बाळासाहेब थोरातांच्या कर्तबगार नेतृत्वाचा महाराष्ट्राला अभिमान ः अभंग संगमनेरमध्ये महसूल मंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांचा स्नेहमेळावा

नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्यघटनेवर निष्ठा, विचारांशी प्रामाणिकपणा, पक्ष नेतृत्वाची बांधिलकी, स्वच्छ चारित्र्य आणि सततचे अविश्रांत काम यामुळे बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुक्यासह जिल्ह्यातील व राज्यातील प्रत्येकाच्या हृदयात स्थान निर्माण केले असून त्यांचे कर्तबगार नेतृत्व हे महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद असल्याचे गौरवोद्गार सहकारातील ज्येष्ठ नेते व माजी आमदार पांडुरंग अभंग यांनी काढले आहे. तर बाळासाहेब थोरात हे तरुणांसाठी आयकॉन असल्याचे प्रतिपादन नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी केले आहे.

संगमनेरातील वसंत लॉन्स येथे तालुक्यातील सर्वपक्षीय संस्था, सेवाभावी संस्था व अमृत उद्योग समूहाच्यावतीने आयोजित स्नेहमेळाव्यात ते बोलत होते. व्यासपीठावर आमदार डॉ.सुधीर तांबे, ज्येष्ठ नेते बाजीराव खेमनर, महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे, महानंदाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख, जिल्हा परिषदेच्या माजी सभापती अनुराधा नागवडे, श्रीगोंदा कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, समन्वयक ज्ञानदेव वाफारे, रामदास वाघ, अ‍ॅड.माधव कानवडे, इंद्रजीत थोरात, कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ, शंकर खेमनर, शरयू देशमुख, डॉ.जयश्री थोरात, सचिन गुजर, करण ससाणे, उत्कर्षा रुपवते, सभापती सुनंदा जोर्वेकर, जिल्हा परिषदेच्या सभापती मीरा शेटे, नवनाथ अरगडे, अमित पंडित, निर्मला गुंजाळ, सुरेश थोरात आदिंसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

या स्नेहमेळाव्यानिमित्त महसूल विभागाच्यावतीने झालेल्या ऐतिहासिक निर्णयांतर्गत पोटखराबा शेतकर्‍यांच्या नावे उतारे, गरजूंना शिधापत्रिकेचे वितरणही करण्यात आले. याचवेळी कोरोना संकटात उत्कृष्ट कामगिरी बजावणार्‍या कोरोना योद्ध्यांचा सत्कारही करण्यात आला. तर दुर्गा तांबे यांच्या ओव्यांचे पुस्तकाचे व कारखान्याच्या दिनदर्शिकेचे प्रकाशनही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाले.

याप्रसंगी पुढे बोलताना ज्येष्ठ नेते अभंग म्हणाले, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सहकाराला आदर्श तत्त्वे दिली. हाच समृद्ध वारसा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी जपला असून कधीही पक्षीय राजकारण केले नाही. मंत्री थोरात यांचे नेतृत्व हे समाजातील सर्व घटकांसाठी आहे. त्यांनी केलेले अविश्रांत काम, शेती, सहकार, शिक्षण, राजकारण आणि समाजकारण प्रत्येक क्षेत्रात मापदंड ठरले आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या नंतर एक सर्व क्षेत्राशी निगडीत सर्वसामान्यांशी जवळीक असलेल्या नेता म्हणून बाळासाहेब थोरात यांचे नेतृत्व असल्याचे शेवटी त्यांनी नमूद केले.

आमदार डॉ.तांबे म्हणाले, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कधीही पक्षाकडे काही मागितले नाही. मात्र संविधान आणि पक्षावर त्यांची मोठी असलेली निष्ठा सर्व महाराष्ट्राला माहीत आहे. यामुळे पक्षाने एकाच वेळेस राज्याचे प्रदेशाध्यक्ष, महसूल मंत्री, विधीमंडळ गटनेते, राष्ट्रीय कार्यकारिणी समितीचे सदस्य अशा विविध जबाबदार्‍या दिल्या. मंत्री थोरात यांनी अडचणीच्या काळामध्ये पक्षाला साथ दिली. याचबरोबर काँग्रेसच्या सामान्य कार्यकर्त्यांमध्ये विश्वास निर्माण केला. त्यांनी सेनापती होऊन काँग्रेस पक्षाचे नेतृत्व केले तर आपल्या राज्यातील, तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांनी त्यांना साथ दिली. पदापेक्षा कामाला महत्त्व देणार्‍या या नेतृत्वाने आपल्या कार्यकर्तृत्वातून मोठा आदर्श समाजापुढे निर्माण केला आहे. महसूल विभागात काम करताना उत्तर नगर जिल्ह्यासाठी केलेले निळवंडे धरण त्यांच्या जीवनातील अत्यंत आनंददायी बाब असल्याचे आमदार डॉ.तांबे यांनी अधोरेखित केले.

युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तांबे म्हणाले, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना कधी कोणीही रागावलेले पाहिले नाही. सर्वांना सामावून घेत पुढे जाणारे त्यांचे नेतृत्व आहे. सर्व क्षेत्राची जाण असणारा जनसामान्यांचा नेता अशी त्यांची ओळख आता सर्व महाराष्ट्राबाहेर आहे. राष्ट्रीय पातळीवर देखील त्यांचा मोठा मानसन्मान होत असून त्यांच्या शब्दाला मोठी किंमत आहे. पदापेक्षा अनेक मोठी कामे त्यांनी केली आहे.

महानंदचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख म्हणाले, सहकारातील जाणकार नेता अशी मंत्री थोरात यांची ओळख असून कोरोना काळामध्ये अनेक दूध संघ अडचणीत आले. अनेकांनी दूध घेणे बंद केले. मात्र राजहंस दूध संघाने अशा अडचणीच्या परिस्थितीत सर्व शेतकर्‍यांना दिलासा देत सर्वांचे दूध संकलन केले. मोठ्या प्रमाणात दूध पावडर निर्मिती केली. हा संघ शेतकर्‍यांच्या मदतीला काय उभा राहिला. अनेक दूरदृष्टीचे निर्णय घेताना बाळासाहेब थोरात हे सहकारासाठी कायम महत्त्वाचे मार्गदर्शक असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी अनुराधा नागवडे, दादा मुंडे, दुर्गा तांबे, सचिन गुजर, करण ससाणे, सुरेश थोरात, उत्कर्षा रुपवते आदिंची भाषणे झाली. अजय फटांगरे, संतोष हासे, गणपत सांगळे, निखील पापडेजा, बेबी थोरात, अर्चना बालोडे, नवनाथ आंधळे, प्रांताधिकारी डॉ.शशीकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम यांसह विविध पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी आभार मानले. याप्रसंगी विविध संस्थांचे पदाधिकारी, गावोगावचे कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Visits: 9 Today: 1 Total: 82838

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *