संगमनेरातील ‘एमडी’ तस्करीला पोलिसांचे पाठबळ? महिना उलटत असतानाही तपास शून्य; पुरवठा साखळी शोधण्यातही अपयश..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
मागील काही दिवसांत संगमनेर शहरात अमलीपदार्थांवरुन राजकारण तापले असून पोलीस कारवायांमधून जेरबंद होणार्‍या ड्रग्स तस्करांची नावे एकमेकांशी जोडण्याची जणू स्पर्धाच सुरु झाली आहे. अशातच गेल्या महिन्यात पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत अतिशय घातक समजला जाणारा 103 ग्रॅम ‘एमडी’ हस्तगत झाला होता. या प्रकरणात संगमनेरातील जावेद हबीब नावाचे केशकर्तनालय चालवणार्‍या आशीष सुनीलदत्त मेहेरे या व्हाईट कॉलर माफियाला मुद्देमालासह अटकही झाली होती. त्यातून शहरात वाढत असलेल्या या अमलीपदार्थाच्या व्यापार व वापरावर मर्यादा येतील अशी अपेक्षा असताना शहर पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे ती आता फोल ठरु लागली आहे. जवळपास महिन्यापूर्वी झालेल्या या कारवाईनंतर वास्तविक पोलिसांनी आजच्या तरुणांना उध्वस्त करणार्‍या या घातक अवैध धंद्याची पाळेमूळे खणून काढण्याची गरज होती. प्रत्यक्षात मात्र पोलिसांनी या पदार्थाची पुरवठा साखळी शोधण्याचे सोडून अटक केलेल्या आरोपीकडून ‘एमडी’ घेवू इच्छिणार्‍या दोघांना अटक करीत आपलीच पाठ थोपटून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचवेळी इतक्या मोठ्या प्रमाणात हस्तगत झालेला ‘एमडी’ आरोपीने कोठून आणला होता याकडे दुर्लक्ष केल्याने शहरात वाढत असलेल्या या व्यवसायाला पोलिसांचे तर पाठबळ नाही? अशी शंका निर्माण झाली आहे.


पुणे, नाशिक आणि ठाणे जिल्ह्याच्या हद्दिला खेटणार्‍या संगमनेर तालुक्यात गेल्या काही वर्षात पारंपरिक अमलीपदार्थांसह अतिशय घातक समजल्या जाणार्‍या ‘मेफोड्रोन’ (एमडी) या अमलीपदार्थाची तस्करी मोठ्या प्रमाणात वाढल्याचे वारंवार समोर येत आहे. अशातच गेल्या महिन्यात 21 नोव्हेंबररोजी नाशिकचा ‘एमडी’ तस्कर संगमनेरात येणार असल्याची कथीत गोपनीय माहिती मिळाल्याने पोलीस उपअधिक्षक कुणाल सोनवणे व पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी मोठ्या फौजफाट्यासह पहाटेच्या सुमारास सापळा लावून नाशिकच्या दिशेने अतिशय अलिशान वाहनातून (टोयाटो फॉर्च्युनर) आलेल्या आशीष सुनीलदत्त मेहेरे (वय 28, रा.पुष्पवृष्टी बंगला, शिवाजीनगर, सातपूर, नाशिक) या ड्रग्स माफीयाच्या मुसक्या आवळल्या. या कारवाईत पोलिसांना त्यांच्या अंगझडतीत ‘एमडी’ ड्रग्स आढळून आले.


तर, दाखल फिर्यादीत वाहनाच्या तपासणीत चालका शेजारील आसनासमोर असलेल्या डीकीतही पांढर्‍या रंगाची पावडर असलेली पाकिटं असल्याचा उल्लेख केला गेला. प्रत्यक्षात मात्र हस्तगत केलेल्या मुद्देमालात त्याचा समावेश आहे किंवा कसे याबाबत कोणतीही स्पष्टता नसल्याने फिर्यादीत वाहनातील मुद्देमालाबाबत झालेला उल्लेख अनावधानाने झाला की, नंतर तो साठा लपवण्यात आला याबाबत शंकाही निर्माण झाली होती. मात्र पोलिसांनी एमडीसह आरोपी अटक केल्याने त्या गदारोळात हा विषय मागे पडला. या कारवाईनंतर पकडलेला आरोपी आशीष मेहेरे हा संगमनेरातील जाणताराजा मैदानाजवळील ‘जावेद हबीब’ हे युनिसेक्स सलून चालवत असल्याचेही समोर आले, त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्यही शतपटीने वाढल्याने आरोपीच्या चौकशीतून त्याच्याकडून अमलीपदार्थ विकत घेणार्‍या ग्राहकांसह आरोपी सदरचा पदार्थ कोठून आणतो याचाही उलगडा होईल व संगमनेरातील एमडी या घातक अमलीपदार्थाच्या वितरणाची संपूर्ण पुरवठा साखळी उघड होईल अशी सर्वसामान्यांना अपेक्षा होती.


त्यानुसार पोलिसांनी पुढील दोन दिवसांत तपासाला गती देत आरोपी आशीष मेहेरे याच्याकडून ड्रग्स खरेदी करणार्‍या संगमनेरातील सोहेल शेख व सद्दाम शेख या दोघांनाही अटक केली. मात्र मेहेरे याने सदरील ड्रग्स कोठून आणले?, तो किती वर्षांपासून या गोरखधंद्यातून तरुणपिढी बर्बाद करण्याचे काम करीत आहे?, त्याच्याशिवाय अन्य कोणी या उद्योगात सामील आहे का?, ड्रग्स विकण्यासाठी त्याने ‘जावेद हबीब’ या सलूनचा वापर केलाय का?, संगमनेरातील आणखी किती आरोपींनी त्याच्याकडून ड्रग्स विकत घेतले आहेत? अशा अनेक प्रश्‍नांची उत्तरे मात्र कारवाई होऊन जवळजवळ महिना उलटत असतानाही मिळत नसल्याने एकंदरीत तपासावरुन पोलिसांबाबतच संशय बळावला असून शहरातील ड्रग्स तस्करीला पोलिसांचेच पाठबळ तर नाही? अशी शंका निर्माण झाली आहे.


वास्तविक संगमनेरात सत्ता परिवर्तन घडल्यापासून गेल्या वर्षभरात अमलीपदार्थ तस्करीचे एकामागून एक प्रकार समोर येत आहेत. त्यातून समोर येणार्‍या आरोपींची नावे सत्ताधारी आणि विरोधकांशी जोडण्याची परस्पर स्पर्धाही सुरु झाल्याने संगमनेरातील वातावरण ढवळून निघालेले असताना किमान राजकीय दबावातून पोलीस या प्रकरणाच्या मूळाशी जातील अशी सर्वसामान्यांना अपेक्षा होती, मात्र गेल्या महिनाभरातील पोलिसांचा तपास पाहता ती फोल ठरली असून जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी या प्रकरणाकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे.


पूर्वी कोल्हार (ता.राहाता) येथे असणारे गांजा तस्करीचे केंद्र दीड दशकांपूर्वी तत्कालीन जिल्हा पोलीसप्रमुख कृष्ण प्रकाश यांनी उध्वस्त केले होते. त्यानंतर नेवासा आणि संगमनेर परिसरात गांजा तस्करांनी आपले बस्तान बसवल्याचे बोलले जाऊ लागले. या दरम्यान कोतवाली पोलीस ठाण्याचे तत्कालीन निरीक्षक राकेश मानगांवकर यांनी थेट आंध्रप्रदेशातून अलिशान वाहनातून गांजाची वाहतूक उघड करुन संगमनेरातील एका ‘लेडी डॉन’सह पाचजणांना अटक केली होती. मात्र कारवाईनंतर त्यांनीही तस्करांशी ‘स्नेहपूर्ण‘ संबंध निर्माण केल्याने त्यांना ‘त्या’ प्रकरणात निलंबितही व्हावे लागले होते. तेव्हापासून संगमनेरात ‘ती’ लेडी डॉन राजरोसपणे गांजा वितरणाची साखळी चालवते हे लपून राहिलेले नाही. त्यातच आता ‘एमडी’च्या बाबतीतही पोलिसांकडून जाणीवपूर्वक खोलवर तपास होत नसल्याचे समोर येत असून त्यातून गांजाप्रमाणेच या गोरखधंद्याला पोलिसांचे तर पाठबळ नाही अशाही शंका निर्माण होत असून तरुण पिढीला जीवनातून संपवणार्‍या या अमलीपदार्थाबाबत शून्य सहनशिलता सांगणार्‍या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सभागृहातील वक्तव्य सत्य ठरवण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनीच या प्रकरणाकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.

Visits: 155 Today: 2 Total: 1415451

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *