संगमनेरच्या रस्त्यारस्त्यावरील विकास ठरतोय सामान्यांना अडथळा! अनेक व्यापार्यांना बोहणीची प्रतिक्षा; पालिकेकडे मात्र नियोजनाचा अभाव..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
प्रशासकीय कारकीर्दीत थंडावलेल्या ‘विकासकामांना’ विधानसभा निवडणुकीनंतर अचानक वेग आला असून भूयारी गटारांच्या नावाखाली शहरातील अनेक रस्त्यांचे पोस्टमार्टम सुरु आहे. त्यातही पालिकेला कामं उरकण्याची घाई झाल्याने एकाचवेळी अनेक रस्त्यांवर खोदकाम करण्यात आले आहे. मात्र या सगळ्यात नियोजन नावाचा प्रकार कोठेही दृष्टीस पडतं नसल्याने जागोजागी वाहतुकीचा खोळंबा होवून सामान्य वाहतुकदार, महिला, विद्यार्थी व ज्येष्ठांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यातही गेल्या आठ दिवसांपासून संपूर्ण बाजारपेठच उकरुन काढली गेल्याने अनेक व्यापार्यांना बोहणीसाठीही ग्राहकांची प्रतिक्षा करण्याची वेळ आली आहे. पालिकेने रस्त्याचे महत्त्व आणि तो बंद झाल्यास त्याचा शहराच्या अर्थकारणावर होणारा परिणाम याचा विचार करुनच वेळेत कामं पूर्ण करण्याची गरज नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
तीन वर्षांपूर्वी डिसेंबर 2021 मध्ये संगमनेर नगरपरिषदेच्या लोकनियुक्त सदस्यांची मुदत संपली. तेव्हापासून पालिकेवर प्रशासकांचे राज्य आहे. ज्यावेळी पालिकेवर प्रशासकांची नेमणूक झाली त्यावेळी जशी शहरातंर्गत रस्त्यांची अवस्था होती तशीच स्थिती आजही कायम आहे. मात्र यावेळी पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका तोंडावर दिसत असल्याने सत्ताधारी आणि विरोधक अशा दोहींकडून प्रभागनिहाय प्रलंबित असलेली कामं पूर्ण करण्यासाठी प्रशासकांवर मोठा दबाव निर्माण केला जात आहे. गेल्या आठवड्यात साडेतीन दशकांपासून पालिकेवर एकहाती वर्चस्व गाजवणार्या काँग्रेसच्या माजी नगराध्यक्षांसह अर्धाडझन माजी नगरसेवकांनी नेलेला मोर्चा याचे सर्वोत्तम उदाहरण ठरले आहे. या मोर्चानंतर शहरातील ‘विकासकामांना’ गती आली असून अचानक झोपेतून उठवले गेल्याप्रमाणे पालिका प्रशासन विकासाच्या नावाने सैरभैर झाल्याचे चित्रही बघायला मिळत आहे.
स्वच्छ भारत अभियानात सहभागी होवून शहर स्वच्छतेच्या दिशेने अग्रेसर झालेल्या संगमनेरात जवळपास शंभर कोटी रुपयांच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पालाही मंजुरी प्राप्त आहे. त्यासाठी केंद्र आणि राज्य अशा दोन्ही सरकारांकडून मोठा निधीही मिळत आहे. शहराच्या भौगोलिक रचनेनुसार ज्या भागात या प्रकल्पाची उभारणी होणं आवश्यक आहे, त्याभागात शहरातून जमा होणारे संपूर्ण सांडपाणी वाहुन नेण्याची व्यवस्था आवश्यक असल्याने शहरातील सर्वच गटारांची कामं होणं क्रमप्राप्त आहे. मात्र हा प्रकल्प आपल्या परिसरात झाला तर दररोज दुर्गंधी आणि रोगराईचा सामना करावा लागेल असा गैरसमज होवून प्रस्तावित प्रकल्पाच्या आसपासच्या रहिवाशांनी त्याला जोरदार विरोध दर्शवला. हा संपूर्ण परिसर पालिकेतील सत्ताधारी गटाच्या पाठीशी उभा राहणारा असल्याने त्यांनीही त्यांचा विरोध डावलून पुढे जाण्याची हिम्मत केली नाही. परिणाम गेल्या चार वर्षांपासून शहरातील भूयारी गटार पालिकेतील कागदांवरच वाहत असल्याचे चित्रही बघायला मिळत होते.
यावेळी मात्र मूड बदललेल्या संगमनेर तालुक्यातील नागरिकांनी विधानसभेत अशक्य वाटणारे परिणाम घडवून दाखवल्याने पालिकेतील सत्ताधारीही सावध झाले आहेत. त्यामुळे विधानसभेची आचारसंहिता हटताच अचानक जागा झालेला ‘विकास’ शहराच्या रस्त्यारस्त्यावरुन सैरभैर होत धावू लागला आहे. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या विरोधामुळे गेली चारवर्ष खोळंबलेल्या भूमिगत गटारांच्या कामांना आता एकामागून एक वेग दिला जात असून नेहमीच खराब आणि खड्डेमय स्थिती अनुभवणार्या ऐतिहासिक बाजारपेठेसह मोठ्या वर्दळीच्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते मोमीनपूर्यापर्यंतचा रस्ताही गेल्या अनेक दिवसांपासून वारंवार उकरला जात आहे. त्यातच या रस्त्यांना संलग्न असलेल्या अन्य रस्त्यांची कामेही एकाचवेळी सुरु करण्यात आल्याने पर्यायी रस्ता शोधताना नागरिकांची अक्षरशः दमछाक होत आहे.
अरुंद रस्त्यामुळे काहीशा मागे पडलेल्या संगमनेरच्या ऐतिहासिक बाजारपेठेची अवस्था तर अत्यंत बिकट असून पडताणी यांच्या निवासस्थानापासून संपूर्ण रस्ता दोन ते तीन फुटापर्यंत खोदून काढला गेल्याने अनेक दुकानं रस्त्यापासून तीन ते पाच फूट उंचावर गेली आहेत. त्यातही फुटलेल्या नळांचे, गटाराचे पाणी थेट रस्त्यावरुन वाहत खोदून ठेवलेल्या रस्त्यावरच साचत असल्याने सर्वत्र घाण आणि चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. या रस्त्यावरुन पायी चालणंही जिकरीची बनल्याने गेल्या आठ दिवसांपासून दुचाकीस्वार बाजारपेठेच्या दिशेने फिरकतानाही दिसत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे अनेक दुकानदारांना सकाळपासूनच ग्राहकांची प्रतिक्षा असून काहींना तर बोहणीसाठीही (सुरुवातीची रोख खरेदी) ग्राहकांची प्रतिक्षा करीत तिष्ठत बसण्याची वेळ आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापासून शहरात येणार्या रस्त्याची अवस्थाही यापेक्षा वेगळी नाही. आधी भूयारी गटारांसाठी आणि नंतर पावसाचे पाणी वाहुन जाण्यासाठी अशा दोन-दोनवेळा हा रस्ता खोदला गेल्याने गेल्या मोठ्या कालावधीपासून या रस्त्याचा वापर करणार्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यातही खराब असलेल्या रस्त्यांवरही फेरीवाले, फळांवाले, कापडं अथवा अन्य वस्तू विकणार्यांनी रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत आपापल्या सरकारी जागांवरील ताबा कायम ठेवल्याने सामान्य संगमनेरकरांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. त्यातून पालिकेने किमान वर्दळीच्या रस्त्यांवर काम करताना सामान्यांना त्याचा त्रास होणार नाही याची काळजी घेण्याची आवश्यकता असताना नेमकं त्याकडेच दुर्लक्ष केले जात असल्याने पालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे सामान्य पादचारी, विद्यार्थी व दुचाकीस्वारांसह वाहनधारकांनाही प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.
पूर्वी रहदारीच्या रस्त्यावरील भूमिगत गटार, पाईपलाईन अथवा रस्त्याचे काम करायचे असल्यास ते रात्रीच्यावेळी केले जात. त्यामुळे सर्वसामान्यांना त्याचा कमितकमी त्रास होत असतं. मात्र अलिकडच्या काळात प्रशासनाकडून सामान्यांचा विचारच दूरापास्त झाल्याने खोदलेले रस्ते अनेक दिवस तसेच पडून राहतात. त्याचा विद्यार्थी, महिला व ज्येष्ठांसह व्यापार्यांनाही मोठा त्रास होत असून अनेक व्यापार्यांना तर बोहणीसाठीही तिष्ठावे लागण्याची वेळ आली आहे. यासर्व गोष्टींचा विचार करुन पालिका प्रशासनाने विकासाच्या नावाखाली रस्त्यांवर कामे करताना सामान्य माणसाला समोर ठेवून कामाचे नियोजन करण्याची आवश्यकता आहे.