हिवरगाव पठार विकासाचे ‘मॉडेल’ बनविणार : आहेर
हिवरगाव पठार विकासाचे ‘मॉडेल’ बनविणार : आहेर
सेंट्रल बँक मिनी शाखेचा शुभारंभ; कोरोना योद्ध्यांचा सन्मान
नायक वृत्तसेवा, घारगाव
हिवरे बाजार व राळेगण सिद्धी या गावांचा कायापालट होवूनही दोन्ही आदर्श गावे जगाच्या नकाशावर पोहचली आहे. त्यानुसारच ग्रामस्थांच्या माध्यमातून हिवरगाव पठार गावाचाही लवकरच कायापालट होणार असून, त्या पद्धतीने विकास कामांना सुरूवातही झाली आहे असे प्रतिपादन ग्रामसेवक विजय आहेर यांनी केले आहे. यावेळी सेंट्रल बँकेच्या मिनी शाखेचा शुभारंभ व कोरोना योद्ध्यांचा सन्मानही करण्यात आला.

संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील हिवरगाव पठार येथे सेंट्रल बँकेच्या मिनी शाखेचा शुभारंभ व कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला. त्यानिमित्ताने छोटेखानी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हरिभाऊ नागरे होते. तर व्यासपीठावर साकूर सेंट्रल बँकेचे व्यवस्थापक संभाजी घोटेकर, बाळासाहेब वनवे, भाऊसाहेब वनवे, विश्वनाथ वनवे, भरत वनवे, सीताराम वनवे, संतोष डोळझाके, संतोष वनवे, विलास केकाण, अमोल जाधव, असीफ शेख, भाऊसाहेब नागरे, यादव नागरे, धर्मा वनवे, जनार्दन नागरे, रामदास वनवे, संदीप खाडे, एकनाथ खाडे, दशरथ वनवे आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना ग्रामसेवक आहेर म्हणाले, कोरोनाच्या काळात काम करताना खूप अडी-अडचणी आल्या. तरीही आम्ही सर्वजण इमाने इतबारे कर्तव्य निभावत आहे. तीच आज तुम्ही ग्रामस्थांनी आम्हांला आमच्या कामाची दिलेली पोच पावती म्हणून आमचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान केला आहे. ही आमच्यासाठी कौतुकाची बाब असून कामाला अधिक उभारी मिळणारी आहे. जो काम करतो त्याकडूनच चुका होतात. परंतु तरी देखील गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. हिवरे बाजार व राळेगण सिद्धीप्रमाणे हिवरगाव पठारही विकासाचे ‘मॉडेल’ बनविण्याचा निर्धार व्यक्त करुन त्या दिशेने आपली वाटचाल सुरू असल्याचेही त्यांनी शेवटी आवर्जुन सांगितले.

सेंट्रल बॅकेचे व्यवस्थापक घोटेकर म्हणाले, गावासह परिसरातील नागरिकांना पैसे काढण्यासाठी साकूर येथे असलेल्या सेंट्रल बँकेमध्ये यावे लागते. त्यामुळे बराचसा वेळ वाया जात होता. हा वेळ वाया जावू नये म्हणून तुमच्यासाठी हिवरगाव पठार गावात सेंट्रल बँकेची मिनी शाखा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे आता तुम्हांला विविध योजनांचाही लाभ घेता येणार आहे आणि पैसे काढता येणार. तसेच बँकेसंदर्भात काही अडी-अडचणी असतील तर तुम्ही मला फोन केला तरी चालेल असेही घोटेकर यांनी सांगितले. याप्रसंगी कोरोनाच्या काळात जीवावर उदार होऊन काम करणारे महसूल, आरोग्य, अंगणवाडी, शिक्षक, ग्रामपंचायत कर्मचारी, पोलीस पाटील आदिंचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला.

