पेट्रोल टाकून मुख्याध्यापिकेलाच पेटवून देण्याची धमकी! संगमनेरातील धक्कादायक प्रकार; विकृत उपमुख्याध्यापक झाला गजाआड..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
मानसिक स्वास्थ बिघडलेल्या एखाद्याकडून होणारा सामाजिक उपद्रव अनेकदा सर्वसामान्यांना बघायला मिळतो. मात्र अशीच एखादी विकृती जर कोवळ्या मुलांना शिक्षण देणार्‍या संस्थेतच धुडगूस घालीत असेल तर?. साहजिकच मुलांच्या सुरक्षेचा विचार करता त्याला वेळीच ठेचावे लागेल. संगमनेरच्या शिक्षण विभागाने मात्र नेमके याच गोष्टीकडे दुर्लक्ष केल्याने मनोधैर्य उंचावलेल्या एका विकृत शिक्षकाने चक्क शाळेच्या मुख्याध्यापिकेलाच पेट्रोल टाकून पेटवून देण्याची धमकी दिली. उपमुख्याध्यापक म्हणून लाखभर पगार घेणार्‍या सुखदेव संपत हासे या विकृत शिक्षकाने पगार कपातीवरुन त्यांना लक्ष्य करीत थेट दहा-बारा बाटल्या पेट्रोल ओतून मारुन टाकण्याचा दम भरला. या विकृताच्या रोजच्या चाळ्यांना वैतागलेल्या मुख्याध्यापिकेने अखेर सोमवारी उशिराने शहर पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर अवघ्या तीन दिवसांत तिसरा अदखलपात्र गुन्हा दाखल झालेल्या ‘त्या’ शिक्षकाला पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करीत गजाआड घातले आहे. या प्रकाराने संगमनेरच्या शिक्षणक्षेत्रात एकच खळबळ उडाली असून अशा मानसिक विकृत असलेल्या शिक्षकांना सेवेतून कायमस्वरुपी बडतर्फ करण्याची मागणीही आता समोर येत आहे.


याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुखदेव संपत हासे (रा.राजापूर) हा विकृत शिक्षक गेल्याकाही वर्षांपासून शहरातील अतिशय जुन्या असलेल्या एका शिक्षण संस्थेत कार्यरत आहे. मात्र त्याची येथील सुरुवातीपासूनची कारकीर्द अतिशय वादग्रस्त ठरली असून त्याच्या मनमानी आणि विकृत चाळ्यांमुळे शाळेतील सहकारी शिक्षकांसह विद्यार्थीही अक्षरशः त्रासले आहेत. मनाला येईल तेव्हा शाळेत यायचे, वाट्टेल तेव्हा निघून जायचे. मनाला वाटलं तर शिकवायचं, नाहीतर सरकारी नोकरी म्हणजे आपल्या बापाचीच मालमत्ता समजून बसून राहायचं असा विचित्र स्वभाव असलेला हा शिक्षक चक्क आपल्या चारचाकी वाहनाला ‘सायरन’ लावून गावात फिरतो आणि आपण पोलिसांच्या गुप्तचर विभागात कार्यरत असल्याचे लोकांना भासवत असल्याचेही समोर आले आहे.


विकृत मानसिकतेच्या सुखदेव हासे याच्या रोजच्या त्रासाला वैतागून अखेर शाळेच्या मुख्याध्यापिकेने सोमवारी (ता.23) शहर पोलिसांकडे धाव घेत दररोज सुरु असलेला घटनाक्रम सांगितला. त्यानुसार मनमानी पद्धतीने वागत असलेल्या सदरच्या शिक्षकाचा जानेवारी महिन्यात काढण्यात आलेला पगार पंचायत समितीच्या शिक्षणाधिकार्‍यांनी (प्राथमिक) कापला. त्यामुळे या विकृत शिक्षकाचा पारा चढून घडला प्रकार मुख्याध्यापिकेनेच केल्याचा राग त्याच्या मनात बळावला. त्यामुळे गेल्याकाही दिवसांपासून त्याची चीडचीड सुरु असतानाच गेल्या शुक्रवारी (ता.21) सकाळी सव्वाआठच्या सुमारास त्याने थेट एका कनिष्ठ महाविद्यालयात प्रशिक्षणासाठी गेलेल्या ‘त्या’ मुख्याध्यापिकेला अन्य चार-पाच शिक्षकांसह आडवून दमबाजी केली.


यावेळी त्याने ‘तुम्ही माझा पगार दिला नाही तर मी शाळेच्या गेटमध्येच पेट्रोल टाकून जाळील, तुम्हाला शाळेत पाऊल ठेवू देणार नाही, तुमचा मुडदाच पाडील..’ अशी धमकी देत शिवीगाळ करुन निघून गेला. या प्रकारानंतर भेदरलेल्या मुख्याध्यापिकेने मानसिकतेतून हा प्रकार घडला असावा म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र त्यातून त्या विकृताचे मनोधैर्य वाढल्याने त्याने सोमवारी (ता.23) थेट घुलेवाडीत राहणार्‍या ‘त्या’ मुख्याध्यापिकेचे घर गाठले. येथेही त्याने अतिशय घाणेरड्या भाषेत शिवीगाळ करीत ‘माझा पगार दिला नाहीतर तुम्हाला दहा-बारा बाटल्या पेट्रोल टाकून जाळून टाकील’ अशी धमकी भरुन तो निघून गेला. कालपर्यंत शाळेत घडणारा हा प्रकार आता थेट घरापर्यंत पोहोचल्याने हादरलेल्या शिक्षिकेने अखेर शहर पोलिसांकडे जावून गार्‍हाणे मांडले.


यावेळी समोर आलेल्या नावावरुन संबंधित शिक्षकावर तीन दिवसांपूर्वी दोन अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद झाल्याचेही पोलिसांना आढळले. त्याची शहनिशा केली असता आरोपी सुखदेव हासे याच्यावर अकोले पोलीस ठाण्याच्या हद्दितही दोनपेक्षा अधिक गुन्हे दाखल असल्याची माहिती पुढे आली. याच गुन्ह्यांच्या संदर्भात अकोल्यातील पोलीस कर्मचारी महेश आहेर यांनी आरोपी हासेला गेल्या मंगळवारी (ता.18) फोन करुन अकोले पोलीस ठाण्यात बोलावले होते. त्याचा राग येवून या विकृत शिक्षकाने शुक्रवारी (ता.20) सकाळी त्यांना फोन करुन ‘तुम्ही मला पोलीस ठाण्यात का बोलावले? मला तुमच्या निरीक्षकांचा सत्कार का करु दिला नाही?’ असे सवाल करीत ‘तुम्हाला लई माज आलाय का?, आय.जी.साहेबांकडे जावून तुमची नागपूरला बदली करतो. तुमची माझ्याशी बोलायची लायकी आहे का?, आता तुम्ही माझ्या नादी लागला आहात, तुम्हाला ठोकूनच काढतो’ अशा शब्दात चक्क पोलीस कर्मचार्‍यालाच धमक्या भरल्या. या प्रकरणी त्याच दिवशी शहर पोलिसांकडे अदखलपात्र गुन्हाही दाखल झाला.


हा प्रकार कमी होता की काय म्हणून या विकृत महाशयांनी याच दिवशी (ता.20) दुपारी तीनच्या सुमारास अंकुश शिंदे या विधिज्ञासोबतही नाहक वाद घालून त्यांच्यासह अन्य सात वकिलांनाही धमक्या देत दमबाजी केली. जीजामाता प्राईड या इमारतीत संबंधित वकिल मंडळी त्यांची कामे करीत असताना अचानक कर्कश आवाजात ‘पोलीस सायरन’ वाजल्याने ते सर्वजण आपल्या कार्यालयातून बाहेर आले. त्यावेळी एका लाल रंगाच्या अल्टो कारमध्ये बसून सुखदेव संपत हासे हा विकृत अतिशय मोठ्या आवाजात गाणी वाजवत असल्याचे व अधुनमधून पोलीस सायरनही वाजवत असल्याचे त्यांना दिसले. त्यावरुन ही मंडळी त्याला समजावून सांगण्यासाठी गेली असता उलट त्याने लाकडी दांडके घेवून वकिल अंकुश शिंदे यांच्यावर धाव घेतली.


यावेळी त्याने ‘मी ‘क्राईम ब्रॅन्च’चा माणूस आहे, गन काढून एकेकाला ठोकून काढील’ अशी जीवे मारण्याची धमकी देत घाणेरड्या भाषेत शिवीगाळ केली व त्या सर्वांना धक्काबुक्की केली. या घटनेनंतर तेथील सर्व वकिलांनी शहर पोलीस ठाण्यात येवून तक्रार दाखल केली. त्यावरुन पोलिसांनी या विकृत शिक्षकाविरोधात एकाच दिवसातील दुसरा अदखलपात्र गुन्हा दाखल केला. मात्र या सगळ्या गोष्टींचा कोणताही परिणाम या विकृतावर झाला नाही. त्यातून त्याने सोमवारी (ता.24) चक्क शाळेच्या मुख्याध्यापिकेलाच पेट्रोल टाकून जाळून टाकण्याची धमकी दिली. त्याचे एकामागून एक कारनामे पाहता पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी संबंधित मुख्याध्यापिकेची तक्रार नोंदवून घेतल्यानंतर भारतीय न्यायसंहितेच्या 170 (2) या प्रतिबंधात्मक कलमाचा वापर करुन त्याला अटक केली आहे. आज त्याला न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. या प्रकारातून पंचायत समितीचा प्राथमिक शिक्षण विभाग अशा विकृत शिक्षकांना का सांभाळतोय?, त्यामागे काही ‘कारण’ आहे का?, विभागाला एखाद्या गंभीर घटनेची प्रतिक्षा आहे का? असे विविध प्रश्‍न उपस्थित झाले आहेत.


अकोल्यात कार्यरत असल्यापासूनच सतत वादग्रस्त आणि धोकादायक ठरत असलेल्या सुखदेव संपत हासे या विकृत शिक्षकाकडे लाल रंगाची अल्टो गाडी (क्र.एम.एच.14/सी.सी.9913) आहे. या गाडीला त्याने बेकायदा पोलीस सायरन बसवला असून तो राजरोसपणे शहरातील वर्दळीच्या रस्त्यावरुन सायरन वाजवत फिरत असल्याचेही अनेकदा दिसून आले आहे. आतातर त्याने चक्क पोलीस, वकिल आणि आता शाळेच्या मुख्याध्यापिकेलाच जाळून ठार मारण्याची धमकी दिल्याने तो आणि त्याची विकृती चव्हाट्यावर आली आहे. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात असलेल्या अशा गचाळ मानसिकतेच्या शिक्षकावर एकामागून एक पाचपेक्षा अधिक गुन्हे दाखल होवूनही पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने मोठे आश्‍चर्य निर्माण झाले आहे.

Visits: 32 Today: 3 Total: 306765

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *