मागणी केली आहे.
अधूनमधून धुके पडत असल्याने कांद्यांना पिळ पडला आहे. या संकटात अधिक म्हणून लम्पीचा फैलावही वाढला आहे. लम्पीच्या प्रादुर्भावाने काही जनावरे दगावली देखील आहेत. एकीकडे सरकार शेतकर्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे असल्याचे म्हणते. परंतु, प्रत्यक्षात शेतकरी अक्षरशः संकटात बुडालेला आहे, त्याला तत्काळ मदतीची गरज आहे. मात्र, शासकीय धोरणांमध्येच शेतकरी अडकत आहे. पीक पाहणीसाठी देखील मोबाइलला नेटवर्क मिळत नाहीये. आता दोन-तीन दिवसांवर दिवाळी सण येवून ठेपलेला आहे. त्यामुळे सण कसा साजरा करवा असा प्रश्न पडला असल्याची प्रतिक्रिया सरपंच सुनील काळे, पोखरी बाळेश्वर सोसायटीचे अध्यक्ष तुकाराम फटांगरे, भाऊसाहेब खरात यांच्यासह शेतकर्यांनी दिली आहे.