चॉपरचा धाक दाखवून हॉटेल चालकास लुटले! रहाणेमळ्यातील प्रकार; शहरातील तिघांवर गुन्हा दाखल..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
शहराच्या विशिष्टभागात दादागिरी करुन दहशत निर्माण करणार्या धिरज पावडे अॅण्ड कंपनीचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. या घटनेत दारुच्या नशेत तर्राट होवून आलेल्या तिघांनी रहाणेमळ्यातील हॉटेल व्यवस्थापकाला चॉपरचा धाक दाखवून त्याच्या गल्ल्यातील साडेअकरा हजार रुपयांची रक्कम घेवून पळ काढला. यावेळी हॉटेलच्या एका कर्मचार्याने त्यातील एकाला पकडण्याचा प्रयत्नही केला. मात्र त्याला धक्का मारुन तिघेही पळून गेले. या प्रकरणी श्रीरामनगर परिसरातील धिरज पावडेसह अक्षय भुजबळ व शुभम दिवे या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर तिघेही पसार झाले आहेत.

याबाबत हॉटेल सुरजचा व्यवस्थापक हरीश थोरात याने शहर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार गुरुवारी (ता.5) रात्री सव्वानऊच्या सुमारास त्यांनी हॉटेलच्या गल्ल्यात जमा झालेली व्यवसायाची रक्कम मोजून ती व्यवस्थित ठेवली व तेथेच उभे राहीले. त्याचवेळी हॉटेलच्यासमोर अवतरलेल्या धिरज राजेंद्र पावडे व त्याचे साथीदार अक्षय रामा भुजबळ व शुभम दिवे (सर्व रा.श्रीरामनगर) यांनी आरडाओरड आणि शिवीगाळ करीत परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या तिघांचा आवेश पाहून त्यावेळी हॉटेल सुरजमध्ये ग्राहक म्हणून आलेले अनेकजण तेथून निघून गेले.

या संधीचा फायदा घेत पावडे याने आपल्या हातात चॉपर घेवून हॉटेलचा व्यवस्थापक थोरात याच्या मानेला लावला व दुसर्या हाताने काही वेळापूर्वीच त्याने मोजून गल्ल्यात ठेवलेली 11 हजार 500 रुपयांची रोख रक्कम काढून घेत ती बाहेर उभ्या असलेल्या भुजबळकडे दिली व ते तिघेही तेथून पळू लागले. यावेळी हॉटेलचा कर्मचारी नवनाथ एरंडे याने पावडेला पकडण्याचाही प्रयत्न केला. मात्र त्याच्या हाताला हिसका मारुन तो सटकला आणि बाकीच्या तिघांसह तेथून पसार झाला. या घटनेनंतर थोरात याने शहर पोलीस ठाण्यात येवून वरीलप्रमाणे तक्रार दाखल केली असून पोलिसांनी त्यावरुन गुन्हा दाखल करीत पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग यांच्याकडे दिला आहे.

या प्रकरणात सहभागी असलेले तिघेही नशेत तर्राट होवून वारंवार या परिसरात दहशत निर्माण करतात. त्यामुळे रात्रीच्यावेळी या भागात संचार करायलाही कोणी धजावत नाही. त्यांच्या भीतीमुळे महिला रात्रीच्यावेळी घराबाहेर पडत नसल्याचेही दाखल तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यावरुन पावडे टोळीची या परिसरातील दहशत अधोरेखीत होत असून अकोले नाक्यावरील सूर्यवंशी टोळीनंतर आता पावडे टोळी चर्चेत आल्याने संगमनेरच्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

