निवडणुकीच्या वातावरणातही संगमनेरात राजकीय ‘संभ्रम’! सत्यजीत तांबेंच्या प्रवेशाची चर्चा; स्थानिक भाजप कार्यकर्ते मात्र धास्तावले..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
‘सर्वोच्च’ न्यायालयाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधील अडसर बाजूला केल्यानंतर निवडणुकांची रणधुमाळी डोळ्यासमोर दिसत असताना संगमनेरात मात्र त्याचा लवलेशही दिसून येईना. एरव्ही विधानसभा निवडणुकीत महायुतीने इतिहास घडवल्याने यंदाची पालिका निवडणूकही विरोधक तितक्याच ताकदीने लढतील असे चित्र दिसत होते. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयानंतर संगमनेरात पालिका निवडणुकांची मोर्चेबांधणी सुरु होईल असे वाटत होते. मात्र माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पराभवानंतर विधान परिषदेचे सदस्य आमदार सत्यजीत तांबे अचानक संगमनेरच्या राजकारणात सक्रिय झाले. या कालावधीत विविध विषयांवरुन दोन्ही आमदारांमध्ये श्रेयवादही रंगला. त्यातून तांबे यांच्या ‘अपक्ष’ कारकीर्दीला नागपुरी संत्र्याचा ‘गंध’ असल्याचेही वारंवार समोर आले. गेल्या काही दिवसांत त्यांनी माध्यमांमध्ये केलेल्या वक्तव्यातूनही या गोष्टी स्पष्टपणे समोर आल्या. त्यातूनच त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांनी जन्म घेतल्याने संगमनेरातील भाजप कार्यकर्ते धास्तावले आहेत. ज्यांच्या विरोधात राजकीय कारकीर्दीची सुरुवात केली त्यांच्या सोबतच भविष्यातील राजकारण करायचं या विचाराने अनेकजण निष्ठेच्या कथाही सांगू लागले आहेत. त्यामुळे निवडणुका दृष्टीत असूनही संगमनेरात मात्र राजकीय ‘संभ्रम’च अधिक असल्याने ‘निवडणूक’ या विषयावर बोलण्यास कोणीही इच्छुक नसल्याचे समोर आले आहे.


राज्याच्या निर्मितीपासूनचा इतिहास पाहिला तरीही संगमनेर विधानसभा मतदारसंघावर डाव्या आणि नंतर काँग्रेसच्या विचारांचा पगडा राहीला आहे. 1985 साली बाळासाहेब थोरात यांची विधानसभेत निवड झाल्यापासून 2024 पर्यंत त्यांनी संगमनेर विधानसभेचे नेतृत्व केले. गेल्या निवडणुकीत मात्र महायुतीच्या अमोल खताळ यांच्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. संगमनेर नगरपालिकेवर 1991 पासून थोरात यांच्या समर्थनातून तांबे यांची सत्ता आहे. 2006 पासून मध्यंतरीचा अपवाद वगळता दुर्गा तांबे यांनी पालिकेचे नगराध्यक्षपद भूषविले आहे. विधानसभा निवडणुकीत थोरात गटाला मोठा धक्का बसल्याने त्याचे पडसाद अन्य निवडणुकांमधून उमटण्याची आजही शक्यता आहे. त्यामुळे अनेकजण निवडणुकांबाबत अनिश्‍चितता असतानाही सोशल माध्यमातून सतत चर्चेत राहण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसत आहे.


दरम्यानच्या काळात पुस्तक प्रकाशनातून एकमेकांच्या प्रेमात पडलेल्या ‘तांबे-फडणवीस’ जोडीतील आमदार सत्यजीत तांबे यांनी विधान परिषदेपासून निवडलेल्या वेगळ्या वाटेवरुन अनेकदा चर्चाही झाल्या आहेत. अर्थात या कालावधीत त्यांनी काँग्रेसकडे निलंबन मागे घेण्याबाबत वारंवार विनवण्या केल्याचेही त्यावेळी समोर आले. मात्र त्यांच्याकडे कोणीही गांभीर्याने बघितले नाही. त्यामुळे ते काँग्रेसपासून दुरावले गेले. या सगळ्या घटनाक्रमातून पक्षाकडूनच त्यांच्या राजकीय वाटचालीत अडथळे निर्माण केले जात असल्याचेही लपून राहीले नाही. त्यामुळे त्यांनी ‘अपक्ष’ या शब्दाला अनुसरुन मुख्यमंत्र्यांशी संबंध वाढवून आपले मामा माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पराभवाने निर्माण झालेली पोकळी भरुन काढण्यास सुरुवात केली.


छत्रपतींचे स्मारक, महामार्गाचे रेंगाळलेले काम, म्हाळुंगी पुलाचा विषय, रेल्वे अशा कितीतरी विषयावरुन रंगलेल्या श्रेयवादातून हा विषय अनेकदा चर्चेतही आला. संगमनेर मतदारसंघातील विकासकामांमध्ये त्यांचा सहभाग वाढू लागल्याने विद्यमान आमदार अमोल खताळ यांच्या समर्थकांशी राजकीय खटकेही उडू लागले. त्यातून राजकीय वातावरणालाही सतत हवा मिळत गेल्याने संगमनेरचे राजकारण हल्ली जिल्ह्यात चर्चेचा विषय असतानाच सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणासह अन्य निवडणूक याचिकांवर यथावकाश सुनावणी घेण्याचा निर्णय घेवून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरील अनिश्‍चितता संपवली. त्यामुळे राज्यात सर्वत्र निवडणुकीचे वातावरण तापत असताना संगमनेर मात्र त्याला अपवाद ठरले आहे.


मुख्यमंत्र्यांशी जवळीक असल्याचा ‘संशय’ असलेल्या आमदार सत्यजीत तांबे यांनी अलिकडच्या काळात थेट काँग्रेसच्या शीर्ष नेतृत्त्वावर प्रश्‍नचिन्ह उभे करुन एकप्रकारे पक्षालाच आव्हान दिले आहे. त्यांनी थेट राहुल गांधी यांच्यावरच निशाणा साधल्याने पक्षाकडून त्यांची पाठराखण करण्यास कोणीही पुढे येईल असे चित्र नाही. भूतकाळात निलंबनानंतर अनेकदा विनवण्या करुनही पक्षाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. त्यातून पक्षाला आपली राजकीय वाढ नकोय असा विचारही त्यांच्या मनात बिंबल्याने काँग्रेसशी त्यांचे सूत जुळण्याची शक्यता कमी होत गेली. त्यातूनच त्यांनी मुख्यमंत्र्यांशी कामातून जवळीक साधून आपल्यासाठी ‘सुरक्षित मार्ग’ निर्माण केल्याचे दिसून येते. मागील काही महिन्यात थोरात साखर कारखान्याच्या निवडणुकीसह काही घटनांमध्ये मुख्यमंत्र्यांचा थेट संबंध असल्याचे बोलले गेले. त्या दरम्यानच सर्वोच्च न्यायालयाचा आदेश समोर आल्याने आमदार सत्यजीत तांबे यांचा कथीत पक्षप्रवेश आणि स्थानिक भाजप कार्यकर्त्यांची मनस्थितीही समोर येवू लागली आहे.


संगमनेर नगरपालिकेवर गेल्या साडेतीन दशकांपासून थोरात-तांबे यांची सत्ता आहे. त्यामुळे संगमनेरच्या विरोधकांचा राजकीय शत्रू सत्ताधारी कॉग्रेसच राहीली आहे. पालिकेतील सत्तेचे नेतृत्व तांबे यांच्याकडे असल्याने गेल्या साडेतीन दशकांत महायुतीत तयार झालेले कार्यकर्ते त्यांच्या विरोधातच मानले जातात. मात्र विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर बदलेलं चित्र, त्यात विधानसभेच्या निकालाने पालटवलेली बाजी, दृष्टीक्षेपात आलेली पालिका आणि त्यानंतर इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा विचार करता येणार्‍या काळात संगमनेर तालुक्यात मोठी उलथापालथ घडण्याची शक्यता आहे. त्यातूनच वेगवेगळ्या अफवांना धुमारे फुटले असून सगळीकडे ‘प्रवेशा’च्या चर्चा रंगल्या आहेत.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक असली तरीही आमदार सत्यजीत तांबे यांचा भाजपप्रवेश होईल याबाबत साशंकता होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतील विजयाचे गणित मांडून अनेकांनी स्थानिकसाठी जोर-बैठकाही मारायला सुरुवात केली होती. मात्र आता अचानक तांबे यांच्या पक्षांतराच्या चर्चांना पंख फुटल्याने भाजपच्या निष्ठावानांसह मनसुबे बांधून असलेल्यांच्या पोटात गोळा उठला आहे. तांबे यांचा खरोखरी भाजपप्रवेश होणार आहे का? याबाबत आमच्याकडे कोणतीही विश्‍वासार्ह माहिती नाही. आमदार तांबे यांच्या कार्यालयाकडूनही अशी कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे सध्या सुरु असलेली चर्चा ‘अफवा’ या सदरात मोडणारी असली तरीही त्यातून संगमनेरात मात्र राजकीय ‘संभ्रम’ निर्माण झाला आहे.

Visits: 374 Today: 1 Total: 1114331

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *