शक्य तेथे सोबत, अशक्य तेथे स्वबळावर लढणार : खेवरे संगमनेर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची बैठक
नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून एकामागून एक नैसर्गिक संकटांची मालिकाच सुरू आहे. सुरुवातीला कोविडचे संकट आदळले, त्यानंतर अतिवृष्टीचा फटका बसला मात्र या काळातही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तम प्रकारे राज्याचे पालकत्त्व सांभाळले. या काळात त्यांनी शेतकरी, कामगार, मजूर यांच्या हिताचे निर्णय घेत त्यांना दिलासा देण्याचे काम केले. विविध योजनांच्या माध्यमातून सामान्य माणसाचे जीवन सुखद् करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत हे सगळे घटक आपली साथ देणार आहेत. राज्यात महाविकास आघाडी असल्याने जेथे शक्य आहे तिथे सोबतीला आणि जेथे अशक्य आहे तेथे स्वबळावर निवडणुका लढवाव्यात असे आवाहन शिवसेनेचे उत्तर नगर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांनी सोमवारी (ता.21) येथे केले.
आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची भूमिका स्पष्ट करण्यासाठी शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसैनिक व इच्छुक उमेदवारांची बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. प्रत्येक गण-गटाशी संपर्क व समन्वय असावा यासाठी त्यांनी कोअर कमिटी स्थान करण्याची सूचनाही यावेळी स्थानिक पदाधिकार्यांना केली.
सध्या राज्यात ग्रामपंचायत निवडणुकांची धामधुम सुरू झाली आहे. संगमनेर तालुक्यातील 94 ग्रामपंचायतींच्या निवडणुकाही यावेळी होत आहेत. यातील काही क्षेत्र अकोले मतदार संघाशी तर काही शिर्डी मतदार संघाशी संलग्न आहेत. त्यामुळे अशा 14 ग्रामपंचायतींवर संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष्य केंद्रीत झालेले असते. वर्षभरापूर्वी महाविकास आघाडीच्या माध्यमातून सत्ता स्थापन करणार्या शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांचे सरकार आल्यानंतरची ही सर्वात मोठी निवडणूक असणार आहे. शिवसेना पक्षप्रमुखांनीही ग्रामपंचायत निवडणुकी संदर्भात कामाला लागायचे आदेश दिले आहेत. त्यानुसार या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. तालुक्यातील सर्व शाखाप्रमुख, गण व गटप्रमुखांसह इच्छुक उमेदवारांचीही या बैठकीत उपस्थिती होती.
खासदार लोखंडे यांनीही यापुढील प्रत्येक निवडणुकीत प्रत्येक शिवसैनिकाने आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. आगामी वर्षात देखील ग्रामपंचायतीपासून ते नगरपालिकांपर्यंतच्या निवडणुका होणार आहेत. त्या सर्व निवडणुकांमध्ये प्रत्येकाने झोकून काम करण्याची गरज आहे. आवश्यक असेल ते सर्व सहकार्य करण्याची व्यवस्था करण्यात येईल असेही खासदार लोखंडे यांनी शिवसैनिकांना सांगितले. प्रत्येक विभागाचा परस्परांशी समन्वय असण्याची गरज आहे, त्यासाठी आजी-माजी पदाधिकार्यांसह कोअर कमिटी कार्यान्वीत करुन त्याद्वारे संवदाची प्रक्रीया राबविण्याची सूचना त्यांना केली. ज्येष्ठनेते साहेबराव नवले यांच्या सहकार्याने या समितीने कार्य करावे असेही त्यांनी सांगितले. या बैठकीला शहर व तालुक्यातील शिवसैनिक व ग्रामपंचायत निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्यांची मोठी उपस्थिती होती.
आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे तालुका प्रमुख म्हणून जनार्दन आहेर यांनीच जबाबदारी सांभाळावी असे आवाहन या बैठकीतच खासदार व जिल्हाप्रमुखांनी केले. या संदर्भातील संपूर्ण जबाबदारीही या द्वयींनी त्यांच्यावर सोपविली. विशेष म्हणजे मध्यंतरीच्या काळात आहेर यांनी सेनेच्या तालुकाप्रमुख पदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त पसरले होते, मात्र त्याला कोठूनही दुजोरा मिळू शकला नव्हता. या बैठकीत मात्र ‘ग्रामपंचायत पार पडेपर्यंत’ असा उल्लेख करुन आहेर यांच्यावर जबाबदारी सोपविली गेल्याने त्यांनी आपल्या तालुकाप्रमुखपदाचा राजीनामा दिला होता याला बळकटी मिळाली आहे.