सव्वातीन लाखांची रोकड घेवून चोरटा पळाला संगमनेरातील धक्कादायक घटना; देशी दारुच्या दुकानातील रोकड..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
शहराच्या वेगवेगळ्या भागातून महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या ओरबाडण्याच्या आणि बँकांमध्ये भरणा करण्यासाठी निघालेल्यांना लुटण्याच्या घटना घडतच असताना आता शहरातून नवाच प्रकार समोर आला आहे. या घटनेत भल्या पहाटेपासून जमा झालेली देशी दारुच्या विक्रीची रक्कम भरणा करण्यासाठी निघालेल्या व्यवस्थापकाला हुलकावणी मारीत लांबवण्यात आली. सोमवारी भरदुपारी साडेतीनच्या सुमारास परदेशपूर्‍याजवळ घडलेल्या या प्रकारात बालमशेठ परदेशी यांच्या दारु अड्ड्यावरील तब्बल 3 लाख 19 हजार 160 रुपयांची रोकड लुटली गेली आहे. या प्रकरणी दारु गुत्त्याचा व्यवस्थापक विकास शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरची घटना सोमवारी (ता.24) दुपारी साडेतीनच्या सुमारास अतिशय दाट लोकवस्तीच्या परदेशपूरा भागात घडली. या परिसरात गेल्या कित्येक वर्षांपासून असलेल्या बालमशेठ परदेशी यांच्या देशी दारुच्या दुकानात दिवसभरात जमा झालेल्या रकमेसह शनिवार व रविवारच्या सुट्टीच्या दिवशी गोळा झालेला एकूण 3 लाख 19 हजार 160 रुपयांचा भरणा घेवून गुत्त्याचे व्यवस्थापक विकास शिंदे बडोदा बँकेत जाण्यासाठी निघाले होते. यावेळी त्यांनी आपल्याजवळील रक्कम असलेली बॅग आपल्या दुचाकीच्या शीटजवळ ठेवली.


यावेळी आधीपासूनच त्यांच्यावर नजर ठेवून असलेल्या अज्ञात चोरट्याने नेमकी संधी साधून भरधाव वेगाने दुचाकी घेवून येत शिंदे यांनी त्यांच्या मोपेडवर ठेवलेली रोकड असलेली बॅग उचलली आणि तेथून पोबारा केला. यावेळी शिंदे यांनी आरडाओरड केल्यानंतर काहीजणांनी धावपळ करीत चोरट्याचा पाठलाग करण्याचाही प्रयत्न केला, मात्र तो पर्यंत सदरील चोरटा सव्वातीन लाखांची रोकड घेवून तेथून पसार झाला होता. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. यापूर्वी या परिसरात अशाप्रकारच्या घटना घडल्याचे कधीही ऐकिवात नसल्याने अचानक सुरु झालेल्या या प्रकाराचे आश्‍चर्य निर्माण झाले.


या प्रकरणी आज पहाटेच्या सुमारास परदेशी यांच्या देशी दारु दुकानाचे व्यवस्थापक विकास शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरु केला आहे. या प्रकारातून सोनसाखळी आणि रोकड लांबवण्याच्या घटनांचे लोण आता थेट गावठाणातही येवून पोहोचल्याने आश्‍चर्यही निर्माण झालें आहे.

Visits: 43 Today: 4 Total: 305850

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *