प्रजासत्ताक दिनी शहर पोलिसांची सर्जिकल स्ट्राईक! कारवाईचा दिखावा नकोय सातत्य हवं; नव्याने गुन्हेगारीचेे केंद्र ठरतोय परिसर..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
पालिका कार्यालयापाठोपाठ विद्यालय, विमा कंपनीचे मुख्यालय, पेट्रोल पंप आणि मध्यमवर्गीय लोकवस्तीचा शांत परिसर म्हणून कधीकाळी ओळखल्या जाणार्‍या अकोले नाका परिसराला आता गुन्हेगारीचे ग्रहण लागले आहे. वर्षातील कोणत्याही दिवशी देशी-विदेशी मद्य उपलब्ध असणारे ठिकाण म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या या परिसरात मध्यंतरी अचानक वाटमारी, हाणामारी आणि लुटीच्या घटनांमध्येही मोठी वाढ झाली. या सगळ्या घटना राजरोस दररोज घडत असताना पोलिसांनी मात्र प्रजासत्ताक दिनी अचानक ‘कर्तव्य’ जागल्याप्रमाणे धडाधड छापे घालीत ‘ड्राय-डे’च्या दिवशी बेकायदा देशी दारुची विक्री करणार्‍या दोघा महिलांसह चौघांवर कारवाई केली. या छापेमारीत पोलिसांच्या हाती किरकोळ मुद्देमाल लागला. मात्र या कारवाईतून दिवस कोणताही असो, या परिसरात गुन्हेगारांचा नेहमीच वावर असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. शहर पोलीस ठाण्यापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर पोसली जात असलेली ही गुन्हेगारी वेळीच नियंत्रित केली गेली नाही, तर भविष्यात त्याचा शहराच्या सामाजिक स्वास्थावर विपरित परिणाम होण्याची दाट शक्यता आहे.


कधीकाळी वेडूमाता मंदिर आणि त्या भोवतीची तुरळक लोकवस्ती वगळता थेट मालपाणी विद्यालयापर्यंत मोकळा असणारा जून्या अकोले नाक्याचा परिसर आज लोकवस्तीसह व्यावसायिक कारणांनीही गजबजला आहे. व्यापारी संकुल, विमा कंपनीचे मुख्यालय, त्या लगत पेट्रोल पंप यामुळे या परिसराचे महत्त्वही वाढले आहे. मात्र त्याचवेळी पूर्वी मर्यादीत असलेला देशी व गावठी दारुचा बेकायदा व्यवसाय मात्र अलिकडच्या काळात मोठ्या प्रमाणात फोफावल्याने या परिसरात गुन्हेगारांचा वावरही वाढला आहे. अशावेळी वारंवार त्यांच्याकडून सामाजिक स्वास्थाला नख लावण्याचे प्रकार घडत असून रस्त्यात आडवून मोबाईल, रक्कम व ऐवज काढून घेण्याच्या घटनांसह विनाकारण वाद काढून एखाद्याला बेदम मारहाण करण्याचे प्रकारही या परिसरात नित्याचे झाले आहेत.


शहर पोलीस ठाण्यापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेल्या या परिसरातील बेकायदा दारु विक्रेत्यांमध्ये व्यावसायिक स्पर्धेतून वारंवार हाणामार्‍या होत असतात. यापूर्वी झालेल्या अशा प्रकारांमध्ये घातक साधनांचाही वापर केला गेला आहे. मात्र त्यानंतरही येथील अवैध व्यवसाय कमी होण्याऐवजी त्यात वाढच होत असून त्यातून गुन्हेगारांचा वावर वाढून वेगवेगळ्या घटनाही समोर येत आहेत. यातील काही प्रकरणांमध्ये पोलिसांकडे तक्रार देवूनही त्याची दखल घेतली गेली नसल्याचेही त्या-त्यावेळी समोर आले होते. त्यातूनच अशा घटनांना बळ मिळून कधीकाळी शांत असलेल्या या भागाला आता गुन्हेगारीचे ग्रहण लागले आहे. या परिसरात असणारे जूने आणि नामांकित विद्यालय, शासकीय कार्यालये यांचा विचार करुन पोलिसांनी हा संपूर्ण परिसर अवैध व्यवसायांसह गुन्हेगार मुक्त करण्याची गरज आहे.


मात्र येथील बेकायदा व्यवसायांकडे व त्यातून निर्माण होणार्‍या गुन्हेगारीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असतानाच प्रजासत्ताक दिनी तिरंग्याला सलाम ठोकल्यानंतर अचानक कर्तव्य जागलेल्या पोलिसांनी अकोले नाक्याचा परिसर लक्ष्य केला. यावेळी पोलिसांनी देशीदारुच्या अड्ड्यांवर सर्जिकल स्ट्राईक करीत सकाळी साडेदहाच्या सुमारास अकोले नाका परिसरात दारु तस्करीत यापूर्वीही गुन्हे दाखल असलेल्या एका महिलेच्या घराजवळ लपून बॉबी नावाची देशीदारु विकणार्‍या किरण बबन नाईक (वय 35, बुळकुंडेमळा, ढोलेवाडी) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक हजार 330 रुपयांच्या 19 बाटल्या जप्त करण्यात आल्या. यानंतर साडेअकराच्या सुमारास पोलिसांनी वेडूमाता मंदिराजवळील प्रकाश सूर्यवंशी याच्या घराजवळील छाप्यात संदीप भाऊसाहेब शेटे (वय 37, रा. डेरेवाडी) याला ताब्यात घेत त्याच्याकडून एक हजार 960 रुपयांच्या बॉबी देशी दारुच्या 28 बाटल्या हस्तगत केल्या.


या कारवाईनंतर अवघ्या तासाभरातच पोलिसांनी आपला मोर्चा अकोले नाक्यावरील जुलेखा शौकत शेख या महिलेच्या घराकडे वळवून तिला देशीदारुच्या 11 बाटल्यांसह रंगेहाथ पकडले. येथील कारवाई सुरु असतानाच पोलिसांच्या दुसर्‍या पथकाने याच परिसरातील मीरा भारत सोनवणे या महिलेच्या घरावरही छापा घातला. मात्र पोलिसांची कुणकुण लागल्याने ती आधीच पळून गेली होती. यावेळी पोलिसांना तिच्या ताब्यात असलेल्या देशी दारुच्या 90 मिलीच्या 20 बाटल्या आढळून आल्या. यासर्वांवर महाराष्ट्र दारुबंदी कायद्यासह प्रतिबंधात्मक कलमान्वये कारवाई करण्यात आली आहे.

शहरातील नामांकित विद्यालयासह विमा कंपनीचे कार्यालय, व्यापारी संकुल आणि पेट्रोलपंप यामुळे महत्त्व वाढत असलेल्या अकोलेनाका परिसरात पोलिसांच्या दुर्लक्षामुळे गुन्हेगारी फोफावत आहे. त्यातून रात्रीच्यावेळी या परिसरात वाटमारी, हाणामार्‍या, वाहने जळीताचे प्रकार आणि अवैध व्यवसायात सातत्याने वाढ होत आहे. अशा बेकायदा व्यवसायांमुळे या परिसरात गुन्हेगारी तत्त्वांचाही वावर वाढल्याने भविष्यात या परिसराचे आणि पर्यायाने शहराचे सामाजिक स्वास्थ धोक्यात येण्याची शक्यता आहे. पोलिसांनी वेळीच त्यावर ठोस उपाय योजण्याची गरज या निमित्ताने शहरातून व्यक्त होत आहे.

Visits: 46 Today: 1 Total: 255893

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *