अहिल्यानगर ‘हनीकांड’ प्रकरणाचा मास्टरमाईंड बाळ बोठे जामीनावर! तब्बल पाच वर्षानंतर ‘सर्वोच्च’ दिलासा; ‘रेखा जरे’नावाच्या हनीचा घडवला होता खून..

नायक वृत्तसेवा, अहिल्यानगर
अहिल्यानगर शहरातील बडे उद्योजक, व्यापारी आणि मोठ्या आसामींना हेरुन त्यांना सुरुवातीला प्रेमपाशात अडकवून नंतर त्यांच्याकडून कोट्यवधी रुपयांची वसुली करण्याच्या आणि सरतेशेवटी भविष्यातील कायदेशीर अडथळा नको म्हणून चक्क संपूर्ण कांडात वापरलेल्या हनीचाच काटा काढण्याच्या प्रकरणी गेल्या पाच वर्षांपासून कारागृहात असलेल्या ज्येष्ठ पत्रकार बाळ बोठे याला अखेर सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. या प्रकरणाचा तपास पूर्ण होवून आरोपपत्रही दाखल झाले आहे, मात्र प्रदीर्घकाळ सुनावणी खोळंबल्याने आरोपीला जामीन मंजूर करावा या बचाव पक्षाच्या युक्तिवादाला सहमती दर्शवताना न्यायालयाने बोठेला जामीन दिला असून यंदाची त्याची दिवाळी कुटुंबियांसोबत साजरी होणार आहे. नोव्हेंबर 2020 मध्ये रात्री अहिल्यानगर पुणे महामार्गावरील जातेगाव घाटात घडलेल्या या हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. त्यात दैनिक सकाळचे तत्कालीन अहिल्यानगर आवृत्तीचा संपादकच मास्टरमाईंड असल्याचे आढळून आल्यानंतर राज्यात राजकीय भूकंपही झाला होता.

पाच वर्षांपूर्वी 30 नोव्हेंबर 2020 रोजी तत्कालीन यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या रेखा जरे यांची पारनेरजवळील जातेगाव घाटात गळा चिरुन निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी जरे यांच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता. जरे या पुण्याहून नगरकडे येत असताना मोटारसायकलवरुन आलेल्या दोघांनी त्यांची कार अडवून त्यांच्याशी वादावादी केली व त्याचवेळी एका हल्लेखोराने धारदार शस्त्राने त्यांचा गळा चिरुन त्यांची हत्या केली. यावेळी जरे यांच्यासोबत त्यांची आई, मुलगा व त्यांची एक मैत्रिणही होती.

हत्येनंतर जरे यांच्या मुलाने आपल्या मोबाईलमध्ये दोघांतील एका हल्लेखाराचे छायाचित्र काढले होते, त्यावरुनच पोलिसांनी हत्येच्या दुसर्याच दिवशी श्रीरामपूर व राहुरीतून दोघांना अटक केली होती. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीतून आणखी तिघांची नावे समोर आल्यानंतर त्यांनाही अटक करण्यात आली. पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता पत्रकार बाळ बोठे या हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार असून सागर भिंगारदिवे याच्या मार्फत त्याने जरे यांच्या हत्येचा कट रचल्याचे समोर आले.

या प्रकरणात पोलिसांनी सविस्तर तपास करुन घटनेनंतर तब्बल चार महिन्यांनी थेट हैद्राबाद येथून पत्रकार बाळ उर्फ बाळासाहेब जगन्नाथ बोठेला अटक केली होती. ज्ञानेश्वर उर्फ गुड्डू शिवाजी शिंदे (श्रीरामपूर), फिरोज राजू शेख (राहुरी), आदित्य सुधाकर चोळके (कोल्हा बु.), सागर भिंगारदिवे, ऋषीकेश पवार (दोघेही नगर), यांना सुरुवातीलाच अटक झाली होती. तर, बोठे पसार असताना त्याला आर्थिक मदत पुरवणार्या महेश वसंत तनपुरे (नगर) व हैद्राबादमध्ये लपून बसण्यात त्याला साथ देणार्या जनार्दन अंकुला चंद्रप्पा, राजशेखर अजय चाकली, पी.अनंतलक्ष्मी व्यंकट सुब्बाचारी, शेख इस्माईल शेख अली व अब्दुल रहेमान अब्दुल आरिफ (सर्व रा.हैद्राबाद) यांना त्यानंतर अटक करुन वर्षभरात त्यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल झाले होते.

अहिल्यानगर शहरात प्रचंड गाजलेल्या ‘हनीट्रॅप’ प्रकरणाची वृत्तमालिका प्रसिद्ध केल्याच्या रागातूनच आपणास या प्रकरणात गोवल्याचा कांगावा पत्रकार बोठे याने कोठडीतील तपासादरम्यान केला होता. मात्र पोलिसांनी परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारावर अतिशय बारकाईने तांत्रिक तपास करुन हत्येचे मूळ गाठले. जरे यांच्यासोबतच्या प्रेमप्रकरणातून दररोज होणार्या वादावादीला वैतागून बोठेनेच त्यांची हत्या घडवून आणल्याचे पोलिसांनी आपल्या तपासातून समोर आणले. या हत्याकांडाच्या आरोपाखाली पारनेर पोलिसांनी एकूण 12 जणांविरोधात 1 हजार 150 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. नगर न्यायालयात त्यावरील सुनावणी सुरु आहे.

या दरम्यान बोठे याने उच्च न्यायालयातून जामीन फेटाळला गेल्यानंतर विधिज्ञ कैलास औताडे, महेश तवले व संजय दुशींग यांच्यामार्फत सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्यावरील सुनावणीत बचावपक्षाने दाखल झालेले आरोपपत्र आणि पूर्ण झालेला तपास या मुद्द्यावर भर देत गेल्या पाच वर्षांपासून कारागृहात असलेल्या आरोपीच्या वर्तणुकीचा दाखला देत जामीन देण्याची विनंती केली, ती ग्राह्य धरुन न्यायालयाने रेखा जरे हत्याकांडाचा मास्टरमाईंड बाळ बोठे याला जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे तब्बल पाच वर्षांनी त्याला आपल्या कुटुंबियांसमवेत दिवाळी साजरी करता येणार आहे.

