‘बकरी ईद’च्या पार्श्वभूमीवर संगमनेर पोलिसांची ‘स्ट्राईक’! चौघा कसायांवर कारवाई; दोन लाखांचा मुद्देमालही हस्तगत..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
हजारो वर्षांचा इतिहास असलेल्या संगमनेर शहराच्या नावाला डाग लावणार्या गोवंश कत्तलखान्यांवर शहर पोलिसांनी पुन्हा एकदा स्ट्राईक केली. शनिवारी साजर्या होणार्या बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कोठेही गोहत्या होणार नाही याची दक्षता घेताना शहर पोलिसांनी गुरुवारी सकाळपासूनच कत्तलखान्यांच्या परिसरातील हालचालींवर नजर ठेवली होती. सायंकाळ होताहोता संशयीत ठिकाणी हालचाली वाढल्याने टप्प्याटप्प्याने चार ठिकाणी छापे घालीत पोलिसांनी पाच गायींसह नऊ वासरांची सुटका केली. या कारवाईत दोघा ज्ञात कसायांसह एकूण चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपला धार्मिक उत्सव साजरा करताना इतर धर्मियांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची प्रत्येकाने काळजी घ्यावी, सामाजिक सौहार्दाच्या वातावरणातच उत्सवाचा आनंद द्विगुणीत होतो. त्यामुळे आपल्या कृतीतून अशा उत्सवांना गालबोटं लावण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कारवाई केली जाईल असा इशारा पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी दिला आहे.

गेल्याकाही दशकांमध्ये संगमनेर शहराच्या विशिष्ट भागात मोठ्या प्रमाणात बेकायदा गोवंश कत्तलखाने फोफावले आहेत. त्यातच दहा वर्षांपूर्वी राज्यसरकारने कायद्याची मर्यादा वाढवून राज्यात गोवंश श्रेणीत मोडणार्या सर्वच जनावरांची कत्तल करण्यास मनाई केल्याने राज्यात गोवंश हत्या सतत चर्चेत असते. संगमनेरमधील अशा ठिकाणांवरही तेव्हापासूनच सलग कारवाया होवू लागल्याने येथील कत्तलखाने राज्यभर चर्चेत आले. गेल्या दहा-बारा वर्षात संगमनेर शहरात कारकीर्द भूषविलेल्या बहुतेक सर्वच पोलीस निरीक्षकांनी पदभार स्वीकारताना कत्तलखान्यांच्या उच्चाटणाची वल्गना करीत शेवटी येथून जाताना गायींच्या रक्ताचे डागही सोबत नेल्याची उदाहरणे आहेत. कोविड संक्रमणातून सावरत असतानाच 2 ऑक्टोबर 2021 रोजी अहिल्यानगर पोलिसांच्या पथकाने भारतनगरमधील साखळी कत्तलखान्यांवर एकाचवेळी छापे घालीत संगमनेरच्या कत्तलखान्यांचे वास्तव स्वरुप राज्यासमोर आणले.

राज्यात गोवंश हत्याबंदी लागू झाल्यापासून सर्वात मोठी कारवाई ठरलेल्या या घटनेनंतर येथील सामाजिक वातावरणातही बदल घडतं गेले. बजरंगदलासह विविध हिंदुत्त्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून पहिल्यांदाच थेट पोलीस अधिकार्यांवर आक्षेप नोंदवले. यावेळी झालेल्या भाषणांमधून नवाज कुरेशी नामक कसायाच्या वाड्यातून सापडलेल्या वेगवेगळ्या रंगाच्या ‘डायर्या’ आणि त्यातील नमूद नावांचीही जोरदार चर्चा झाली. इतक्या मोठ्या कारवाईने राज्यातील माध्यमांचे लक्ष वेधले गेल्याने हा विषय राज्याच्या पटलावर पोहोचला. त्यामुळे आतातरी येथील गोवंश कत्तलखाने समूळ बंद होतील अशी अपेक्षा असताना या कारवाईनंतरच्या चार वर्षांचा कालावधी पाहता झालेल्या कारवायांचा मागोवा घेता ती फोल ठरल्याचे दिसत आहे. त्यामुळे संगमनेरातील कत्तलखाने आजही ‘तणावा’चे केंद्रच असल्याने वर्षभरातील मोठ्या सणांच्या पार्श्वभूमीवर तरी किमान नियंत्रण रहावे यासाठी शहर पोलिसांची धडपड सुरु असते.

गुरुवारीही अशीच धडपड बघायला मिळाली. उद्या शनिवारी (ता.7) मुस्लिम धर्मियांचा ‘बकरी ईद’ हा वर्षातील मोठा सण आहे. त्या निमित्ताने बळी देण्याची पद्धत असल्याने गायींची अथवा गोवंशाची कत्तल होण्याची शक्यता आहे. असा प्रकार समोर आल्यास शहराच्या शांततेला नख लागण्याची शक्यता असल्याने पोलीस सतर्क झाले आहेत. त्या अनुषंगाने गुरुवारी (ता.5) पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल विशाल करपे, आत्माराम पवार, सोपान बाचकर व अतुल उंडे यांच्यासह शहर पोलिसांच्या पथकाने सकाळपासूनच भारतनगर, कोल्हेवाडी रस्ता, जमजम कॉलनी, मदिनानगर, मोगलपूरा, जूना जोर्वेरोड अशा सर्वच संशयीत ठिकाणांवर नजर ठेवली होती.

सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मदिनानगर परिसरातील आर.के.प्लॉट नावाच्या भागात एकाने कत्तलीच्या हेतूने जनावरे बांधल्याची माहिती पवार यांना मिळाली. त्यांनी लागलीच आपल्या सहकार्यांसह तेथे छापा घातला असता तेथे अत्यंत निर्दयीपणाने कत्तलीच्या वेदीवर ताठारुन बांधलेल्या पाच वासरांची सुटका करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी फरदीन अबरार शेख (रा.मदिनानगर) यांच्याविरोधात कारवाई केली. या घटनेनंतर दोन तासांनी विशाल करपे यांच्या पथकाने जूना जोर्वेरोड रस्त्यावरील म्हसोबाच्या काटवनात छापा घालीत अज्ञात इसमाने बांधून ठेवलेल्या एका गायीसह वासराची सुटका केली.

रात्री आठच्या सुमारास कॉन्स्टेबल बाचकर यांनी कोल्हेवाडी रस्त्यावरील मोना प्लॉट परिसरात झडप घातली. यावेळी त्यांना अज्ञात इसमाने कत्तलीसाठी दोन गायींसह एका वासराला बांधून ठेवल्याचे आढळले. तर, अतुल उंडे यांच्या पथकाला साडेनऊच्या सुमारास जमजम कॉलनीतील फारुक युसुफ सय्यद हा दोन गायी आणि एका वासरासह संशयीतपणे आढळून आला. त्याच्या ताब्यातूनही गोवंशाची सुटका करीत पोलिसांनी दोघा निष्पन्न आरोपींसह चौघांवर महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यातील तरतुदींसह प्राण्यांना निर्दयीपणे वागणूक देण्यास प्रतिबंधक करणार्या अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर सतर्क झालेल्या शहर पोलिसांनी कत्तलीपूर्वीच गोवंश जनावरांचा शोध घेण्यास सुरुवात केल्याने कसायांचे मात्र धाबे दणाणले आहेत.

शनिवारी बकरी ईदचा सण साजरा होत आहे. त्या पार्श्वभूमीवर संगमनेर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला असून गुन्हेगारी कारवाया व गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी छापासत्र सुरु आहे. सार्वजनिक सण-उत्सवातून सामाजिक एकोपा कायम ठेवून प्रत्येकाच्या धार्मिक भावनांचा आदर करण्याची आपली परंपरा आहे. संगमनेर शहराला मोठा इतिहास आहे, या शहरात सर्वच धर्मिय मोठ्या आनंदाने आपापले उत्सव साजरे करतात. या परंपरेला गालबोटं लागणार नाही यासाठी आवश्यक ती पावलं उचलली जात असून सामाजिक सौहार्दाला धक्का लावण्याचा प्रयत्न करणार्यांवर कठोर कारवाई केली जाईल.
रवींद्र देशमुख
पोलीस निरीक्षक, संगमनेर शहर

