रस्त्याच्या कामासाठी आमदारांनी केली सात किलोमीटरची पायपीट! घाटघर – देवीचा घाट ते मेट मार्गे रस्ताच्या मागणीला नागरिकांतून जोर
नायक वृत्तसेवा, अकोले
शहापूर तालुक्यातील चोंढे येथे जागतिक बँकेच्या कर्ज पुरवठ्यावर घाटघर जलविद्युत प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे. सध्या 250 मेगावॅट विज तयार होते. मात्र येथून अहमदनगर जिल्ह्यातील घाटघर गावापर्यंतचे अंतर केवळ सात किलोमीटर असून ठाणे-अहमदनगर जिल्ह्याला जोडणारा हा रस्ता गेल्या वीस वर्षांपासून प्रलंबित आहे. या रस्त्याचे काम लवकरात लवकर मार्गी लागावे यासाठी नुकतीच सात किलोमीटरची पायपीट करुन रस्त्याच्या कामात येणार्या अडचणींची प्रत्यक्ष पाहणी अकोलेचे आमदार डॉ.किरण लहामटे, शहापूरचे आमदार दौलत दरोडा व माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी केली आहे.
सन 2004 मध्ये शहापूरातील घाटघर-चोंढे जलविद्युत प्रकल्पाचे पूर्ण झाले होते. तत्पूर्वी सन 2001 मध्ये शहापूर-घाटघर तसेच घाटघर-देवीचा घाट ते शहापूर तालुक्यातील मेट (चोंढे खुर्द) असे रस्ते सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले होते. त्यानंतर मात्र शासनाच्या उदासीनतेमुळे हा रस्ता वीस वर्षे लालफितीत अडकला आहे. या रस्त्याचे पुन्हा सर्वेक्षण केले आणि शासन स्तरावरील इतर परवानग्यांसाठी सन 2016 च्या 17 व्या अर्थसंकल्पात 50 लाख रुपयांच्या विशेष निधीची तरतूद देखील करण्यात आली. परंतु हा प्रश्न अद्यापही प्रलंबितच आहे. तर देवीचा घाट ते चोंढे खुर्द असा रोप-वे काढण्याचा देखील शासनाचा उपक्रम होता. मात्र या सर्व प्रक्रियेनंतर ठाणे व अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधींचे याकडे दुर्लक्ष झाले.
सद्य परिस्थितीत अकोले मतदारसंघाचे आमदार डॉ.किरण लहामटे यांनी या रस्त्याच्या पाहणीसाठी पायी दौर्याचे आयोजन केले होते. जवळजवळ अडीच ते तीन तासाचा हा पायी प्रवास करत त्यांनी घाटघर-देवीचा घाट ते शहापूर तालुक्यातील डोळखांब परिसरातील मेट (चोंढे खुर्द) रस्त्याची पाहणी केली. त्यांच्या सोबत शहापूरचे आमदार दौलत दरोडा व माजी आमदार पांडुरंग बरोरा होते. त्यांनी लेखी निवेदन देवून शासनाच्या निदर्शनास हा रस्ता आणून दिला आहे. घाटघर-चोंढे-डोळखांब-शेणवे-शहापूर असा रस्ता झाला तर ठाणे जिल्ह्यातील बहुतांशी तालुक्यांचा विकास होणार आहे. तर घाटघर-देवीचा घाट-मेट (चोंढे खुर्द) असा रस्ता झाला तर ठाणे-नाशिक-शिर्डी-अहमदनगर असे रस्ते जोडले जावून राष्ट्रीय इंधन, वेळ, दगदग वाचणार असून प्रवाशांचा आर्थिक तोटा देखील होणार नाही. ठाणे-अहमदनगर जिल्ह्यातील अनेक गावखेड्यातील लोकांना बाजारपेठ आणि रोजगार निर्माण होवून त्यांचा आर्थिक, शैक्षणिक व सांस्कृतिक विकास होण्यास चालना मिळेल. त्यामुळे लवकरात लवकर हा रस्ता पूर्ण करावा अशी मागणी नागरिकांतून जोर धरु लागली आहे.