सोनियाजींना ईडीची नोटीस ही लोकशाहीची चिंता वाढविणारी ः थोरात काँग्रेसच्या नवसंकल्प शिबिरानिमित्त पत्रकार परिषदेत केंद्र सरकारवर टीका

नायक वृत्तसेवा, शिर्डी
देशात हुकूमशाही व एकाधिकारशाही वाढविणार्‍या भाजप सरकारने सातत्याने केंद्रीय यंत्रणांचा अत्यंत गैरवापर केला आहे. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्या सोनिया गांधी व खासदार राहुल गांधी यांना दिलेली ईडीची नोटीस ही लोकशाहीची चिंता वाढवणारी असून संपूर्ण देशातील जनता व काँग्रेसजन हे सोनिया गांधी यांच्या पाठिशी असल्याचे प्रतिपादन विधीमंडळ पक्षनेते व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

शिर्डी येथे काँग्रेसच्या नवसंकल्प शिबिरानिमित्त ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रवक्ते अतुल लोंढे, डॉ. सचिन सावंत, आशिष दुवा आदी उपस्थित होते. केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांना नामोहरम करण्याचे काम भाजप सरकार करत आहे. देशात जातीय व धार्मिक तेढ निर्माण करून लोकशाहीवर आघात त्यांनी सुरू केला आहे. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी सोनिया गांधी व राहुल गांधी यांना दिलेल्या ईडीच्या नोटीस अत्यंत दुर्देवी असून लोकशाहीची चिंता वाढविणारी आहे. भाजप सरकारकडून सातत्याने लोकशाहीवर आघात होत आहे हे देशाच्या दृष्टीने चांगले नाही. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी संपूर्ण देशातील जनता आणि काँग्रेसजन हे सोनिया गांधी यांच्या पाठिशी खंबीर उभी असून भाजपच्या या दडपशाहीमुळे देशातील जनतेमध्ये प्रचंड रोष व असंतोष निर्माण झाला असल्याचेही नामदार बाळासाहेब थोरात यांनी म्हंटले आहे.

तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, उदयपूर संकल्प शिबिरातील अर्थकारणाच्या गटातून मोदी सरकारच्या सध्याच्या धोरणांवर तीव्र विरोध करण्यात आला आहे. सार्वजनिक कंपन्यांच्या काही भांडवलदारांना कवडीमोल किंमतीत विक्री, राज्यांच्या अधिकारावर गदा या मुद्द्यांबरोबर भविष्यातील आधुनिक तंत्रज्ञानाचे मनुष्यबळ तयार करावे लागणार आहेत. 1990 च्या आर्थिक बदलानंतर टेलिकॉम व पेट्रोल क्षेत्रातील सत्ता काही उद्योजकांच्या हाती गेली आहे. महागाईमुळे देशात महामंदी येईल अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली असून केंद्राकडून राज्याला कायम सापत्न वागणूक दिली जात असल्याचेही ते म्हणाले.

Visits: 147 Today: 1 Total: 1870817

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *