टोलनाक्यावरील फरार आरोपींवर पोलिसांची संक्रात! पंधरा दिवसांनी लागले हाती; सणाला घरी येताच झाले जेरबंद..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
दोन वाहनांचा परस्परांना धक्का लागून सुरु झालेल्या वादात संबंध नसताना उडी घेत चौघांना लोखंडी रॉड, लाकडी दांडके आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करणार्या तिघा फरार आरोपींच्या मुसक्या आवळण्यात अखेर तालुका पोलिसांना यश आले आहे. गेल्या महिन्याच्या अखेरीस घडलेल्या या घटनेत भाजपच्या शहर उपाध्यक्षांसह चौघांना मारहाण करुन टोलनाक्यावरील तिघांचे टोळके पसार झाले होते. या घटनेने शहरात प्रचंड रोष निर्माण झाल्यानंतर गोंधळलेल्या पोलिसांनी धडक देणार्या वाहनातील नाशिकच्या चौघांसह एका अल्पवयीनाला अटकही केली होती. मात्र प्रकरणातील मुख्य आरोपीच हाती लागत नसल्याने तालुका पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. अखेर भोगीच्या दिनी रात्रीच्या अंधारात चोर पावलांनी घरी परतलेल्या ‘त्या’ तिघांचा पोलिसांना सुगावा लागला आणि खेंगाटाची भाजी पोटात जाण्यापूर्वीच त्यांना जेरबंद करण्यात आलं.
गेल्या महिन्यात 28 डिसेंबररोजी माजी नगराध्यक्ष तथा भाजपचे दिवंगत नेते राधावल्लभ कासट यांचे ज्येष्ठ सुपूत्र व भाजपचे शहर उपाध्यक्ष अतुल कासट आपले धाकटे भाऊ अमरिश व अमित यांच्यासह मित्र शैलेश वामन यांना घेवून आनंदवाडी येथील एका ढाब्यावर जेवणासाठी गेले होते. रात्री सव्वाबाराच्या सुमारास तेथून टोलनाक्याजवळ येत असताना पाठीमागून आलेल्या (एम.एच.15/ए.ए.9803) या रिड्स कारने त्यांच्या कारला धडक दिल्याने दोन्ही वाहनांमधील प्रवाशांमध्ये शाब्दीक चकमक सुरु झाली. धडक देणार्या वाहनातील सर्व पाचही जण 17 ते 24 या वयोगटातील असल्याने कासट यांच्यासह त्यांचे दोन्ही भाऊ शब्दांमधूनच आपला राग व्यक्त करीत त्या मुलांना वाहन चालवताना काळजी घेण्याची गरज असल्याचे दरडावत होते.
सुमारे दहा ते पंधरा मिनिटांपर्यंत सुरु असलेल्या या प्रकारात अचानक एका बुलेटवर बसून आलेल्या तिघांची एन्ट्री झाली आणि क्षणात सुरु असलेल्या शाब्दीक चकमकीला हिंसक वळण लागले. एकदम भाई स्टाईल बुलेटवरुन आलेल्या अमोल बाळू सरोदे (वय 27, रा.गाभणवाडी) या टोलनाक्यावरील दुय्यम अधिकार्याने वादाची कोणतीही पार्श्वभूमी माहिती नसताना थेट कासट बंधूंनाच धाकात घेत ‘तुम्ही खूप माजलात का रेऽ.. थांबा तुमचा माजच उतरवतो..’ असे म्हणतं घाणेरड्या भाषेत शिवीगाळ सुरु केली. नंतर तर त्याने थेट त्या चौघांनाही मारहाण करण्यास सुरुवात केली. आता आपला म्होरक्याच मैदानात उतरला म्हटल्यावर त्याचे दोघे पंटर किरण भास्कर रहाणे (वय 39, रा.चंदनापुरी) व मंगेश बबन फटांगरे (वय 28, रा.वरुडी पठार) यांनीही आपल्या अन्य सवंगड्यांना हळ्या देत हातात येईल त्या साधनाने कासट बांधवांवर आक्रमण केले.
या हाणामारीत तिघांनीही अतुल कासट यांना लक्ष्य करुन लोखंडी रॉड, लाकडी दांडके, बॅरिकेट्सचे तुटलेले पाईप, दगडं-विटा असं जे मिळेल त्याने जणू त्यांचा जीव घेण्याचाच प्रयत्न केला. आपल्या थोरल्या भावाला सुरु असलेली अमानुष मारहाण पाहुन त्यांना सोडवण्यासाठी गेलेल्या अमरिश आणि अमित या दोघांवरही तशाच पद्धतीने हल्ला केला गेला. या दरम्यान अमरिश कासट यांनी तालुका पोलिसांसह 112 क्रमांकावरुन मदत मागितली. घटनेनंतर काही वेळाने तालुक्याचे पोलीस उपनिरीक्षक शालोमन सातपुते सरकारी वाहनाचा दिवा चमकावित घटनास्थळीही आले. त्यावेळी अतुल व अमित कासट रक्तबंबाळ तर, अमरिश कासट मूक्या माराने घायाळ झालेले होते. त्यांना रुग्णवाहिका अथवा अन्य साधनांनी रुग्णालयात दाखल करण्याची धावपळ सोडून या महाशयांनी एखाद्या सामान्य घटनेप्रमाणे अमरिश यांनाच वेगवेगळी फर्माने सोडली.
त्यावेळी हल्लेखोरही आसपासच होते आणि जखमीही डोळ्यासमोर. उपनिरीक्षक सातपुते यांनी ठरवले असते तर त्याचवेळी मारहाण करणारे सर्व आरोपी हाती लागले असते. मात्र या प्रकरणात पूर्वीच काहीतरी ठरवून आल्याप्रमाणे सातपुतेंनी अदखलपात्र गुन्ह्याप्रमाणे या घटनेकडे पाहीले. त्याचवेळी तालुका पोलिसांचे टोलनाक्याशी काहीतरी लागेबांधे असल्याचा वास येवू लागला होता. रविवारी पहाटे घडलेल्या या घटनेनंतर शहरातील व्यापार्यांसह स्थानिक वाहनधारकांमध्ये मोठा रोष निर्माण झाला. मारहाण झालेले चौघेही राजकीय पार्श्वभूमीचे असल्याने टोलनाक्यावरील वादाचे पडसाद शहराच्या रस्त्यावर उमटले. व्यापारी असोसिएशन, माहेश्वरी समाज यांनी एकत्रितपणे या घटनेचा निषेध करुन मोर्चा काढला. विधान परिषदेचे सदस्य सत्यजीत तांबे आणि विधानसभेचे सदस्य अमोल खताळ असे दोन्ही आमदार या आंदोलनात सहभागी झाले.
दोघांनीही या घटनेच्या संदर्भातून तालुका पोलिसांच्या कार्यपद्धतीवर हल्ला चढवला. सत्यजीत तांबे यांनी तर थेट तालुका पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे यांच्यावर शरसंधान साधून त्यांची कारकीर्दच संशयास्पद असल्याचे जाहीर वक्तव्य केले. अमोल खताळ यांनीही मागील धटनांचा संदर्भ देत वरीष्ठ अधिकार्यांच्या उपस्थितीतच ढुमणेंच्या कार्यपद्धतीचे वाभाडे काढले. खताळ यांनी या प्रकरणी नियोजित षडयंत्र आणि खुनाचा प्रयत्न या अंतर्गत कलमान्वये गुन्हा दाखल करण्याचा विषयी मांडला होता. जनआंदोलनासमोर बोलताना दोघा लोकप्रतिनिधींच्या या उघड आगपाखडीनंतर निरीक्षक देवीदास ढुमणे नियंत्रण कक्षात जातील असे वाटत असताना ते दोघांवरही भारी ठरले. त्यातच आरोपींना पळून जाण्यात पोलिसांनी पूर्णवेळ दिल्याने मारहाण करणारे मुख्य सूत्रधार सरोदे, रहाणे व फटांगरे गायब झाले. या दरम्यान राजकीय दबावाचे तंत्रही कार्यान्वित झाले. परंतु जनरेट्यासमोर ते तग धरु शकले नाही.
त्यातून तालुका पोलिसांना अनपेक्षित वाटणारा दबाव निर्माण झाल्याने पोलिसांची धावपळ वाढली. त्यातून घटनेच्या दिवशी कार सोडून पळालेल्या प्रथमेश धनंजय जाधव (वय 19), संदीप राजाराम जाधव (वय 18), जयेश बंडू भोर (वय 22) व गणेश भीमराव लोणे (वय 22, सर्व रा.पिंपळगाव खांब, जि.नाशिक) यांच्यासह एका अल्पवयीनाला अटक करुन पोलिसांनी जनक्षोभ शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र मारहाण करणारे मुख्य सूत्रधार पोलिसांच्या हाती लाग लागले नाहीत. त्यामुळे तालुका पोलिसांच्या कार्यपध्दतीवरील शंका कायम असतानाच संक्रांतीच्या पूर्वसंध्येला ‘खेंगाटा’च्या लालसेने वर्षातील पहिल्याच सणाला तालुका पोलिसांना दिलासा देणारी गोपनीय माहिती धडकली. तांत्रिक विश्लेषणावरुनही आरोपींच्या हालचाली दिसून आल्याने पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे यांनी राहीलेली वाचवण्याचा चंग बांधून सोपळा रचला.
घराच्या आसपास छपून सायंकाळच्या अंधारात गुपचूप घरात शिरण्याचा बेत करुन तिघेही आपापल्या घरी परतले. पंधरा दिवसांनी ऐन भोगीच्या दिनी लेक घरी आलेला पाहून माया-बापड्यांनी खेंगाटाची भाजी गरम करायला ठेवून बाजरीच्या भाकरी तव्यावर टाकलेल्या असतानाच पोलिसांनी घरात धडक दिली. पोरगं नुकतंच आंघोळ करुन बाहेरचं आलं अन् पोलिसांच्या हाती लागलं. तब्बल 17 दिवसांनी हाती लागलेल्या या तिघाही आरोपींना काल (ता.13) रात्री अटक करण्यात आली असून त्यांना आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. या प्रकरणात यापूर्वी अटक झालेल्या चौघांचीही यापूर्वीच जामीनावर सुटका झाली आहे. अटक केलेल्या आरोपींची पोलीस कोठडी मागितली जाणार असून गुन्ह्यात त्यांनी वापरलेले वाहन आणि हत्यारांचा शोध अद्याप बाकी आहे.
तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दितील वाढती गुन्हेगारी, गोवंशाचे मांस वाहून नेण्यासाठी निर्माण झालेला ग्रीन कॉरीडोर, अवैध धंद्याचा सुळसुळाट व त्यातून दररोज निर्माण होणारे गुंड, त्यात भर म्हणून हिवरगाव पावसा टोलनाक्यावरील वाढत्या दादागिरीच्या घटना यामुळे पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे सुरुवातीपासूनच वादग्रस्त राहीले आहेत. सामान्यांशी अरेरावीत बोलण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळे अनेकांना मनस्ताप झाल्याचेही दाखले आहेत. यावरही टोलनाका मारहाण प्रकरणानंतर विधान परिषद आणि विधानसभा या दोन्ही सभागृहांच्या लोकप्रतिनिधींनी एकाचवेळी जाहीरपणे त्यांच्यावर गंभीर आरोपही केले होते. यासर्व घडामोडी पाहता पोलीस अधिक्षकांनी त्यांना मुख्यालयात पाचारण करुन तालुक्याचा भार एखाद्या ‘खमक्या’ अधिकार्याकडे सोपवणं अपेक्षित होतं, मात्र लोकप्रतिनिधींसह लोकांचाही अपेक्षा भंग झाला आहे.