नायक वृत्तसेवा, संगमनेर 
यशवंतराव चव्हाण यांचे वारसदार अशी ओळख असलेले महाराष्ट्राचे सुसंस्कृत नेते बाळासाहेब थोरात यांना धमकी देणाऱ्या तथाकथित कीर्तनकार संग्राम भंडारे यांच्या निषेधार्थ व संगमनेरात अशांतता निर्माण करणाऱ्या जातीयवादी शक्ती विरोधात तमाम संगमनेरकर हिंदू समाज, विविध पुरोगामी संघटना, अध्यात्मिक मंच, महाविकास आघाडी यांच्या वतीने आज गुरुवार दि.२१ ऑगस्ट  रोजी सकाळी ९ वाजता  सद्भावना शांती मोर्चा होणार असल्याची माहिती काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अजय फटांगरे व विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
या सद्भावना शांती मोर्चात सकल हिंदू समाज, वारकरी संप्रदाय, युवक मंडळे, गणेश मंडळे, संत ज्ञानोबा तुकोबा वारकरी मंडळ, अध्यात्मिक मंच, वारकरी सेवा संघ, महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, आरपीआय, शेतकरी संघटना, कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी पक्ष, बहुजन विकास आघाडी, यांच्यासह साहित्य मंच, विविध महिला संघटना, पुरोगामी संघटना, विद्यार्थी संघटना, यांच्या कार्यकर्त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध करून अशा विघातक शक्तीविरोधात एकजुटीने लढण्यासाठी आज गुरुवार दि. २१ ऑगस्ट  रोजी सकाळी ९ वाजता यशोधन कार्यालय ते संगमनेर बसस्थानक असे  शांती मोर्चाचे आयोजन केले आहे.
 गुरुवारी होणाऱ्या या  शांती मोर्चामध्ये तमाम स्वाभिमानी संगमनेरकर, हिंदू समाज, युवक संघटना, महिला संघटना, पुरोगामी संघटना व विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन सर्व सेवाभावी संघटनांच्या वतीने करण्यात आले आहे.
जनतेच्या श्रद्धेचा फायदा घेऊन तथाकथित कीर्तनकार म्हणून फिरणारा संग्राम भंडारे हा राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आहे. कोणत्याही हिंदू संघटनेने अशा वारकरी संप्रदायाचा अपमान करणाऱ्या व्यक्तीचे समर्थन करू नये. कारण आपला धर्म आणि वारकरी संप्रदाय असा नाही. काही लोक त्याच्या संरक्षणाची मागणी करत असून हे अत्यंत चुकीचे आहे. या तथाकथित कीर्तनकार म्हणून घेणाऱ्या राजकीय पोपट असणाऱ्या संग्राम भंडारे याला कठोर शिक्षा करावी अशी मागणी विविध स्तरातून होत  आहे.