वीज कंपनीला ‘त्या’ फांद्या हटवण्याची उपरती दैनिक नायकच्या वृत्ताचा परिणाम; वृत्तीत बदल होण्याची गरज..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
हरितसृष्टी, माझी वसुंधरा, हरित शहरं अशा कितीतरी वाक्यांचा प्रयोग करुन एकीकडे नागरिकांमधील पर्यावरणाच्या जाणीवा जागवल्या जात असताना दुसरीकडे नेहमीच त्रासदायक ठरणार्या वीज कंपनीकडून मात्र या मोहीमेलाच हरताळ फासण्याचा प्रकार सुरु आहे. सामाजिक उपक्रमात नेहमीच पीछाडलेल्या या कंपनीकडून विद्युत वाहिन्यांना अडथळा ठरत असल्याची कारणं सांगत दरवर्षी शहरातील रस्त्यारस्त्यावर आणि गल्लीबोळात लावलेल्या झाडांवर कुर्हाड फिरवली जाते. धक्कादायक म्हणजे त्यासाठी नियुक्त केला जाणारा कथीत लाकूडतोड्या आडहत्यारी पद्धतीने झाडांची छाटणी करुन छाटलेल्या फांद्या रस्त्यावरच सोडून देत असल्याने पर्यावरणासह सर्वसामान्यांनाही त्याचा फटका बसत आहे. दरवर्षी घडणार्या या प्रकाराबाबत वीज कंपनीच्या अधिकार्यांना कोणतेही सोयरसुतक नसल्याने दैनिक नायकने आपली सामाजिक जबाबदारी ओळखून सोमवारी या विषयावर कान उपटल्यानंतर उपरती झालेल्या वीज कंपनीने शहरात जागोजागी अस्ताव्यस्त पडलेल्या झाडांच्या फांद्या उचलण्यास सुरुवात केली.

जगभरात मोठ्या प्रमाणात होणारी जंगलतोड, वारंवार पेटणार्या वणव्यांमधून हजारों हेक्टरवर बेचिराख होणारी वृक्षसंपदा, औद्योगिकीकरणातून वाढलेले वायू प्रदूषण अशा कितीतरी कारणांनी वैश्विक तापमानवाढीचे संकट निर्माण झाले आहे. जगातील अनेक देशांच्या सामान्य तापमानात बदल झाल्याने सृष्टीचक्रही प्रभावित होत असून ऋतुचक्रातही बदल होत आहेत. याच वेगाने पर्यावरणाचा र्हास सुरु राहीला तर येणार्या काही दशकांत निसर्गाचा कोप होण्याची भीती शास्त्रज्ञांनी वर्तविल्यानंतर जागतिक पातळीवरुन सृष्टी वाचवण्याचे प्रयत्न सुरु झाले असून पर्यावरण संवर्धन आणि संरक्षणावर अधिक भर दिला जात आहे.

सर्वसामान्यांमध्ये निसर्ग, पर्यावरणाविषयी जागृती निर्माण करुन राज्यातही व्यापक कार्यक्रम सुरु असताना संगमनेरच्या वीज कंपनीच्या असंवेदनशीलतेतून मात्र या प्रयत्नांनाच नख लावण्याचा प्रकार सुरु आहे. संगमनेर नगरपालिकेने काही खासगी आस्थापना, संस्था व नागरिकांच्या मदतीने शहरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण घडवले असून पूर्वी ओसाड असलेल्या अनेक वसाहती आता झाडांच्या दाटीत हरवल्याचे चित्र निर्माण झाले आहे. शहराला शेकडों वर्षांचा इतिहास असल्याने येथील मानवी वस्ती आणि शहरातंर्गत रस्ते अतिशय अरुंद आणि दाटीवाटीचे असल्याने नव्याने वृक्षारोपणाचा पर्याय तसा दुर्मीळच. मात्र त्यावरही मात करुन शहरात मोठ्या प्रमाणात झाडे लावली जावून त्यांचे संगोपनही केले गेल्याने रस्त्यारस्त्यावर झाडे दिसू लागली आहेत.

मात्र पालिका आणि नागरिकांच्या या प्रयत्नांना वीज कंपनीचा मग्रुरपणा आडवा येत असून दरवर्षी विद्युत वाहिन्यांना अडथळा ठरत असल्याचे कारण पुढे करुन कंपनीकडून शहरात सर्रासपणे नागरी सहभागातून लावलेल्या आणि बहरलेल्या झाडांवर कुर्हाड फिरवली जात आहे. धक्कादायक म्हणजे केवळ ठेकेदारी पोसण्यासाठी सुरु असलेल्या या प्रकारात झाडे तोडणारा लाकूडतोड्याही आडहत्यारी निवडला जात असल्याने त्याच्या मनात येईल त्या प्रमाणे तो झाडांची छाटणी करीत आहे. त्यातून बहुतेक झाडांच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाल्याने अशा असंवेदनशील प्रकारे तोडलेल्या झाडांना पाहून नागरीकांचाही संताप होत आहे. विशेष म्हणजे सदरचा ठेकेदार केवळ झाडे तोडून ‘गायब’ होत असल्याने त्याने तोडलेल्या झाडांच्या फांद्या तशाच भररस्त्यात अस्ताव्यस्त पडून राहातात.

त्यामुळे आधीच अरुंद असलेल्या रस्त्यांवर वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याने पादचारी, दुचाकीस्वार आणि व्यापारी अशा सर्वांनाच त्याचा त्रास सहन करावा लागतो. मात्र मनमानी कारभारातून केवळ माया जमवण्यात चटावलेल्या या विभागातील बहुतेक सर्वच अधिकार्यांना त्याचे कोणतेही सोयरसुतक नसल्याने संगमनेरच्या वीज कंपनीकडून पर्यावरण आणि नागरीक अशा दोहींचाही छळ सुरु होता. याबाबतची वस्तुस्थिती निदर्शनास आल्यानंतर दैनिक नायकने आपली सामाजिक भूमिका ओळखून सोमवारी (ता.2) ‘वीज वितरण कंपनीच्या मग्रुरीचा सर्वसामान्यांना त्रास!’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करुन कान उपटताच वीज कंपनीला उपरती झाली आणि बुधवारपासून शहरातंर्गत रस्त्यावर जागोजागी अस्ताव्यस्त पडलेल्या छाटलेल्या झाडांच्या फांद्या उचलण्यास सुरुवात झाली.

वृक्षारोपण आणि संवर्धन ही काळाची गरज आहे. केंद्र व राज्य सरकारांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळीवरही त्यासाठी खूप व्यापक प्रमाणात काम सुरु आहे. जनजागृतीतून सर्वसामान्यांचा सहभागही वाढत असल्याने वृक्षारोपण चळवळ म्हणून उभी राहत आहे. अशावेळी वीज मंडळाकडून दरवर्षी दाखवला जाणारा असंवेदनशीलपणा नागरीकांच्या रोषाचे कारण ठरत असून वीज कंपनीने झाडे छाटण्याला अन्य पर्याय शोधण्याची व वृक्षसंवर्धनाच्या वैश्विक मोहीमेत सहभागी होण्याची गरज आहे. अन्यथा भविष्यात कंपनीची अवस्था ‘भीक नको, पण कुत्रं आवर’ अशी होण्याची दाट शक्यता आहे.

