प्रयागराज महाकुंभातील निर्णयाची अहिल्यानगर जिल्ह्यातही अंमलबजावणी! मुस्लिम व्यापार्यांना मढीयात्रेत ‘नो-एन्ट्री’; ग्रामसभेत बहुमताने करण्यात आला ठराव..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
ज्यांच्या भाळी कुंकू नाही, त्यांच्याकडून ते विकत घेण्याच्या दुर्दैवापेक्षा अशा व्यापार्यांना यात्रेत सहभागी होण्यास मज्जाव करावा या नाथभक्तांच्या मागणीवरुन मढीच्या ग्रामस्थांनी मुस्लिम व्यापार्यांना यात्रेत ‘नो-एन्ट्री’चा निर्णय घेतला आहे. सध्या प्रयागराज येथे सुरु असलेल्या महाकुंभातही असाच निर्णय घेण्यात आला होता. त्यावरुन देशभरात धुरळा उडालेला असताना आता अहिल्यानगर जिल्ह्यातील चैतन्य कानिफनाथांच्या यात्रेतही या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. मढी ग्रामपंचायतीच्या या निर्णयानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून त्याला विरोध करण्यात आला असून मानवतेची शिकवण देणार्या संतांच्या भूमीत विचारांशी विसंगत कृती घडू देणार नाही, त्यासाठी प्रसंगी न्यायालयातही जावू असा इशारा पक्षाचे नेते प्रताप ढाकणे यांनी दिला आहे.
लाखों भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पाथर्डी तालुक्यातील मढीच्या चैतन्य कानिफनाथ यांचा यात्रौत्सव अवघ्या महिन्यावर येवून ठेपला आहे. होळी ते गुढीपाडवा अशा जवळपास एक महिना चालणार्या या यात्रेत महाराष्ट्रासह कर्नाटक, गुजरात, राजस्थान व अन्य राज्यातील लाखों भाविक मढीत हजेरी लावतात. भटक्यांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्या मढीत अठरापगड जातीच्या नागरिकांच्या भांडणांचा न्यायनिवाडाही केला जातो. यात्रेदरम्यान येथे भरणार्या गाढवांच्या बाजारात जातीवंत गाढवं घेण्यासाठी विविध ठिकाणांहून खरेदीदारही येतात. पाडव्याच्या पूर्वसंध्येला भरणारा बाजार यात्रेकरुंसाठी आकर्षण ठरत असतो.
शेकडों वर्षांच्या परंपरेनुसार महिनाभर अगोदर देवाला तेल लावले जाते. हा कालावधी मढीच्या ग्रामस्थांसाठी दुःखवट्याचा मानला जातो. त्यामुळे या काळात संपूर्ण पंचक्रोशित खाट, बाज, पलंग व गादीवर बसणे अथवा झोपणे, घरात काही तळण्याचे पदार्थ करणे, दाढी व कटींग, लग्न समारंभ अथवा आनंदोत्सव यासारख्या गोष्टी प्रकर्षाने टाळल्या जातात. अनेकजण महिनाभर शेतीची कामे व प्रवास टाळून नाथांच्या सेवेत समर्पित असतात. गुढीपाडव्याच्या दिनी पहाटे भाविक कावडींमधून पाणी आणून नाथांच्या समाधीला स्नान घालतात.
या यात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर मढीच्या ग्रामपंचायतीने शनिवारी (ता.22) सरपंच संजय मरकड यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा बोलावली होती. यावेळी उपस्थित ग्रामस्थांसोबत बोलतांना सरपंच मरकड यांनी त्यांच्याकडे प्राप्त तक्रारी व पत्रांचा उल्लेख करीत यात्रेच्या निमित्ताने मढीत येणार्या मुस्लिम व्यापार्यांकडून देवस्थानाची परंपरा आणि संकेत पायदळी तुडवले जात असल्याचे निदर्शनास आणून दिले. ज्या व्यक्ति स्वतः कुंकू लावत नाहीत अशा व्यापार्यांकडून कुंकू अथवा पूजेचे साहित्य, खाद्यपदार्थ विकत घ्यावे लागतात ही गोष्ट दुर्दैवी असल्याचे मत अनेकांनी पत्राद्वारे आपल्याकडे नोंदवल्याचेही त्यांनी सांगितले. यात्राकाळात पंचक्रोशित मांसाहार वर्ज्य असताना काहीजणांकडून मोठ्या प्रमाणात पशूहत्या व मांसाहार होत असल्याने हिंदू समुदायाच्या भावनांना ठेच लागते असेही त्यांनी नमूद केले. त्यामुळे गैरहिंदू व्यापार्यांना हिंदूंच्या यात्रेत व्यापार करण्यास बंदी घालावी अशी मागणी समोर आल्याने त्यावर चर्चा घडावी अशी सूचना त्यांनी मांडली.
त्यावर मढीचे ग्रामस्थ रमेश मरकड यांनी मुस्लिम व्यापार्यांना यात्रेत प्रवेशबंदी करण्याचा ठराव मांडला. त्याला बाबासाहेब मरकड यांनी अनुमोदन दिल्याने जवळपास सव्वाशे ग्रामस्थांच्या उपस्थितीत यंदापासून मढीच्या यात्रेत मुस्लिम व्यापार्यांना ‘नो-एन्ट्री’ करण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. हा निर्णय समोर येताच त्यावरुन वेगवेगळ्या प्रतिक्रियाही समोर आल्या असून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे स्थानिक नेते अॅड.प्रताप ढाकणे यांनी त्याला कडाडून विरोध केला आहे. जात, धर्म यांच्या पलिकडे जावून नाथ संप्रदायाने मानवतेची शिकवण दिली. अशा भूमीत एखाद्या विशिष्ट समूदायाने व्यवसाय करु नये असा ठराव करणं ही संप्रदायाच्या विचारांशी विसंगत कृती असल्याचे सांगत प्रसंगी त्या विरोधात न्यायालयात जाण्याचा इशाराही त्यांनी दिला.
यावर्षी उत्तरप्रदेशमधील प्रयागराज येथे सुरु असलेल्या महाकुंभमध्येही तेथील सरकारने गैरहिंदू व्यापार्यांना कोणत्याही प्रकारचा व्यवसाय करण्यास पूर्णतः बंदी घातली आहे. या निर्णयावरुन देशातील राजकारणात धुरळा उडालेला असतानाच आता त्याचे लोळ थेट अहिल्यानगर जिल्ह्यातील मढीच्या यात्रेतही पोहोचल्याने आगामी कालावधीत त्यावरुन जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघण्याची शक्यता आहे. मढी ग्रामपंचायतीने घेतलेल्या या निर्णयावर जिल्ह्यात संमिश्र प्रतिक्रियाही उमटल्या असून प्रशासनाने मात्र असा कोणताही ठराव अद्याप समोर आला नसल्याचे सांगत कानावर हात ठेवले आहेत.
पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र मढी येथे कानिफनाथांची संजिवन समाधी आहे. दरवर्षी होळी ते गुढीपाडवा या महिनाभराच्या कालावधीत येथे मोठी यात्रा भरते. राज्यासह गुजरात, कर्नाटक व राजस्थानातील असंख्य भाविक या कालावधीत नाथांच्या भूमीत येवून त्यांचे दर्शन घेवून धन्य होतात. शेकडों वर्षांपासून सुरु असलेल्या या परंपरेत यंदा मात्र मुस्लिम व्यापार्यांना ‘नो-एन्ट्री’ करण्यात आल्याने आगामी कालावधीत त्यावरुन जिल्ह्यातील राजकारण तापण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने या निर्णयाला विरोध करीत प्रसंगी न्यायालयात जाण्याचा इशाराही दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन मढी ग्रामपंचायतीच्या ठरावावर नेमकी काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.