अडगळीत गेलेला कर्‍हे घाट बनला अनेकांसाठी ‘डंपिंग’ यार्ड पोलीस प्रशासनाचाही हातभार; भविष्यात आरोग्य विषयक अडचणी वाढणार..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
कधी काळी वाहनचालकांच्या मनात धडकी भरवणारा पुणे-नाशिक महामार्गावरील कर्‍हे घाट गेल्या काही वर्षांपासून पूर्णतः अडगळीत गेला आहे. त्यामुळे जून्या चंदनापूरी घाटाप्रमाणेच या घाटाचाही वापर आता अवैध, अनैतिक गोष्टींसह आसपासच्या परिसरातील घनकचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी केला जात आहे. त्यात भर म्हणून शहर व परिसरातील काही कसायांकडून कापलेल्या जनावरांच्या अनावश्यक भागांसह स्थानिक पोलिसांनी कारवायांमधून जप्त केलेल्या गोमांसाचीही विल्हेवाट याच घाटात लावण्याचे प्रकार सुरु झाल्याने भविष्यात संगमनेरचा कर्‍हे घाट आसपासच्या गावांसह प्रवाशांच्याही आरोग्यासाठी धोकादायक ठरण्याची दाट शक्यता आहे. प्रशासनाने वेळीच गांभीर्य ओळखून अडगळीत गेलेल्या या दोन्ही घाटांचा ‘डंपिंग यार्ड’ म्हणून होत असलेला वापर थांबवण्याची गरज आहे.

पूर्वी नाशिकहून पुण्याला जाणार्‍या वाहनांसह प्रवाशांना संगमनेरच्या कर्‍हे व चंदनापुरी घाटात आल्यानंतर धडकी भरायची. पाठोपाठ असलेल्या धोकादायक वळणांसह अंगावर येणारे चढ आणि अचानक उतारामुळे अनेकांचे वाहनावरील नियंत्रण सुटून असंख्य अपघात घडण्याचे प्रकारही २०१७ पर्यंत या दोन्ही घाटांमध्ये नियमितपणे सुरु होते. आजवर शेकडो प्रवाशांचे बळी घेणारे आणि असंख्य प्रवाशांना गंभीर दुखापती देणारे हे दोन्ही घाट नव्याने आकाराला आलेल्या सिन्नर ते खेड या महामार्गाच्या नूतनीकरणात पूर्णतः अडगळीत गेले. नव्या महामार्गावर कर्‍हे घाटातील उभा डोंगर कापून सरळ रस्ता काढला गेल्याने घाटातून वळसे घेत जाणे थांबले. हा रस्ता एका आणि नवा रस्ता दुसर्‍या बाजूला अशी येथील रचना असल्याने मधल्याभागात असलेली दरी आता अनेकांसाठी ‘डंपिंग यार्ड’ ठरली आहे.

मागील काही वर्षांपासून केंद्र आणि राज्य सरकारने स्वच्छतेवर भर देत ग्रामपंचायतीपासून मंत्रालयापर्यंत सर्वांना अभियानात बांधल्याने आज गावोगावी स्वच्छता दिसून येते. मात्र गावातून जमा होणार्‍या घनकचर्‍याबाबत आजही काही नगरपरिषदा, नगरपंचायती व बहुतेक ग्रामपंचायती स्वयंपूर्ण नाहीत. मोठ्या लोकवस्तीच्या गावांकडेही घनकचर्‍याची विल्हेवाट लावण्याची शास्त्रीय पद्धत नाही, यावरुन ही गोष्ट अधोरेखीत होते. मध्यंतरी शहराभोवतीच्या ढोलेवाडी, गुंजाळवाडी, घुलेवाडी व कासारवाडी शिवारात बिबट्यांचा संचार दिसून आला, त्यामागेही घनकचराच कारणीभूत असल्याचेही वनाधिकार्‍यांच्या निरीक्षणातून समोर आले होते. म्हणजेच रस्ते, गल्ल्या, चौक अथवा परिसर स्वच्छ दिसत असला तरीही त्यातून जमा होणारा घनकचरा मात्र कोठेतरी साठवून तो आपोआप सडण्याचीच प्रतीक्षा होत असल्याचेही स्पष्ट झाले.

चंदनापुरी आणि कर्‍हे हे दोन्ही घाटही याच अवस्थेत असून आसपासच्या काही भागातील घनकचर्‍यासह महामार्गावरील ढाबे, हॉटेल्स यांचाही नियमित घनकचराही आता सोयीस्करपणे या घाटात फेकला जात आहे. मेलेल्या पाळीव जनावरांची विल्हेवाट लावण्यासाठीही हा घाट अनेकांना सोयीचा ठरला आहे. छोट्या-मोठ्या उद्योगातून नाश पावलेल्या खाद्य गोष्टी, काही कसायांकडून कापलेल्या जनावरांचे अनावश्यक भाग टाकण्याचे प्रकार आणि त्यात भर म्हणून पोलीस कारवाईत जप्त होणारे गोमांस याच घाटात गाडण्याची पद्धत या सगळ्यांचा परिपाक चंदनापूरीसह आता कर्‍हे घाटाचाही वापर डंपिंग यार्ड सारखा होत असल्याचे उघड होत आहे. या परिसरातून जाताना येणारी दुर्गंधी भयानक आहे. त्यामुळे जून्या घाटरस्त्यावर बहुतेक अभावानेच कोणी जाते.

अशा स्थितीत हा घाट आता पूर्णतः अडगळीत गेल्याने मेलेल्या जनावरांसह एखाद्या माणसालाही कोणी मारुन टाकले तरीही त्याची पूर्णतः विल्हेवाट लागून सांगाडा राहिला तरी कोणाला समजणार नाही इतकी या घाटाची अवस्था बिकट झाली आहे. हा प्रकार असाच सुरु राहिला तर भविष्यात त्याची व्याप्ती वाढून आसपासच्या रहिवाशांना जगणं अवघड होण्याची भीती आहे. त्यामुळे प्रशासनाने वेळीच गांभीर्य लक्षात घेवून अडगळीत गेलेल्या चंदनापुरी आणि कर्‍हे या दोन्ही घाटांमध्ये बेकायदा पद्धतीने सुरु असलेले डंपिंग तातडीने थांबवून संबंधितांवर पर्यावरण संरक्षण कायद्यातंर्गत कारवाई करण्याची गरज आहे.

खरेतर, या समस्येबाबत संगमनेर खुर्दमधील संगमनेर नगरपरिषदेच्या घनकचरा डेपोचा विषय खूप ताजा आहे. तेथील रहिवाशांना जगणं मुश्किल झाल्यानंतर मोठे आंदोलन उभे राहिले. पालिकेनेही पुढाकार घेवून घनकचरा व्यवस्थापनासाठी आवश्यक सामग्री खरेदी करुन शहरातून जमा होणार्‍या कचर्‍यावरील प्रक्रियेतून खतनिर्मितीचा प्रकल्प सुरु केला. कचरा डेपोला सुरक्षा भिंत घातल्याने मोकाट जनावरांचा उपद्रवही थांबला. खतविक्रीतून उत्पन्नही सुरु झाले. तत्कालीन मुख्याधिकारी सचिन बांगर यांनी अंतर्गत भागात उद्यानाची निर्मिती केल्याने कधीकाळी नाकाला रुमाल धरुन मार्ग काढावा लागणारा हा परिसर डबे घेवून सहलीला जावं इतका सुंदर केला आहे. अशाप्रकारचे प्रकल्प किमान मोठ्या ग्रामपंचायतींनीही उभारण्याची गरज आहे. त्यातून परिसरातील शेतकर्‍यांना खतविक्री करुन उत्पन्नही मिळवता येवू शकते.


‘घनकचर्‍या’ची पद्धतशीर विल्हेवाट ही सर्वात मोठी समस्या आहे. वाढत्या वसाहतींमुळे भविष्यात ती अधिक वाढत जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक ग्रामपंचायतींनी आपापल्या क्षेत्रातील घनकचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी यंत्रणा उभी करण्यास प्राधान्य देण्याची गरज आहे. त्यातून उत्पादित होणार्‍या खताच्या विक्रितून उत्पन्नही सुरु होवू शकते. संगमनेर नगरपरिषदेचा संगमनेर खुर्द येथील प्रकल्प त्यासाठी आदर्श असून तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतींच्या पदाधिकार्‍यांनी तो एकदा आवर्जुन पाहण्याची गरज आहे. काही गावांचा समूह तयार करुनही असा प्रकल्प उभारला जावू शकतो.

Visits: 356 Today: 2 Total: 1577785

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *