पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेमार्गात बदल अमान्य उपमुख्यमंत्री अजित पवार; जुन्या रेल्वेमार्गासाठी संघर्षाचीही तयारी..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
जुन्नर तालुक्यातील खोडदजवळील ‘जीएमआरटी’ प्रकल्पाच्या शास्त्रज्ञांनी आक्षेप घेतल्यानंतर देशातील पहिला प्रस्ताविक पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प रद्द करण्यात आला आहे. रेल्वेमंत्र्यांच्या या निर्णयानंतर तीनही जिल्ह्यात मोठी नाराजी निर्माण झाली आहे. अशातच चाकणमध्ये एका खासगी कार्यक्रमासाठी आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी सदरचा प्रकल्प अत्यंत विचारपूर्वक आणला असून या प्रकल्पाचा जुना मार्ग बदलण्याचे कारण कळत नाही अशा शबत आश्चर्य व्यक्त केले. काहीतरी सांगून जुना मार्ग बदलणे आपल्याला अमान्य असून प्रसंगी त्यासाठी दिल्लीत चर्चेसाठी जाण्याचीही तयारी असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
सततच्या वाहतूक कोंडीला पर्याय म्हणून गेल्या साडेतीन दशकांपासून चर्चेत असलेल्या ‘पुणे-नाशिक’ या देशातील पहिल्या दुहेरी सेमी हायस्पीड रेल्वेमार्गाच्या कामाला गेल्या दशकांत चांगला वेग आला होता. रेल्वे मंत्रालयाने तत्वतः मंजुरी दिल्यानंतर या प्रकल्पासाठी आवश्यक जमिनींचे थेट खरेदीखताद्वारे संपादनाचे कामही सुरु झालेले असताना मध्यंतरी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी अचानक खोडदजवळील ‘जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप’ (जीएमआरटी) प्रकल्पाच्या कामकाजावर प्रतिकूल परिणाम होत असल्याचे कारण सांगत हा प्रकल्पच रद्द करण्याची घोषणा केली. त्यांच्या या घोषणेनंतर पुणे, नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यात मोठी नाराजी निर्माण झाली असून जाणीवपूर्वक या प्रकल्पात खोडा घातला गेल्याची जनभावना आहे.
अशातच या प्रकल्पासाठी विशेष आग्रही असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सोमवारी (ता.27) चाकणमध्ये एका खासगी कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी उपस्थित पत्रकारांनी ‘पुणे-नाशिक’ जुन्या रेल्वेमार्गाबाबत त्यांना विचारले असता अचानक मार्गात बदल करण्याचा निर्णय आश्चर्यजनक असल्याचे प्रतिक्रिया त्यांनी दिली. हा रेल्वेमार्ग प्रस्ताविक मार्गानेच झाला पाहिजे अशी आपली प्रभावी मागणी आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असून प्रसंगी दिल्लीत जावून संबंधितांशी बोलणार असल्याचे पवार म्हणाले.
प्रस्तावित पुणे-नाशिक रेल्वेप्रकल्पासाठी गेल्या अर्थसंकल्पात आपण आर्थिक तरतुद केली होती. हा प्रकल्प होत असताना केंद्र सरकार भागीदार असणे आवश्यक आहे. त्यासाठी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमादरम्यान खेडच्या पुणे-नाशिक रेल्वे कृती समिती व चाकणच्या प्रकल्पबाधित शेतकर्यांच्या वतीने त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.