कोल्हार-कोपरगाव रस्त्याचे काम भूसंपादनाविनाच सुरू नियमाप्रमाणे संपादन करुन शेतकर्यांना भरपाई द्या ः निर्मळ

नायक वृत्तसेवा, राहाता
ब्रिटीशकालिन काँक्रिटचा एकेरी वाहतूक असलेल्या कोल्हार-कोपरगाव रस्त्याचे स्वातंत्र्यानंतर एकदाही भूसंपादन झालेले नाही. सध्या या रस्त्याचे राष्ट्रीय महामार्ग योजनेतून चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. भूसंपादन न होताच हा रस्ता शेतकर्यांच्या शेतात घुसला आहे. त्यामुळे शेतकर्यांचे नुकसान होत असून शासनाने नियमाप्रमाणे संपादन करून शेतकर्यांना जमिनीची भरपाई द्यावी, अशी मागणी पिंपरी निर्मळ येथील शेतकरी व गणेशचे संचालक सूर्यकांत निर्मळ यांच्यासह शेतकर्यांनी केली आहे.

नगर-कोपरगाव रस्त्याचे सध्या राष्ट्रीय महामार्ग योजनेतून चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. हा रस्ता ब्रिटीश काळात सुरुवातीला बारा फूट काँक्रिटचा होता. स्वांतत्र्यांनंतर याचे रूपांतर डांबरी एकेरी रस्त्यात झाले. वाहतूक वाढल्याने त्यानंतरच्या काळात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून ह्या रस्त्याचे दोन पदरी डांबरीकरण झाले. राज्य महामार्ग क्रमांक 10 नावाने ओळखला जाणारा हा रस्ता मध्यंतरी जागतिक बँक प्रकल्पाकडे वर्ग झाला. विभागाने या रस्त्याचे चौपदरीकरणांतर्गत मध्यापासून एका बाजूला साडेसात मीटर डांबरीकरण केले.

रस्त्याची दयनीय अवस्था व प्रवांशाचे हाल पाहता हा रस्ता राष्ट्रीय महामार्गात रूपांतरीत करण्यात आला. एनएच-160 हा क्रमांक मिळाल्यावर राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून या रस्त्याचे सध्या नव्याने चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. या रस्त्याच्या मध्यापासून एका बाजूला 9 मीटर डांबरी व 15 मीटरपर्यंत साईडपट्टी एवढ्या हद्दीत काम करीत आहे. या रस्त्यामध्ये काळानुरुप सार्वजनिक बांधकाम, जागतिक बँक प्रकल्प, राष्ट्रीय महामार्ग असा बदल झाला. दरवेळी रस्त्याची रूंदीही वाढली मात्र स्वांतत्र्यांनंतरच्या काळात दर्जा व रुंदी वाढून या रस्त्यासाठी नव्याने भूसंपादन झाले नाही. आज काम करताना शेतकर्यांच्या हद्दीत घुसून काम करीत असल्याचे शेतकर्यांचे म्हणणे आहे. यामध्ये मोठी झाडे, शासकीय नाला बंडीगचे बांध बंदिस्ती निघत आहेत. त्यामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान होत आहे. शेतकर्यांचा महामार्गाच्या कामाला विरोध नाही. मात्र शासनाने जादा लागणार्या जमिनीचे भूसंपादन करून शेतकर्यांना मोबदला द्यावा अशी मागणी या रस्त्याचे शेतकरी व राहाता तालुका असंघटित काँग्रेसचे अध्यक्ष सुभाष निर्मळ, गणेशचे संचालक सूर्यकांत निर्मळ, यादव घोरपडे, विठ्ठल घोरपडे आदिंसह शेतकर्यांनी केली आहे.
