चौगुलेचा जामीन रद्द करण्यासाठी पोलीस न्यायालयात! पठारावरील ‘लव्ह जिहाद’चा सूत्रधार; सर्वोच्च न्यायालयाने केली होती सुटका..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्यावर्षी पठारभागात घडलेल्या ‘लव्ह जिहाद’ प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळवून शस्त्रतस्करीत पुन्हा गजाआड झालेल्या युसुफ चौगुलेचा जामीन रद्द करावा यासाठी घारगाव पोलीस न्यायालयात पोहोचले आहेत. सलग नऊ महिन्यांच्या कारावासानंतर गेल्याच महिन्यात त्याची सशर्त सुटका झाली होती. मात्र त्यानंतर अवघ्या आठवडाभरातच त्याला मध्यप्रदेशमधून बेकायदा शस्त्रांची वाहतूक करताना पकडले गेले. सध्या तो सेंधवा कारागृहात असून मध्यप्रदेश पोलिसांकडून आवश्यक कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर घारगाव पोलिसांनी संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेत त्याचा जामीन रद्द करण्याची मागणी केली आहे. त्यावरुन न्यायालयाने आरोपीला नोटीस बजावली असून 5 जूनपर्यंत म्हणणे सादर करण्यास सांगितले आहे. विशेष म्हणजे मध्यप्रदेश पोलिसांच्या कारवाईत आरोपीला इतक्या शस्त्रांसह पकडले गेले, या शस्त्रांचा वापर करुन त्याने कोणते षडयंत्र तर रचले नव्हते याचा शोध लागण्याची गरज आहे. मात्र कायदेशीर तरतुदीनुसार तसे करण्यात मोठ्या अडचणी असून वरीष्ठपातळीवरुन या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिले गेल्यास मध्यप्रदेशातील ‘शस्त्रतस्करी’ पठारावरच्या ‘लव्ह जिहाद’ प्रकरणाला कलाटणी देवू शकते.


पठारभागातील एका 19 वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थीनीला मंचर बसस्थानक परिसरात बोलावून गेल्यावर्षी 7 जुलैरोजी आरोपी युसुफ दादा चौगुले याने शादाब रशीद तांबोळी याच्या माध्यमातून तिचे अपहरण केले होते. या प्रकरणात सुरुवातीला चौगुलेने स्वतःची कार वापरली. त्यानंतर शादाबसह अपहृत तरुणीला अन्य साथीदारांच्या मदतीने मुंबईला पाठवून तेथे तिचे बळजबरीने धर्मांतरण घडवून तिचा निकाह लावून देण्यात आला. त्यानंतर सलग तीन दिवस आरोपी शादाब तांबोळी याने मुंबईत तिच्यावर शारीरिक अत्याचार केले. या प्रकरणावरुन संगमनेर तालुक्यात जातीय तणाव निर्माण झाल्याने 10 जुलैरोजी आरोपी शादाब पीडित तरुणीसह घारगाव पोलिसांना शरण आला. मात्र या कालावधीत अपहृत तरुणीची प्रकृती खालावल्याने तिला रुग्णालयात दाखल करावे लागले.


स्वास्थ मिळाल्यानंतर 27 जुलैरोजी पीडित तरुणीने घारगाव पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी सहाजणांवर अपहरण, अत्याचार, मारहाण, धमकी अशा वेगवेगळ्या कारणांसह बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन त्याच दिवशी या प्रकरणाचा सूत्रधार युसुफ दादा चौगुले याला श्रीरामपूरातून अटक केली. तेव्हापासून गेल्या 22 एप्रिलपर्यंत सलग नऊ महिने तो कारागृहातच कैद होता. गेल्याच महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने त्याला कडक समज देत अटी व शर्तींच्या अधिन राहून कोणताही गुन्हा करणार नाही या बोलीवर जामीन मंजूर केला होता. त्यानंतर अवघ्या 20 दिवसांतच त्याला मोठ्या प्रमाणात शस्त्रांची तस्करी करताना मध्यप्रदेशात अटक झाल्याने एकंदरीत या प्रकारातून मोठे गांभीर्य उभे राहीले आहे.


मध्यप्रदेश पोलिसांनी युसुफ चौगुलेसह अन्य दोघांवर शस्त्रतस्करीची कारवाई केल्याचे समजल्यानंतर संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे, घारगावचे निरीक्षक विलास पुजारी यांनी वरला (जि.बडवाणी) पोलिसांशी संपर्क साधून माहिती आणि कागदपत्रांची देवाणघेवाण केली. त्यानंतर आता संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात लव्ह जिहाद प्रकरण, त्यावर सर्वोच्च न्यायालयातून मिळालेला जामीन, त्यातील शर्ती, मध्यप्रदेश पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा आणि पोलिसांचे म्हणणे असा सविस्तर अहवाल सादर करण्यात आला आहे. त्यावरुन न्यायालयाने आरोपी युसुफ चौगुले याला नोटीस बजावली असून 5 जूनपर्यंत म्हणणे सादर करण्यास सांगितले आहे. त्यानंतर त्याचा जामीन रद्द करण्याच्या मागणीवर निर्णय होईल. सध्या आरोपी सेंधवा कारागृहात कैद असून मध्यप्रदेश सरकारने केलेल्या तरतुदीनुसार शस्त्रतस्करीच्या प्रकरणात आरोपपत्र दाखल होईस्तोवर अर्थात किमान 60 दिवस त्याला जामीन मिळण्याची शक्यता नाही.


घारगाव पोलिसांनी संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात सादर केलेल्या अहवालानुसार त्या पोलीस ठाण्यातील दाखल प्रकरणात आरोपी युसुफ दादा चौगुले (वय 30, रा.घारगाव) याला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने योग्य त्या अटी व शर्तींच्या अधीन राहून 23/04/2025 रोजी जामीन मंजूर केल्याचा उल्लेख आहे. मात्र आरोपीने सर्वोच्च न्यायालयाच्या शर्तीचे परराज्यात जावून उल्लंघन केले. त्यामुळे त्याचा वरील प्रकरणातील मंजूर जामीन रद्द करण्यात यावा. न्यायालयाच्या आदेशानुसार आरोपीला म्हणणे सादर करण्याबाबतची नोटीस सेंधवा कारागृहात जावून समक्ष बजावण्यात आल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यावर आता पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निर्णय होण्याची शक्यता आहे.

Visits: 438 Today: 3 Total: 1114366

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *