विशेष पोलीस महानिरीक्षकांचा संगमनेरातील मटका पेढीवर हल्ला! शहरातील दोघा ‘मटकाकिंग’सह एकोणावीस जणांवर गुन्हा दाखल, तिघांना अटक व सुटका


नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या काही वर्षांपासून अहमदनगर जिल्ह्यातील अवैध व्यवसायांचे केंद्र बनू पाहणार्‍या संगमनेरातील बेकायदा धंदेवाईकांना नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.प्रताप दिघावकर यांनी ‘दे धक्का’ देण्याचे तंत्र अवलंबले आहे. जिल्ह्यातील कोणत्याही पोलीस ठाण्यावर अविश्वास दाखवित थेट धुळ्याहून संगमनेरात पोहोचलेल्या त्यांच्या ‘विशेष’ पथकाने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन तर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका ठिकाणी छापा घालीत संगमनेरात जोमात सुरु असलेल्या मटका पेढीवर हल्ला चढवला. या प्रकरणी शहरातील दोघा मटकाबुकींसह एकूण 19 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक व सुटका झाली आहे. या छाप्यातून पथकाने सुमारे 53 हजारांच्या रोकडसह तब्बल चार लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाईने जिल्ह्यातील केवळ अवैध व्यावसायिकच नव्हेतर, पोलीस दलातही खळबळ उडाली आहे. संगमनेरच्या इतिहासात बहुधा पहिल्यांदाच थेट नाशिकहून आलेल्या पथकाने कारवाई करण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असावी.

मटका, गांजा, दारु, वाळू, जुगार, गोवंशाची कत्तल अशा सर्वच क्षेत्रातील गुन्हेगारीने गेल्या काही वर्षांत शहर व तालुक्याच्या कानाकोपर्‍यात मोठे बस्तान बसविले आहे. स्थानिक पोलिसांशी असलेल्या हितसंबंधातून अशा व्यवसायांनी जवळपास तालुका व्यापलेला असल्याने तक्रार करावी तर करावी कोणाकडे अशी स्थिती निर्माण झाली होती. त्यातच गुरुवारी अहमदनगरचे अतिरीक्त पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोड आणि नेवासा पोलीस ठाण्यातील एका कर्मचार्‍यादरम्यान झालेल्या संभाषणाची ऑडियो क्लिप व्हायरल झाल्याने जिल्हा पोलिसांची लक्तरेच वेशीवर टांगली गेली होती. त्या क्लिपवरुन जिल्ह्यातील अवैध धंदे आणि त्याला असलेले खाकीचे पाठबळही उघड झाल्याने विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.प्रताप दिघावकर यांनी त्याची गांभिर्याने नोंद घेतली.

गुरुवारी (ता.29) सकाळी त्यांनी आपले विशेष पथक संगमनेरच्या दिशेने रवाना करीत त्यांना कारवाईबाबत योग्य त्या सूचना दिल्या. त्यानुसार संगमनेरच्या इतिहासात बहुधा पहिल्यांदाच थेट धुळे पोलीस मुख्यालयातील पोलिसांनी परस्पर संगमनेरात येत दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास थेट वडगावपान शिवारातील हॉटेल यादगारच्या पाठीमागील बाजूस असलेल्या निसार निहाल शेख याच्या मालकीच्या घर वजा पत्र्याच्या शेडमध्ये छापा घातला. यावेळी तेथे ‘टाईम’ नावाचा सट्ट्याचा खेळ मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे पथकाला आढळून आले. आहे त्याच स्थितीत शांत बसण्याचे आदेश बजावित पथकातील कर्मचार्‍यांनी 7 हजार 610 रुपयांची रोकड, 2 लाख 29 हजार 950 रुपये किंमतीचे सट्टा लावण्याचे साहित्य व दुचाकी असा एकूण 2 लाख 37 हजार 560 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. या प्रकरणी संगमनेरातील मटका बुकी अशरफ समशेरअली जहागिरदार याच्यासह सट्टा घेणारा ताराचंद दत्तात्रय गरगे (वय 30, रा.हॉटेल जयभवानी जवळ, संगमनेर) व घरमालक निहाल निसार शेख (वय 40, रा.वडगाव पान) यांच्यासह सट्टा लावण्यासाठी आलेल्या अन्य बारा जणांवर मुंबई जुगार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला.

दुसर्‍या प्रकरणात दुपारी सव्वाचार वाजण्याच्या सुमारास अरगडे गल्लीतील मटकापेढीवर छापा घालीत मुख्य मटकाकिंग शंकर भागप्पा इट्टप (रा.तेलीखुंट), कपिल धर्माजी चिलका (वय 35, रा.पद्मनगर) व जयवंत अरविंद अभंग (वय 51, रा.घोडेकर मळा) यांच्यावर गुन्हा दाखल करीत 31 हजार रुपयांच्या रोकडसह एकूण 96 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यातील दुसर्‍या दोघांनाही अटक करुन त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. तर तिसर्‍या प्रकरणात सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास तीनबत्ती चौकातील मटकापेढीवर छापा घालीत पथकाने 14 हजार 300 रुपयांच्या रोकडसह 52 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत मुख्य बुकी अशरफ जहागिरदार याच्यासह मच्छिंद्र लक्ष्मण काकड (वय 55, रा.साळीवाडा) या दोघांवर गुन्हा दाखल करीत दुसर्‍या क्रमांकाच्या आरोपीला अटक करुन त्याची जामिनावर सुटका केली. या तीनही ठिकाणच्या कारवाईत विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या ‘विशेष’ पथकाने 19 जणांवर मुंबई जगार अधिनियमातंर्गत गुन्हा दाखल करताना तब्बल 3 लाख 86 हजार 260 रुपयांचा मुद्देमालही जप्त केला. या धडक कारवाईने स्थानिक पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू असलेल्या संगमनेरातील अवैध व्यावसायिकांमध्ये घबराहट निर्माण झाली असून कधी नव्हे ते शहरातील सर्व बेकायदा धंदे किमान उघडपणे तरी बंद झाले आहेत.


पोलीस खात्यातील काही अधिकारी आणि समाजातील बेकायदा कृत्ये उघड करण्याची जबाबदारी असलेले ‘काही’ पत्रकार यांना चिरीमिरी देवून शहरात मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसाय फुलले आहेत. महिन्याकाठी मोठी रक्कम हाती पडत असल्याने वरीष्ठांकडून वारंवार सूचना येवूनही आजपर्यंत अशा व्यावसायिकांवर थातूरमातूर कारवाई होत असे. त्यामुळे जिल्ह्यातील पोलिसांवर ‘अविश्वास’ दाखवित नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांनी आता स्वतःच संगमनेरातील गुन्हेगारी आणि येथील बेकायदा उद्योग उध्वस्त करण्याचा चंग बांधला असून त्याचा पहिला अध्याय गुरुवारी संगमनेरात लिहिला गेला. या कारवाईचे सर्वसामान्य संगमनेरकरांनी स्वागत केले असून अवैध व्यावसायिकांसह त्यांना पाठबळ देणार्‍या अधिकारी व हप्ते खाऊन ‘साव’ बनलेल्या ‘काही’ पत्रकारांवरही कारवाईची मागणी होत आहे.

 

Visits: 256 Today: 6 Total: 1107627

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *