जोर्वे नाक्यावरील हल्ल्याची धग तालुक्याच्या ग्रामीणभागात! दहा गावांमध्ये विशेष ग्रामसभा; गुन्हेगारी प्रवृत्तीचे समूळ उच्चाटण करण्याची मागणी..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्याच्या ग्रामीणभागातील चौदा गावांना शहराशी थेट जोडणार्‍या ‘जोर्वे नाक्यावरील’ घटनेचे पडसाद तालुक्याच्या ग्रामीणभागातही उमटत असून त्यातील डझनभर गावांनी विशेष ग्रामसभा बोलावून निषेधाचे ठराव केले आहेत. त्यामुळे जोर्वे प्रकरणाच्या समूळ चौकशीसाठी पोलिसांवरील दबावही वाढला असून या ग्रामपंचायतींनी अतिक्रमण आणि त्या आडून होणार्‍या अवैध कृत्यांवरही बोटं ठेवल्याने शहराच्या नाक्यांवर आणि गावभर बोकाळलेल्या अतिक्रमणांचा आणि त्याच्या छायेत पोसल्या जाणार्‍या गुन्हेगारीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या घटनेने प्रभावित असलेली बहुतेक गावे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राहाता मतदार संघाशी संलग्न असल्यानेही या प्रकरणाचे गांभीर्य वाढले असून त्याचा परिणाम या घटनेचा तपास थेट ‘एलसीबी’कडे देण्यामधूनही दिसून येतो.


या घटनेनंतर सर्वप्रथम सोमवारी (ता.29) जोर्वे येथे विशेष ग्रामसभा बोलावण्यात आली. या सभेत रविवारी घडलेल्या घटनेचा निषेध नोंदवून सर्व ओरांपीचा शोध व त्यांना कायदेशीर कठोर शासन करण्याची मागणी करण्यात आली. याच ठरावात तालुक्यातील जोर्वे गावासह निंभाळे, रहिमपूर, कनोली, मनोली, वाघापूर, रायते, ओझर खुर्द आणि बुद्रुक, कनकापूर, जाखूरी, पिंपरणे, देवगाव, उंबरी बाळापूर आणि कोल्हेवाडी या चौदा गावांमधील हजारों महिला, विद्यार्थी व विद्यार्थीनी, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक या रस्त्यावरुन ये-जा करीत असतात. शहराला जोडणार्‍या मुख्य चौकापासून फादरवाडीकडे एका समाजाची लोकसंख्या अधिक असल्याने त्यांनी रस्त्यात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणं केली आहेत.


त्यामुळे रस्त्यावरील वाहतुक वारंवार विस्कळीत होत असून त्याचा या गावातील संबंधितांना वारंवार त्रास सहन करावा लागतो. अतिक्रमण व त्यापुढे ग्राहकांची वाहने, सतत दीडशे ते दोनशेंची वर्दळ, अस्ताव्यस्त उभ्या राहणार्‍या रिक्षा या सगळ्यामुळे तेथे गुन्हेगारी वावरही वाढल्याचे व त्यांच्याकडून महिला व मुलींच्या छेडछाडीच्या घटना घडल्याचा उल्लेखही ठरावात करण्यात आला आहे. सदरील ठिकाणी जमा होणार्‍या व्यक्ती विशिष्ट समाजातील लोकांना लक्ष्य करुन त्यांच्याशी वाद घालतात आणि मग जमावाने गोळा होवून मारहाण करतात. रविवारी घडलेली घटनाही तशाच प्रकारची असल्याचे व हा वारंवार होणारा त्रास समूळ उपटून काढण्याची मागणीही ठरावातून केली गेली आहे.


सबब, अशा संवेदनशील भागातील अतिक्रमणे काढून त्या भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची व जोर्वेनाका परिसरात कायमस्वरुपी पोलीस चौकीचीही मागणी करण्यात आली आहे. या ठरावाच्या प्रती प्रांताधिकार्‍यांना देण्यात आल्या असून त्यासह राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व महसूल मंत्र्यांनाही पाठवण्यात आल्या आहेत. जोर्वे पाठोपाठ अशाच प्रकारचे ठराव विशेष ग्रामसभा घेवून रहिमपूर, रायतेवाडी, कोल्हेवाडी, उंबरी बाळापूर, कनोली, मनोली, कोकणगाव-शिवापूर, मालुंजे, निंबाळे व पिंपरणे येथील ग्रामपंचायतींनीही केले असून त्याच्या प्रती सर्वत्र पाठवण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *