संगमनेर शहरात ‘खमक्या’ अधिकार्‍यांची वाणवा! प्रदीर्घ काळापासून गुन्ह्यांचे तपास ठप्प; गुन्हेगारी घटनांनीही कळस गाठला..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
काही वर्षापर्यंत महिनाभरात एखाद्या ठिकाणी चोरी, घरफोडी अथवा हाणामारीची घटना समोर यायची. हल्ली मात्र रोजच्या पोलीस डायरीची सुरुवातच अशा घटनांच्या नोंदीने होते. अवघ्या काही वर्षात झालेला हा बदल समाजातील गुन्हेगारी प्रवृत्ती वाढल्याचे भासवणारा असला तरीही त्याच्या मूळाशी मात्र पोलिसच असल्याचे दिसून येते. पूर्वी एखाद्या पोलीस ठाण्यात नियुक्ति होण्यापूर्वी त्या हद्दिचा इतिहास आणि प्रभारी म्हणून जाणार्‍या अधिकार्‍याची क्षमता यांची पडताळणी व्हायची. या तत्वानेच संगमनेर शहरासाठी वरीष्ठ श्रेणीतील अधिकार्‍यांची नियुक्ति करण्याचा प्रघात आहे. मोठ्या अनुभवाची शिदोरी पाठीशी असलेल्या अधिकार्‍यांनी नोकरीतील शेवटचा काळ समाजाचे देणं फेडण्यात घालवावा असा सामान्य समज असतो. संगमनेर शहराच्या पूर्वेतिहासात आपल्या कामातून ठसा उमटवलेल्या काही अधिकार्‍यांचे आजही दाखले दिले जातात. मात्र गेल्या मोठ्या कालावधीपासून शहराला अशा ‘खमक्या’ अधिकार्‍यांची वाणवा भासू लागल्याने त्याचा सामाजिक स्वास्थावरही विपरीत परिणाम झाला आहे. शहरात पोलिसांचे अस्तित्वच जाणवत नसल्याने वाहतुकीच्या कोंडीपासून अंमलीपदार्थांच्या सर्रास तस्करीपर्यंतचे स्तोम माजले असून सामान्य माणूस निमूटपणे सर्वकाळी सहन करतोय.


संगमनेर शहराच्या पोलीस विभागाला मोठा इतिहास आहे. नव्वदच्या दशकापर्यंत शहराला जातीय तणावाचा कलंक होता. मात्र गेल्या 30/35 वर्षात तो पुसून शहराने चहुबाजूने आपला विकास साधला आहे. मुळा-प्रवरा नद्यांच्या पाण्याने सिंचनाखाली आलेल्या क्षेत्रातून तालुक्याने समृद्धी गाठल्याने शहराची बाजारपेठही समृद्धच. अगदी स्वयंपाक घरातल्या मसाल्यांपासून ते दोन-दोन शतकांचा व्यावसायिक इतिहास असलेल्या सुवर्णपेढ्यांच्या दालनापर्यंतच्या व्यावसायिकांनी संगमनेरच्या बाजरपेठेत दाटी केली आहे. पाण्याच्या उपलब्धतेमुळे वाढलेली मानवी संख्या, त्यातून समृद्ध होत गेलेली बाजारपेठ, सहकार, उद्योग, व्यवसाय, आरोग्य व शिक्षण संस्था अशा कितीतरी कारणांनी त्यात भर घातल्याने जिल्ह्यातील समृद्ध शहरांच्या पंक्तित संगमनेरचे नाव घेतले जाते.


साहजिकच जेथे समृद्धी असते, तेथे दृष्ट विचारांचा वावरही असतोच. त्याप्रमाणे संगमनेर शहराला गुन्हेगार आणि त्याच्या विघातक कारवाया नवीन नाहीत. मात्र यापूर्वी त्यांना मर्यादा होती. अगदी दहा-बारा वर्षांपूर्वी एका अधिकार्‍याने पोलिसांचा असा वचक बसवला होता की गुन्हेगारही कृती करण्यापूर्वी विचार करायचा. त्यापूर्वीही काही अधिकार्‍यांनी संगमनेरकरांच्या दीर्घकाळ लक्षात राहील अशा पद्धतीने आपले कर्तव्य बजावले. मात्र त्यांचा तो काळ सरुन आता एकतप उलटला आहे. मात्र दरम्यानच्या काळात संवेदनशील शहरांच्या यादीत असलेल्या संगमनेरला अद्यापही ‘खमक्या’ अधिकारी मिळाला नाही. दीर्घकाळापासून शहराशी अशाच पद्धतीचा खेळ सुरु असल्याने शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तींनी अक्षरशः उन्माद घातला आहे.


शाळा, महाविद्यालये यांच्या परिसरासह आसपासच्या चहाच्या टपर्‍या आणि काही ढाब्यांवरही विद्यार्थ्यांना सहज अंमलीपदार्थ उपलब्ध होत असल्याने पिढी बर्बाद होण्याचा वेग वाढत आहे. ‘तडजोडी’ची सवय जडल्याने गंभीर प्रकरणातही गांभीर्य गमावले जात आहे. पैशांच्या बदल्यात काहीही करण्याची मुभा असल्याने शहरात अगदी ‘एमडी’च्या वापराचे प्रकारही समोर येवू लागले आहेत. चोर्‍या, घरफोड्या, बसस्थानकातून ऐवज लांबवण्याचा घटना रोजच्या रोज घडत आहेत आणि पोलिसांकडून फिर्यादीलाच थोडाफार त्रास देवून प्रामाणिकपणे ‘त्या’ दाखलही करुन घेतल्या जात आहेत, मात्र त्यांच्या तपासाचा दूरपर्यंत कोठेही पत्ता लागलेला नाही. आलेले प्रत्येक प्रकरण ‘तडजोडी’साठीच असल्याची वृत्ती बळावल्याने मलाईदार प्रकरणात निम्मा-अर्धा तपास सुरु आहे. उर्वरीत प्रकरणांना मात्र फाईलवरील धुळ साफ होण्याचीच प्रतीक्षा आहे.


शहराच्या वाहतूक व्यवस्थेची बोंब आजही कायम असून जागोजागी होणार्‍या वाहतूक कोंडीने सर्वसामान्य संगमनेरकर अक्षरशः वैतागला आहे. गुन्ह्यांचे तपास नाही, अवैध व्यवसायांवर नियंत्रण नाही आणि वाहतुकीचे नियोजन नाही यामुळे संगमनेरच्या समाजिक स्वास्थाची अक्षरशः वाट लागली आहे. भररस्त्यात कोठेही वाहने, भंगारातल्या प्रवाशी रिक्षा, फेरीविक्रेते आपल्या हातगाड्या घेवून बिनधोकपणे उभे राहत असल्याने शहरातंर्गत रस्त्यांवरुन प्रवास म्हणजे विद्यार्थी, महिला व वृद्धांसाठी नकोसा झाला आहे. गुन्हेगार असो अथवा व्यावसायिक, विद्यार्थी असो अथवा गृहस्थ अशा कोणालाच पोलिसांचे अस्तित्व जाणवत नसल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे शहरातील गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होण्यासह वारंवार वाहतूक कोंडीने संगमनेरकर त्रस्त झाला असून शहरात एखाद्या ‘खमक्या’ आणि कार्यप्रवण अधिकार्‍याची नियुक्ति करण्याची मागणी होत आहे.


पोलीस अधिक्षक म्हणून जिल्ह्याचा पदभार घेणार्‍या सोमनाथ घार्गे यांनी यापूर्वी जिल्ह्यातील श्रीरामपूरचे उपविभागीय अधिकारी म्हणून काम केले आहे. त्यामुळे त्यांना जिल्हा आणि जिल्ह्यातील गुन्हेगारी दोन्ही गोष्टींची चांगली ओळख आहे. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी शनिवारी (ता.24) शहराला भेटही दिली. यावेळी त्यांनी ‘वाहतूक समस्येला’ सिग्नलचा पर्याय देत लवकरच ते कार्यान्वीत करण्याची ग्वाही दिली. मात्र शहरातील वाढलेला राजकीय संघर्ष, गुन्हेगारी घटनांचा आलेख आणि ठप्प असलेल्या तपासाबाबत त्यांनी चकारही काढला नाही. उत्तम प्रशासक अशी ओळख असलेल्या पोलीस अधिक्षकांना संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे महत्त्व आणि येथील कमतरता नक्कीच लक्षात आल्या असतील. त्यामुळे येणार्‍या काळात संगमनेर शहराला एखादा ‘खमक्या’ अधिकारी मिळाल्यास आश्‍चर्य वाटू नये.

Visits: 367 Today: 2 Total: 1098680

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *