अरण्यऋषींचा राजूर-बोट्याच्या वनक्षेत्रात संचार..
अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांचा अहिल्यानगर जिल्ह्याशीही जूना संबंध होता. वनखात्यातील नोकरीच्या सुरुवातीला त्यांनी काही काळ अकोले तालुक्यातील राजूर आणि संगमनेर तालुक्यातील बोटा येथे काम केले होते. ‘चकवा चांदण’ या आपल्या आत्मचरित्रात त्यांनी राजूर व बोटा येथील दिवसांच्या आठवणी सांगितल्या आहेत. त्यांच्या निधनाचे वृत्त समजल्यावर पर्यावरणप्रेमी अकोलेकरांनी त्यांच्या अकोले-संगमनेरमधील आठवणींना उजाळा दिला.
नांदेड वनविभागातून बदली होवून नगर विभागात विशेष कार्यअधिकारी या पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. नगर येथे मुख्यालय ठेवून त्यांना संगमनेर, श्रीरामपूर, पाथर्डी आणि नेवासे येथील वन विषयक कामानिमित्त दौरे करावे लागत. काही महिन्यांनी संगमनेर तालुक्यातील बोटा येथे त्यांची बदली झाली. बोटा हे नव्यानं निर्माण झालेलं वनपरिक्षेत्र होते. तिथे नवीन कार्यालय स्थापन करण्यापासून त्यांना सुरुवात करावी लागली. राहण्याची, जेवणाची आबळ, कडाक्याची थंडी यामुळे बोट्यात ते आजारीही पडले होते. बोटा येथे असताना त्यांनी महसूल विभागाकडून वनीकरणासाठी मोठे क्षेत्र वर्ग करुन घेतले. रोज सकाळी उठून कर्मचार्यांना बरोबर घेऊन ते उजाड डोंगरदर्या आणि माळरानातून वनीकरणाच्या उद्देशाने त्या भागाचे सर्वेक्षण करीत फिरत असतं. याबरोबर त्यांचे पक्षी निरीक्षणही चाले. पक्षांची त्या परिसरात रेलचेल होती असे ते लिहितात. चंडोलाचे अनेक प्रकार त्यांना पाहायला मिळाले. लावा तित्तरांचे कळप इकडे तिकडे धावताना दिसायचे असे त्यांनी लिहून ठेवले आहे. बोटा येथे कार्यरत असतानाच श्रीरामपूर आणि कोपरगाव तालुक्यातील साखर कारखान्यांच्या मालकीच्या ऊसाच्या मळ्यातील शेतात असणार्या झाडांची मोजणी करण्याचे काम त्यांनी केले.
कामानिमित्ताने पाथर्डी व शेवगाव येथेही त्यांनी दौरे केले. जिल्ह्यात असताना पुणतांबे येथील चांगदेव महाराजांची समाधी, नेवासे येथील ज्ञानेश्वर मंदिर, ज्ञानेश्वर जन्मस्थान असणारे आपेगाव, संत एकनाथ महाराज समाधी पैठण या तीर्थस्थानाना त्यांनी आवर्जून भेटीं दिल्या. समाधीचा परिसर उध्वस्त झाला होता. जिकडेतिकडे चिरे विखुरलेले होते. एका शिळेवर बसून मी चांगदेव पासष्टी वाचून काढली ही पुणतांबे भेटीची नोंद किंवा पैठणची आठवण म्हणून एकनाथी भागवत हा ग्रंथ खरेदी केला या सारख्या लिखाणातून त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या वेगळ्याच पैलूंचे दर्शन होते. चार-पाच किलोमीटर पायी प्रवास करीत ते संत ज्ञानेश्वरांचे जन्मगाव असलेल्या आपेगावला गेले. मात्र तेेथील दूरवस्था पाहून त्यांचे मन उदास झाले असे त्यांनी लिहिले आहे. प्रवरानदीच्या काठी समुद्र राघू, फ्लेमिंगो नावाचे पक्षी मोठ्या संख्येने येतात असं त्यांनी वाचलं होतं. त्यामुळे नेवासे भेटीत सायंकाळी वाटाड्या सोबत घेऊन ते नदीवर गेले. समुद्र राघू दिसले पण ते अल्पसंख्येतच दिसले अशी आठवण त्यांनी लिहिली आहे.
बोटा येथे असतानाच त्यांची बदली राजूर येथे झाली. नगर जिल्ह्यात जंगल फक्त राजूर वनक्षेत्रात होते असे निरीक्षण त्यांनी नोंदविले आहे. कळसुबाई, भंडारदरा धरण, हरिश्चंद्रगड हा सर्व परिसर राजूर वनक्षेत्रात येतो. कार्याचे मुख्य केंद्र असल्यामुळे भंडारदरा येथे ते नियमित जात. तेेथेच त्यांची मि.फॉक्स यांचे बरोबर ओळख झाली. रेल्वेमध्ये अधिकारी असणारे मि.फॉक्स रानबदकांच्या शिकारीसाठी भंडारदरा येथे वारंवार येत असत. हा परिसर आवडल्यामुळे सेवानिवृत्त झाल्यावर ते भंडारदर्यातच स्थायिक झाले होते. जंगलातून भटकंती केली असल्याने या परिसरात आढळून येणार्या वन्य प्राण्यांची त्यांना चांगली माहिती होती. भंडारदरा येथे गेले की चितमपल्ली त्यांची आवर्जून भेट घेत, त्यांच्या बरोबर अनेकदा तळ्यावर रानबदकांच्या निरीक्षणालाही जातं. भंडारदरा धरणाच्या पायथ्याला पुरातन वटवृक्षाच्या राईत वस्तीला असणारी असंख्य वटवाघळ दिवस मावळताच उडतउडत धरणावर जायची. तिथे पाण्याला स्पर्श करुन अलगद पाणी प्यायची. आसमंत अंधारु लागे तशी ती घाटमाथ्यावरुन खाली कोकणात ठाणे जिल्ह्यात उडत जाताना दिसायची.
संधिप्रकाशात धरणाच्या भिंतीवर उभे राहून आभाळात उडणार्या वटवाघळांच्या थव्यांकडे पहाणे माझा आणि फॉक्स महोदयांचा आवडता छंद होता. त्या संधिप्रकाशात वाघळे देखील सुंदर दिसायची अशी आठवण त्यांनी लिहून ठेवली आहे. घाटघरच्या कोकण कड्याजवळ दाट झाडीत दगडी बांधकाम असलेले ब्रिटिश काळात विश्रामगृह होते. काळाच्या ओघात त्याची दूरवस्था झाली होती. चितमपल्ली यांनी त्या विश्रामगृहातील एका कक्षाची दुरुस्ती करून घेत ते एखाद्या रात्रीच्या निवार्यास योग्य केले. हे विश्रामगृह त्यांचे एक आवडीचे ठिकाण होते. विश्रामगृहाच्या व्हरांड्यात वेताच्या खुर्चीवर बसले की, खाली सारे कोकणचे दृष्य दिसतं. चांदण्यात पहाटेच्या वेळी इथे बसून कोकणातून चरुन परत येणार्या वाघळांच्या थव्यांकडे पहाण्यात त्यांना मोठा आनंद वाटे. आसमंतातील रानवटपणा भारावून टाके असे त्यांनी लिहिले आहे. कळसुबाईचे शिखर हे त्यांच्या आकर्षणाचे अजून एक ठिकाण. आठवड्यातून एकदा तरी ते त्या शिखरावर जात. आजूबाजूचे सृष्टीसौंदर्य न्याहळीत औषधी वनस्पतीसाठी हे शिखर प्रसिद्ध होते असे ते लिहितात. औषधी वनस्पती गोळा करण्याकरता वैदू आणि आंधप्रदेशातील कृष्णराजन येत. कृष्णराजन हे शहरात औषधी वनस्पती विकत. रंगाने सावळे, उघडे अंग, कमरेला धोतर, मानेपर्यंत केस, कपाळाला कापडाची पट्टी बांधलेली, त्या पट्टीत मोरपिस खोवलेली, औषधी वनस्पतींनी भरलेली झोळी खांद्याला अडकवलेली असे असे वर्णन त्यांनी केले आहे.
कोतुळ भागात दौर्यावर जाताना किंवा परत येताना बर्याच वेळा ते हरिश्चंद्रगडावर जात. या गडाच्या उतरणीवर अस्पर्श असं सुंदर जंगल होतं. या भागातील स्थानिक आदिवासींना पाखरांची माहिती असल्याने त्यांच्याजवळ पक्षांच्या मराठी नावांची ते आवर्जून चौकशी करीत. त्यांच्याबरोबर गडावर भटकायचे राजूरची प्रसिद्धी तिथल्या पेढ्यांसाठी होती हे देखील त्यांनी नमूद केले आहे. सत्यनिकेतन संस्थेचे सचिव सर्वोदयी कार्यकर्ते भाऊसाहेब पाटणकर यांचेबरोबर त्यांची ओळख झाली. पाटणकर यांच्या संग्रही चांगले ग्रंथ होते. ते आवर्जून चितमपल्ली यांना ग्रंथ वाचायला देत. ‘अ सेंट ऑन पीलिग्राम’ हा विनोबा भावे यांच्या विषयीचा एका परदेशी विदूषीने विनोबां बरोबर प्रवास करुन लिहिलेला ग्रंथ इथेच वाचायला मिळाला अशी आठवण त्यांनी सांगितली आहे..चितमपल्ली यांना संशोधन क्षेत्रात अधिक रस होता. त्यामुळे आपली बदली संशोधन क्षेत्रात व्हावी म्हणून त्यांनी राज्याच्या मुख्य वनसंरक्षकांकडे पूर्वीच विनंती अर्ज केला होता. त्याप्रमाणे लवकरच त्यांची पुणे येथे बदली झाली आणि राजूरशी 18 फेब्रुवारी ते 9 मे 1967 असा अवघ्या तीन महिन्यांचा त्यांचा संबंध संपला.
– प्रकाश टाकळकर, अकोले