धक्कादायक! संगमनेरच्या गोतस्करांकडे आढळले परदेशी बनावटीचे पिस्तूल पालघरच्या तलासरी पोलिसांची कारवाई; संगमनेरच्या कुरणरोडवरील तिघे अटकेत..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू झाल्यापासून आजवर शेकडो कारवाया होवूनही संगमनेरातील गोवंश कत्तलखाने बंद होत नसल्याचे दुर्दैवी चित्र दररोज समोर येत आहे. एकीकडे संगमनेर पोलीस कारवाईचा दिखावा करीत कत्तेलखाने बंद असल्याचा दावा करीत असतांना दुसरीकडे राज्यातील अनेक ठिकाणी वारंवार होणार्या कारवायांमधून सदरचे कत्तलखाने सुरुच असल्याचे वास्तवही समोर येत आहे. अशातच आता पालघर जिल्ह्यातील तलासरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अत्यंत धक्कादायक वृत्त हाती आले असून तेथील पोलिसांनी पकडलेल्या संगमनेरातील तिघा गोतस्करांकडून चक्क परदेशी बनावटीच्या पिस्तुलासह दोन जिवंत काडतुसे हस्तगत झाली आहेत. पालघर जिल्ह्यात झालेल्या या कारवाईने नगर जिल्ह्यात खळबळ उडाली असून गोवंश कत्तलखान्याचे चालक आता आपल्याजवळ पिस्तुलासारखी घातक हत्यारे बाळगू लागल्याने शहरातील कायदा व व्यवस्थेची स्थिती ढासळल्याचे स्पष्टपणे समोर आले आहे.
याबाबत तलासरी (जि.पालघर) पोलिसांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार पालघर जिल्ह्यातील या पोलीस ठाण्याची हद्द गुजरातला लागून असल्याने व सध्या गुजरात विधानसभेची निवडणूक प्रक्रिया सुरु असल्याने पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी संपूर्ण पालघर जिल्ह्यात नाकाबंदी लावण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे गुजरातमधून महाराष्ट्रात येणार्या व जाणार्या वाहनांची कसून तपासणी सुरु होती. या दरम्यान पोलिसांनी तलासरीतील उधवा-कोदाड रस्त्यावर एका संशयित पिकअप वाहनाला थांबवून त्याची तपासणी केली असता अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
तलासरीचे पोलीस निरीक्षक अजय वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या वाहन तपासणीत अडकलेल्या पिकअप (क्र.एम.एच.41/जी.3272) या वाहनातील तिघांकडून चक्क अमेरिकन बनावटीचे एक पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी वाहनातील तिघांनाही अटक केली असून त्यातील केवळ सुमीत लाजरस खरात (वय 30, रा. महादेव वस्ती, कुरणरोड, संगमनेर) या आरोपीचे नाव प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. मात्र उर्वरीत दोघांची नावे जाणीवपूर्वक देण्याचे टाळले गेले असून या पत्रकातून आरोपी क्रमांक एक वय 26, रा.कुरणरोड, संगमनेर, आरोपी क्रमांक दोन वय 28, रा. कुरणरोड, संगमनेर असे नमूद करण्यात आले आहे.
या कारवाईत पोलिसांनी वाहनातील तिघांवरही भारतीय शस्त्र कायद्याचे कलम 3/25 सह जिल्हाधिकार्यांच्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी 37 (1) (3), 135 प्रमाणे कारवाई केली आहे. या सर्वांना अटक करण्यात आल्याची माहिती तलासरी पोलिसांकडून देण्यात आली आहे. त्यांच्या ताब्यातून 8 लाख रुपये किंमतीच्या पिकअप वाहनासह 20 हजार रुपये किंमतीचे पिस्तूल व सातशे रुपयांची दोन जिवंत काडतुसे असा एकूण 8 लाख 20 हजार 700 रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास तलासरीचे पोलीस उपनिरीक्षक समीर लोंढे यांच्याकडे देण्यात आला आहे. या वृत्ताने संगमनेरातील कत्तलखाना चालकांसह गोतस्करांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
या प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या दोघांची नावे प्रसिद्धीपत्रकातून लपविण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र सदरचे वाहन पालघरमधील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पकडले होते व पोलीस घटनास्थळी पोहोचण्यापूर्वी त्यातील एकाने आरोपींना आपली ओळख स्पष्ट करण्यास सांगितले असता त्यातील एकाने आपले नाव इरफान रफीक शेख व दुसर्याने बाबु शेख असे असल्याचे सांगितल्याचा व्हिडिओही दैनिक नायकला प्राप्त झाला आहे, मात्र या व्हिडिओच्या सत्यतेची हमी आम्ही देत नाही. सदरचा प्रकार समोर आल्यानंतर संगमनेरातील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी (ता.6) पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची अहमदनगरला जावून भेट घेतली.
यावेळी बजरंग दलाच्या सचिन कानकाटे व साहेबराव वलवे यांनी त्यांना संगमनेरातील गोवंश कत्तलखान्यांबाबत सविस्तर माहिती दिली असून यासाठी देण्यात आलेल्या निवेदनात तलासरी येथील कारवाईचाही उल्लेख करण्यात आला आहे. वारंवार कारवाया होवूनही व स्थानिक पोलिसांना गोवंश कत्तलीबाबत पूर्वसूचना देवूनही कारवाई होत नसल्याकडे त्यांनी पोलीस अधीक्षकांचे लक्ष्य वेधताना बेकायदा गोकत्तलीतून मोठी आर्थिक उलाढाल होत असल्याने व आता राज्यातील विविध ठिकाणी अशाप्रकारे गोतस्करी व गोवंश मांसाची वाहतूक करणारी वाहने बजरंग दलाकडून पकडली जात असल्याने अनेक कसाई व गोतस्कर बेकायदा हत्यारे जवळ बाळगीत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे.
संगमनेरातील कत्तलखाना चालक, वारंवार कारवाया होवून समोर आलेले कसाई यांची कसून तपासणी केल्यास त्यांच्याकडूनही अशाप्रकारची बेकायदा हत्यारे मोठ्या प्रमाणात सापडली जाण्याची शक्यताही बजरंग दलाने या निवेदनातून व्यक्त केली असून अनेकवेळा एकाच गुन्ह्यात सापडणार्या अशा कसायांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. तलासरीमध्ये संगमनेरातील गोतस्करांकडे सापडलेले पिस्तूल अतिशय धक्कादायक असून त्यातून संगमनेरच्या शांतता व सुव्यवस्थेलाही धोका निर्माण होण्याची भीती पोलीस अधीक्षकांना बोलून दाखवण्यात आली आहे.