‘तोतयां’ची फिर्याद देणार्या ‘खर्या’ पोलिसालाच मनस्ताप! घारगाव पोलिसांचा ‘अजब’ कारभार; सहा तासांनी अज्ञात चौघांवर गुन्हा..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
मनमानी कारभार, कामचुकारपणा, निष्क्रियता आणि प्रचंड हप्तेखोरी यामुळे गेल्याकाही वर्षात तालुक्याच्या पठारभागासाठी ‘डोकेदुखी’ ठरत असलेल्या घारगाव पोलीस ठाण्यातून आणखी एक अजब प्रकार समोर आला आहे. या घटनेत चक्क पोलीस मुख्यालयातंर्गत सेवेत असलेल्या एका पोलीस हवालदारालाच घारगाव पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे मनस्ताप सहन करावा लागला. सोमवारी पहाटे बाळेश्वर मंदिराच्या परिसरात घडलेल्या या घटनेत ‘खासगी’ वाहनावर ‘पोलीस’ नावाची पाटी लावून आलेल्या चौघांनी आपण पोलीस आणि वनविभागात सेवेत असल्याची बतावणी करीत चक्क ‘खर्या’ पोलिसालाच हातपाय तोडून टाकण्याच्या धमक्या भरल्या. या प्रकारानंतर संबंधित कर्मचार्याने थेट नियंत्रणाकक्षा द्वारा घारगाव पोलिसांची मदत मागितली. त्यानंतर सकाळी नऊच्या सुमारास तक्रार देण्यासाठी घारगावला पोहोचलेल्या ‘त्या’ कर्मचार्याला तब्बल सहातास पोलीस ठाण्यातच बसवून ठेवण्यात आले. अखेर श्रीरामपूरच्या अप्पर अधिक्षकांनी कानउघडणी केल्यानंतर अखेर दुपारी चारच्या सुमारास अज्ञात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेतून घारगाव पोलीस पुन्हा एकदा चर्चेत आले असून पठारभागातील संतापाला नव्याने हवा मिळाली आहे.
याबाबत घारगाव पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरचा धक्कादायक प्रकार सोमवारी (ता.27) पहाटे सहाच्या सुमारास वनविभागाच्या हद्दित असलेल्या बाळेश्वर देवस्थानाच्या परिसरात घडला. या मंदिराच्या परिसरात अहिल्यानगर पोलीस मुख्यालयाच्या बिनतारी संदेश यंत्रणेचा नियंत्रण कक्ष आहे. त्याच्या सुरक्षेसाठी या ठिकाणी 24 तास एका सुरक्षा रक्षकाची नेमणूक असते. त्यासाठी थेट पोलीस मुख्यालयातूनच कर्मचार्यांची नियुक्ति केली जाते. त्यानुसार रविवारी सकाळी पोलीस हवालदार रघुनाथ खेडकर कर्तव्यावर हजर झाले. त्यावेळी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे काम सुरु असल्याने त्यांनी तेथील कामगारांशी चर्चा करुन नंतर ते आपल्या कामाच्या ठिकाणी रुजू झाले.
त्याच दिवशी रात्री आठच्या सुमारास संबंधित पोलीस कर्मचारी आणि प्रवेशद्वाराचे काम करणारे कामगार अशा सगळ्यांनी एकत्रित बसून जेवण केल्यानंतर हवालदार खेडकर आपल्या बिनतारी यंत्रणेच्या कक्षात निघून गेले. तर, मंदिराचे काम करणारे कर्मचारी त्यांना दिलेल्या परिसरात एका खोलीत झोपण्यासाठी गेले. सोमवारी (ता.27) पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास मंदिर परिसरात अचानक आरडाओरड आणि शिवीगाळ सुरु असल्याचा आवाज ऐकून हवालदार खेडकर आपल्या कक्षाच्या बाहेर आले त्यावेळी तेथे असलेले चौघे बांधकाम मजुरांशी वाद झालीत असल्याचे त्यांना दिसले.
त्यामुळे त्यांनी तत्काळ तेथे धाव घेत वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान त्यांनी बिनतारी यंत्रणेवरुन नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून घारगाव पोलिसांकडून मदतीची मागणी केली. हवालदार खेडकर यांचे बिनतारीवरील संभाषण ऐकूण त्यावेळी मजुरांशी हुज्जत घालणार्यांमधील सचिन वैष्णव नावाच्या इसमाने ‘मी पण पोलीस आहे, तुम्ही जास्त हुशारी करु नका. खाली येवून बोलण्याचा तुम्हाला कोणताही अधिकार नाही’ असे म्हणत चक्क हवालदारावरच दरडावला. त्याचवेळी त्यांच्यातील एकाने आपण ‘वनाधिकारी’ असल्याची बतावणी करीत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी या तोतया वनाधिकार्याने ‘सदरच्या खोल्या आमच्या आहेत, तुम्ही मंदिरात जावून झोपायचे, चालते व्हा इथून’ असे म्हणतं त्याने ‘त्या’ खर्या पोलीस कर्मचार्यासह इतर मजुरांना दमबाजी केली.
तर, दोघा तोतयांसोबत असलेल्या अन्य दोघांनीही त्या सर्वांना अतिशय घाणेरड्या भाषेत शिवीगाळ करीत धमक्या भरल्या. जवळपास अर्धातास चाललेल्या या प्रकारानंतर त्या चारही इसमांनी ‘आम्ही खाली कमानीजवळच राहातो, तुम्ही खाली या, तुमचे हातपायच तोडतो..’ अशा सज्जड दम भरुन मंदिराच्या दक्षिणबाजूला पोलीस पाटीसह लावलेल्या इर्टिंगा गाडीत बसून गेले. त्यानंतर काही वेळाने घारगाव पोलिसांचे वाहनही बाळेश्वर मंदिराजवळ आले. मात्र तो पर्यंत संबंधित ‘तोतये’ तेथून लंपास झालेले होते. या घटनेनंतर बाळेश्वर बिनतारी यंत्रणेवर कार्यरत असलेल्या पोलीस हवालदार रघुनाथ खेडकर यांनी सकाळी नऊच्या सुमारास घारगाव पोलीस ठाणे गाठले. मात्र तेथे गेल्यानंतर दुपारी तीन वाजेपर्यंत त्यांना कोणीही विचारले नाही.
त्यांनी वारंवार ड्युटीवरील ठाणे अंमलदाराला फिर्याद घेण्याची विनवणी केली, मात्र तोतया पोलिसांविरोधात कैफीयत घेवून आलेल्या खर्या पोलीस कर्मचार्याचे ऐकायला कोणीही तयार होईना. अखेर संबंधित हवालदाराने श्रीरामपूरचे अप्पर अधिक्षक वैभव कलबुर्गे यांना फोन केल्यानंतर त्यांनी घारगाव पोलिसांची कानउघडणी केली. त्यानंतर तब्बल सहातासांनी हवालदार रघुनाथ खेडकर यांची फिर्याद नोंदवण्यात आली. त्यानुसार सचिन वैष्णवसह अन्य तिघांवर भारतीय न्यायसंहितेच्या कलम 352, 351 (2) (3), 3 (5) प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या घटनेने घारगाव पोलीस ठाण्याचा मनमानी कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून चक्क पोलीस कर्मचार्यालाच सहा-सहातास फिर्याद देण्यासाठी ताटकळावे लागत असेल तर, सामान्य माणसांची कार्य स्थिती असेल असे सवाल विचारले जावू लागले आहेत.
अवाढव्य संगमनेर तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती अबाधित रहावी यासाठी 15 वर्षांपूर्वी कार्यान्वित झालेले घारगाव पोलीस ठाणे सुरुवातीचा कालावधी सोडल्यानंतर सातत्याने पठारवासियांसाठी डोकेदुखी ठरत आहे. येथे येणार्या प्रभारी अधिकार्यांची मनमानी, कामचूकारपणा, निष्क्रियता आणि त्यातून फोफावलेली हप्तेखोरी सर्वसामान्यांसाठी अत्यंत त्रासदायक ठरत असून येथील पोलिसांच्या कारभाराचे ‘ऑडिट’ करुन निष्क्रिय आणि बरबटलेल्या अधिकारी व कर्मचार्यांवर कारवाईची मागणी होत आहे.