देशमुख मळा शाळेत बाल आनंद मेळाव्यासह मातृ-पितृ पूजन पाश्चिमात्य संस्कृतीचे अंधानुकरण नको; चिमुकल्यांचा गावकर्यांना संदेश
नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्यातील धांदरफळ येथील देशमुख मळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी बाल आनंद मेळाव्यामध्येच मातृ-पितृ पूजन उपक्रमाचे आयोजन करून पाश्चिमात्य संस्कृतीचे अंधानुकरण नको असा संदेशच जणू गावकर्यांना दिला.
चिमुकल्यांनी आई-वडिलांचे पूजन करून आई-वडिलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा आगळावेगळा दिन साजरा केला. आपल्या राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात सद्यस्थितीत पाश्चिमात्य संस्कृतीचे अंधानुकरण होत आहे. व्हॅलेंटाईन डे, रोज डे, हग डे असे वेगवेगळे डे साजरे करण्यासाठी तरुणाई पुढे सरसावत आहे. मात्र, आपली भावी पिढी सात्विक आणि सुसंस्कृत व्हावी यासाठी चिमुकल्यांना चांगले संस्कार मिळावे या उदात्त हेतूने देशमुख मळा शाळेतील उपक्रमशील शिक्षिका वृषाली कडलग यांच्या पुढाकाराने मातृ-पितृ पूजन व बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात चिमुकल्यांनी आपल्या आई-वडिलांना खुर्चीत बसवून त्यांच्या गळ्यात फुलांचा हार घालून त्यांचे देवाप्रमाणे पूजन केले. आपल्या चिमुकल्यांच्या या कृत्याने आई-वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले आणि चिमुकले विद्यार्थीही भावनिक झाले.
याच मातृ-पितृ पूजन सोहळ्यामध्ये देशमुख मळा प्राथमिक शाळेने बाल आनंद मेळाव्याचे ही आयोजन केले होते. या आनंद मेळाव्यामध्ये हेच चिमुकले विद्यार्थी व्यावसायिक झाले आणि त्यांनी आपल्या शेतात पिकवलेला भाजीपाला आणि फळे यांची विक्री करून पैसेही कमावले. पालकांनी आणि ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने आपल्या चिमुकल्यांनी आणलेल्या फळभाज्या, भाजीपाला आणि फळांची खरेदी केली. ग्रामीण भागात मिळणारा सर्वच भाजीपाला या बाल आनंद मेळाव्यात विक्रीसाठी उपलब्ध होता. याच शिवाय चिमुकल्यांना अपेक्षित असलेला गोळ्या बिस्किटे, खाद्यपदार्थ सारख्या गोष्टी सुद्धा या बाल आनंद मेळाव्यात उपलब्ध होत्या. याप्रसंगी पालकांनी बाल आनंद मेळाव्यात उपलब्ध असलेल्या खाद्यपदार्थांवरही ताव मारला. देशमुख मळा प्राथमिक शाळेने आयोजित केलेल्या बाल आनंद मेळावा व मातृ-पितृ पूजन या उपक्रमाने ग्रामस्थ व चिमुकल्यांचे आई-वडील अक्षरशः भारावून गेले होते.
प्रास्ताविकातून उपक्रमशील शिक्षिका वृषाली कडलग यांनी कार्यक्रमामागचा उद्देश स्पष्ट केला. चिमुकल्या विद्यार्थ्यांवर भारतीय संस्कृतीचे संस्कार व्हावेत त्यासाठीच या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक हनुमंत अडांगळे, सामाजिक कार्यकर्ते रवी अत्रे, सुभद्रा अत्रे, मनोज कडलग यांनी विशेष प्रयत्न केले. या उपक्रमाचे गटविकास अधिकारी अनिल नागणे व गटशिक्षणाधिकारी सुवर्णा फटांगरे यांनी कौतुक केले. याप्रसंगी सरपंच उज्ज्वला देशमाने, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश देशमुख उपस्थित होते.