सगळचं केंद्राने करायचे मग तुम्ही सत्तेवर राहता कशाला? ः विखे श्रीरामपूरमध्ये वयोश्री योजनेच्या शुभारंभ प्रसंगी जोरदार टीका

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
राज्य सरकार कोरोना लस खरेदी करायला निघाले होते. परंतु सरकारचा धनादेश (चेक) कुठे हरवला, हे शोधावे लागेल. राज्य सरकारने अद्याप सामान्य नागरिकांच्या हिताचा कुठलाही निर्णय घेतला नाही. केवळ सत्तेवर ढिम्मपणे बसले आहे. सर्व काही केंद्राने करावे हीच त्यांची अपेक्षा असेल, तर सत्तेवर राहता कशाला, असा सवाल माजी मंत्री तथा आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.

देश स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्यानिमित्ताने व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून केंद्र सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी वयोश्री योजना आणली आहे. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या पुढाकारातून जनसेवा फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग विभागातर्फे येथे वयोश्री योजनेद्वारे विविध साधनांकरीता आयोजित तपासणी शिबिर रविवारी (ता.17) पार पडले. त्यात ते बोलत होते. माजी सभापती नानासाहेब पवार, दीपक पटारे, नानासाहेब शिंदे, प्रकाश चिते, केतन खोरे, भाऊसाहेब बांद्रे, शरद नवले, कल्याणी कानडे, सुनील साठे, गिरीधर आसने, दीपक बारहाते उपस्थित होते.

शहर व तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांचा शिबिरास चांगला प्रतिसाद मिळाला. आमदार विखे पाटील यांनी प्रत्येक कक्षात पाहणी करून तपासणीसाठी आलेल्या नागरिकांची चौकशी केली. राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणावर विखे पाटील यांनी टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला प्रत्येक निर्णय देशातील नागरिकांना समर्पित झाला आहे. केंद्राने मोफत कोविड लस उपलब्ध करुन दिली, असेही त्यांनी सांगितले.

विखे परिवारावर श्रीरामपूरचे कायमच प्रेम..
पद्मभूषण खासदार बाळासाहेब विखे पाटील यांच्यावर श्रीरामपूर तालुक्याने नेहमीच प्रेम केले. त्या प्रेमाची कृतज्ञता म्हणून वयोश्री योजनेचा प्रारंभ येथून केला. पुढील आठवड्यात राहाता, संगमनेर येथेही शिबिराचे आयोजन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
