जन्मदात्या पित्याचा खून करणार्या नराधमास जन्मठेप! चार वर्षांपूर्वीची धक्कादायक घटना; संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
पित्याकडे पैशांची मागणी करणार्या मुलाला ‘घरातील शेळ्या व बोकडं का विकले व त्याच्या पैशांचे काय केले’ असा प्रतिसवाल केल्याचा राग आला. त्या भरात त्याने आपली आई व बहिण समोर असतांनाही जन्मदात्या पित्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत अर्धमेले केले व नंतर डोक्यात लाकडी दांडा घालून त्यांचा खून करीत पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह दगड बांधून विहिरीत टाकला. तीन दिवसांनी त्यांचा मोठा मुलगा घरी आल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली आणि आरोपी खुनाच्या आरोपाखाली जेरबंद झाला. राजूर पोलीस ठाण्याच्या हद्दितील बोरवाडी येथे घडलेल्या या धक्कादायक प्रकरणाची सुनावणी संगमनेरचे जिल्हा न्यायाधीश दिलीप घुमरे यांच्यासमोर चालला. या खटल्यात सरकारी पक्षाने सादर केलेले पुरावे, साक्षी व युक्तिवाद मान्य करीत आरोपी काळु रामदास घाणे याला जन्मठेप व आर्थिक दंडाची शिक्षा सुनावली आहे.
याबाबतची हकिकत अशी की, फेब्रुवारी 2019 मध्ये वारंघुशी अंतर्गत येणार्या बोरवाडीत राहणार्या रामदास लक्ष्मण घाणे यांचा खून झाला होता. सदरचा प्रकार चार दिवसांनी समोर आल्यानंतर या प्रकरणी मयताचा दुसर्या क्रमांकाचा मुलगा काळू रामदास घाणे याला राजूर पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणी मयताचा मोठा मुलगा राजू घाणे याने फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार फिर्यादी त्यावेळी आपल्या पत्नीसह पुणे जिल्ह्यात मोलमजुरीसाठी गेला होता, तर त्याचे आई-वडील, बहिण व मधला भाऊ काळू हे चौघेही बोरवाडी येथे होते. त्यांचा छोटा मुलगा गेल्या दहा वर्षांपासून वडिलांच्या बहिणीकडेच वास्तव्यास आहे.
फेब्रुवारी 2022 मध्ये रामदास घाणे व त्यांची पत्नी जनाबाई मुलगी बकाबाईच्या प्रसूतीसाठी नाशिकला गेले होते. त्यावेळी घरी मधला मुलगा काळू एकटाच होता. या संधीचा गैरफायदा घेत त्याने घरातील तीन शेळ्या व दोन बोकडं परस्पर विकून टाकले. त्यानंतर 19 फेब्रुवारी 2022 रोजी दुपारी तो पुन्हा वडिल रामदास घाणे यांच्याकडे येवून पैसे मागू लागला. त्यावर ‘तु घरातील शेळ्या व बोकडं का विकले? त्याचे पैसे कोठे आहेत?’ असा प्रतिसवाल त्यांनी केला. त्याचा राग आल्याने त्या नराधमाने आपल्या आई व बहिणीच्या समोरच त्या वृद्ध पित्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.
त्यामुळे ते निपचीत पडले, काही वेळाने आरोपी काळू याने जवळच पडलेला लाकडी दांडा घेत त्यांच्या डोक्यात प्रहार केला. त्यात त्यांचा मृत्यू झाला, मात्र आरोपीने आई व बहिणीवर दहशत निर्माण केल्याने त्या दोघीही पडवीच्या कोपर्यात गप बसून राहिल्या. पहाटे तीन वाजेपर्यंत मयत रामदास घाणे यांचा मृतदेह घरातच पडून होता. त्यानंतर त्याने मृतदेहाला मोठा दगड बांधून घराजवळच असलेल्या विहिरीत तो ढकलून दिला. त्यानंतर त्याने आपली आई व बहिण यांना कोठे वाच्चता केली तर अशाच पद्धतीने जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यामुळे त्या दोघीही अबला आवंढा गिळून बसल्या.
23 फेब्रुवारी रोजी मोठा मुलगा राजू पुणे जिल्ह्यातून घरी परतल्यानंतर सदरचा प्रकार समोर आला. त्यानंतर त्यानेच राजूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी खुनाच्या 302 सह पुरावा नष्ट केल्याचे कलम 201 नुसार गुन्हा नोंदवित सदरील विहिरीतून मयताचा मृतदेह बाहेर काढून पुढील सोपस्कार उरकले व आरोपी काळू रामदास घाणे याला अटक केली. राजूरचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक खैरनार यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करुन संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपी विरोधात दोषारोप सादर केले.
या खटल्याचे कामकाज जिल्हा न्यायाधीश दिलीप घुमरे यांच्यासमोर चाले. सरकारी पक्षातर्फे अभियोक्ता भानुदास कोल्हे यांनी पाच साक्षीदार तपासले. त्यात मयताची पत्नी व आरोपीची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. सरकारी पक्षाने सादर केलेले पुरावे, साक्षी व युक्तिवाद ग्राह्य धरुन न्यायाधीश घुमरे यांनी आरोपीला दोषी ठरवतांना खुनाच्या कलमान्वये जन्मठेव व पाच हजारांचा दंड, पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तीन वर्षांचा कारावास आणि अडीच हजाराच्या दंडाची शिक्षा सुनावली. या प्रकरणात सरकारी अभियोक्ता कोल्हे यांना पैरवी अधिकारी म्हणून सहाय्यक फौजदार पठाण, हेड कॉन्स्टेबल प्रवीण डावरे, महिला पोलीस स्वाती नाईकवाडी, पंडीत व रहाणे यांनी सहकार्य केले.