कोविडची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात चौदा दिवसांचा ‘लॉकडाऊन’? जिल्हाधिकारी नव्याने फेर आदेश काढणार : पालकमंत्री मुश्रीफ यांचे वक्तव्य..

नायक वृत्तसेवा, अहमदनगर
कठोर निर्बंधातही जिल्ह्यातील कोविडचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्याला कडक ‘लॉकडाऊन’ची गरज असल्याचे सांगत जिल्हा दौर्यावर असलेल्या पालकमंत्री हसन मुश्रीफ अहमदनगर जिल्ह्यात चौदा दिवसांचा कडक ‘लॉकडाऊन’ लागू करण्याचे संकेत दिले आहेत. नियोजन भवनातील पत्रकार परिषदेत बोलतांना त्यांनी जिल्हाधिकारी आदेश काढतील, माध्यमांनी सहकार्य करावे व जनता कर्फ्यु असा तीन मुद्द्यांवर भाष्य केल्याने जनता कर्फ्युचा आदेश जिल्हाधिकारी कसा काढतील, आदेश निघणार असेल तर जनता कर्फ्यु कसा? असे अनेक प्रश्न निर्माण झाले असून जिल्ह्यातील नागरिक पुन्हा एकदा ‘संभ्रमात’ पडले आहेत. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले पालकमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेनंतर नेमकी कोणती भूमिका घेतात याकडे आता जिल्ह्याचे लक्ष्य केंद्रीत झाले आहे.

जिल्ह्यातील वाढत्या कोविड संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आज जिल्ह्याच्या दौर्यावर आहेत. आज सकाळी त्यांनी जिल्ह्यात सर्वाधीक कोविड प्रादुर्भाव असलेल्या शिर्डी, कोपरगाव व श्रीरामपूर येथे भेटी देवून तेथील परिस्थितीचा अंदाज घेतला. तेथून अहमदनगरला गेल्यानंतर त्यांनी वरीष्ठ अधिकार्यांसमवेत आढावा बैठक घेवून संपूर्ण जिल्ह्याची परिस्थिती जाणून घेतली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधतांना त्यांनी जिल्ह्यातील कोविड स्थिती चिंताजनक असल्याचे सांगत कोविडची साखळी तोडण्यासाठी चौदा दिवसांचा कडक लॉकडाऊन आवश्यक असल्याचे सांगत मध्येच ‘जनता कर्फ्यु’साठी माध्यमांचे सहकार्य मागीतले.

याबाबत तुम्ही काही जाहीर करणार आहात का? असा सवाल काही माध्यमांनी विचारल्यानंतर जिल्हाधिकारी याबाबत फेर आदेश काढतील असे त्यांनी सांगीतले. त्यांच्या या वक्तव्यावरुन जिल्ह्यातील नागरिक पुन्हा एकदा संभ्रमात पडले असून कडक लॉकडाऊनमध्ये काय सुरु राहणार व काय बंद, जनता कर्फ्यु असेल तर त्याचा आदेश जिल्हाधिकारी कसा काढणार, आदेश काढणारच असतील तर तो जनता कर्फ्यु की ‘लॉकडाऊन’ असे अनेक प्रश्न निर्माण झाले असून जिल्हाधिकारी प्रशासकीय अधिकार्यांच्या बैठकीतनंतर काय ते आदेशाद्वारे जाहीर करतील अशी शक्यता आहे. मात्र पालकमंत्र्यांच्या वक्तव्याने जिल्ह्याच्या कोविड स्थितीचे दर्शनही घडले आणि नागरिकांच्या मनात पुन्हा एकदा संभ्रमाचा किडा सोडण्यात आला हे मात्र खरं.

जिल्ह्यातील वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिक, संस्था, स्वयंसेवी संस्था व संघटना यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली बेकरी व गोळ्या बिस्किटांसारख्या व्यवसायांना सुरु ठेवून काहीही साध्य होत नसल्याचे दिसून येत असून रुग्णसंख्या कमी होणं अत्यंत आवश्यक आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांनीच पुढाकार घेण्याची आवश्यकता असून गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या कठोर निर्बंधांचा पुनर्विचार करण्याची गरज आहे.
राजेंद्र भोसले
जिल्हाधिकारी, अहमदनगर

