यापुढील वाटचालही काँग्रेसच्या विचारातूनच करणार : आ. थोरात संगमनेरकरांशी ‘ऑनलाईन’ संवाद; महिन्याभरातील राजकारणावरही स्पष्ट भाष्य..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
आपल्या आजारपणाच्या काळात विधान परिषदेची निवडणूक झाली. त्यात खूप राजकारणही झाले. सत्यजीत तांबे मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाले, त्यांचे अभिनंदन. मात्र या दरम्यान ज्या पद्धतीचे राजकारण झाले ते व्यथीत करणारे होते. यासर्व गोष्टी पक्षीय राजकारणातील असल्याने त्यावर बाहेर चर्चा व्हावी असे आपले मत नसल्याने याबाबत आपण पक्षश्रेष्ठींना आपल्या भावना कळविल्या आहेत. पक्ष आणि आपल्या पातळीवर जो करायचा तो योग्य निर्णय होणारच असून काळजी करण्याचे कारण नाही. काँग्रेसचा विचार हा आपला विचार आहे. त्या विचारातून आजवरची आपली वाटचाल झाली आहे आणि पुढेही ती सुरु राहील अशी ग्वाही काँग्रेस विधीमंडळाचे नेते, आमदार बाळासाहेब थोरात यांनी रविवारी दिली.
ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘शिंदेशाही’ या कार्यक्रमादरम्यान त्यांनी थेट मुंबईतील रुग्णालयातून संगमनेरकरांशी ‘ऑनलाईन’ संवाद साधला, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी बोलताना थोरात यांनी 26 डिसेंबर रोजी नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान घडलेल्या अपघाताची आणि त्यातून झालेल्या गंभीर दुखापतीची माहिती यावेळी संगमनेरकरांना दिली. या कार्यक्रमासाठी संगमनेरला जावं आणि जनतेला भेटावं असं मनात असताना उपचार करणार्या डॉक्टरांनी प्रवास टाळण्याचा सल्ला दिल्याने इच्छा असूनही आपणास प्रदीर्घकाळ संगमनेकरांपासून दूर राहावं लागत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
संंगमनेर तालुक्याच्या विकासाची वाटचाल पाहता महाराष्ट्रातील सर्वात चांगल्या तालुक्यांमध्ये संगमनेरचा समावेश होत असल्याचे सांगताना त्यांनी आपल्याकडील सुसंस्कृत राजकारण, शांतता व सुव्यवस्था आदींचे दाखलेही दिले. गेल्या महिनाभरात विधान परिषद निवडणुकीच्या कालावधीत झालेल्या राजकारणाचा उल्लेख करताना त्यांनी सत्ता बदलानंतर संगमनेरवर सूड उगवण्याच्या हेतूने एकामागून एक हल्ले केले जात असल्याचे सांगितले. कार्यकर्त्यांना त्रास दिला जात आहे, त्यांना अडचणीत आणण्याचे प्रकार सुरु आहेत, त्यांचे उद्योग-व्यवसाय बंद करुन संगमनेरात सुरु असलेल्या विकास कामांमध्ये अडथळे निर्माण केले जात असल्याचे ते म्हणाले.
संगमनेर तालुक्याने नेहमीच संघर्ष केल्याचे सांगतांना त्यांनी निळवंडे धरण आणि प्रवरा नदीच्या पाणी वाटपावरुन झालेल्या संघर्षाचे दाखले देत त्यातूनही आपण यश मिळविले. तसेच यश यावेळच्या संघर्षातूनही मिळेल असे सांगत काँग्रेसचा विचार हा आपला विचार आहे. मधल्या काळात काही बातम्यांनी आपल्याला थेट भारतीय जनता पक्षापर्यंत नेवून पोहोचविल्याबाबत त्यांनी नाराजीही व्यक्त केली. या सर्व गोष्टींतून समाजात गैरसमज निर्माण करुन वेगळ्या चर्चाही घडवण्यात आल्या. मात्र आपल्या सर्वांचा विचार एक आहे, काँग्रेसच्या विचारांनीच आजवरची आपली वाटचाल झाली आहे आणि पुढेही ती याच विचारातून सुरु राहील अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.