सात वर्षांनंतर उजळणार ‘पुणे-नाशिक’ महामार्गाचे भाग्य! रायतेवाडी फाट्यावर मात्र विरोध; लोकांच्या मढ्यावर व्यवसाय वाचवण्याची धडपड..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
सुरु झाल्यापासून सातत्याने वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असलेल्या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाचे भाग्य अखेर उजळणार असून अर्धवट राहीलेल्या असंख्य कामांसह या मार्गाच्या काँक्रीटीकरणाच्या कामाला आता वेग आला आहे. गेल्या सात वर्षात या रस्त्याच्या अपूर्ण कामांमुळे असंख्य अपघात होवून अनेकांचा जीव गेल्याने रस्ता सुरक्षा समितीने महामार्गाची पाहणी करुन त्यावरील उपाययोजनाही सूचवल्या होत्या. त्या पूर्ण करण्याचे काम आता हाती घेण्यात आले आहे. त्यानुसार सातत्याने अपघात होणार्या चार ठिकाणांवर उड्डाणपुलांसह केवळ कागदोपत्री असलेले सर्व्हिस रस्तेही आता बांधले जात आहेत. या मार्गावर सर्वाधीक जीवघेण्या ठरलेल्या रायतेवाडी फाट्यावर जवळपास 50 कोटी रुपये खर्च करुन उड्डाणपूल प्रस्तावित करण्यात आला आहे. मात्र त्यामुळे आमचे व्यवसाय अडचणीत येतील अशी आडमुठी भूमिका घेवून येथील हॉटेल व्यावसायिकांनी त्यात खोडा घातल्याने उड्डाणपुलाचे काम सुरु होवू शकलेले नाही.
पूर्वी मृत्यूघंटा अशी ओळख असलेल्या आणि शेकडों निष्पाप नागरिकांचे बळी घेणार्या ‘पुणे-नाशिक’ राष्ट्रीय महामार्गाच्या नूतनीकरणाला 2013 मध्ये मंजुरी मिळाल्यानंतर अवघ्या वर्षभरातच ‘सिन्नर ते खेड’ अशा 138 किलोमीटर लांबीच्या या रस्त्याचे काम सुरु झाले आणि 1 जानेवारी 2017 रोजी 70 टक्के पूर्णत्त्वाच्या अटीवर हा रस्ता टोलसह वाहतुकीसाठी खुलाही करण्यात आला. त्यानंतरच्या कालावधीत ठेकेदार कंपनीकडून राहीलेली कामं पूर्ण होणं अपेक्षित असताना प्रत्यक्षात मात्र तसा कोणताही प्रकार घडला नाही. त्यामुळे या मार्गावरील वेगवेगळ्या ठिकाणी वारंवार अपघाती घटना घडून त्यात आजवर शेकडों निष्पापांचे बळी जावून अनेकांना अपंगत्वही पदरी पडले. प्रत्येकवेळच्या अपघातानंतर रास्तारोको, आंदोलनेही झाली. मात्र दरवेळी त्याचे नेतृत्त्व करणार्यांनी ठेकेदार कंपन्यांकडून आपलीच पोटं भरल्याने आजवर अपघातांची ही श्रृंखला कायम आहे.
अशातच सामाजिक कार्यकर्ते गणेश बोर्हाडे यांनीही महामार्गाच्या कामात तोडलेल्या मात्र त्यानंतर बंधनकारक असूनही न लावलेल्या झाडांचा मुद्दा घेवून थेट हरित न्यायाधिकरणात धाव घेतल्याने एकंदरीत या रस्त्याचा ‘झोल’ चर्चेत आला. त्यातूनच मानवी सुरक्षा, ठेकेदार कंपनीची भूमिका आणि त्याला राजमार्ग प्राधिकरणाची मूकसंमती ठळक होत गेल्याने अखेर सात वर्षांनंतर प्राधिकारणाने नागरी तक्रारींची आणि त्यांच्यासह वन्यप्राणांच्या जीवाची दखल घेतली आहे. या महामार्गावर वारंवार होणारे अपघात विचारात घेवून रस्ते सुरक्षा समितीच्यावतीने त्याचा आढावाही घेण्यात आला होता. त्यात ठेकेदार कंपनीने अर्धवट ठेवलेल्या अथवा केवळ कागदोपत्री दाखवलेल्या उपरस्त्यांसह (सर्व्हिसरोड), पादचार्यांसाठी सुरक्षितपणे रस्ता ओलांडण्यासाठी स्कायवॉक (पूल), भूयारीमार्ग, तसेच वन्य जीवांसाठीही रस्ते ओलांडण्याच्या सुविधांवर बोटं ठेवण्यात आले.
शिवाय या महामार्गावर घडणारे अपघात मानवी चुकांमुळे होत असल्याचे निरीक्षण नोंदवताना समितीच्यावतीने अपघात प्रवण (ब्लॅकस्पॉट) म्हणून समोर आलेल्या सायखिंडी फाटा, हॉटेल स्टेट्स, रायतेवाडी फाटा व आंबीफाटा येथे उड्डाणपुलाची आवश्यकताही अहवालातून मांडली आहे. त्यानुसार तीन ठिकाणच्या उड्डाणपुलांचे कामही सुरु झाले आणि सद्यस्थितीत ते प्रगती पथावर असताना सर्वाधीक अपघात होवून आजवर अनेकांचा जीव घेणार्या रायतेवाडी फाट्यावरील उड्डाणपुलाचे काम मात्र कार्यारंभ आदेश देवून सहा महिने झाले तरीही सुरु होवू शकलेले नाही. त्याचा मागोवा घेतला असता गेल्याकाही वर्षात रायतेवाडी फाट्यावर उदयास आलेल्या हॉटेल चालकांनी ‘आमचे व्यवसाय बंद होतील’ असे कारण पुढे करुन येथील पुलाच्या कामाला विरोध दर्शवल्याचे कारण समोर आले आहे. हा प्रकार म्हणजे ‘लोकांच्या मढ्यावर बसून व्यवसाय’ करण्यासारखा असून जवळजवळ दररोज डोळ्यादेखत अपघात घडून त्यात निष्पापांचे बळी जात असताना होणारा हा विरोध संताप निर्माण करणारा ठरत आहे.
विशेष म्हणजे रायतेवाडी फाट्यावर प्रस्तावित असलेल्या पुलासाठीचा 50 कोटी रुपयांचा निधीही राजमार्ग प्राधिकरणाला प्राप्त असून पुलासाठी आवश्यक असलेली जमिनही उपलब्ध आहे. धक्कादायक म्हणजे महामार्गाच्या मालकीच्या जमिनीवरच काही हॉटेल चालकांचे अतिक्रमण असून त्यांच्याकडूनच या पुलाला विरोध होत असल्याचीही जोरदार चर्चा आहे. त्यांचा धसका घेवून ठेकेदाराने आदेश मिळूनही गेल्या सहा महिन्यात या ठिकाणी कोणतेही काम सुरु केलेले नाही. त्यामुळे येथे होणार्या अपघातांची श्रृंखला आजही कायम आहे. नागरी जीवांपेक्षा कोणाचे पोटं महत्वाचे ठरु शकत नसल्याने प्राधिकरणाने होणार्या विरोधाकडे प्रसंगी बळाचा वापर करुन दुर्लक्ष करावे व नागरी जीवाला संरक्षण द्यावे अशीही मागणी आता पुढे आली आहे.
याशिवाय राजमार्ग प्राधिकारणाने सिन्नर ते माळवाडी (संगमनेर तालुका) या जवळपास 105 किलोमीटर अंतराच्या संपूर्ण महामार्गाचे काँक्रीटीकरण करण्याच्या कामालाही सुरुवात केली आहे. त्यासाठी 334 कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली आहे. या रकमेतूनच कागदोपत्री असलेल्या मात्र प्रत्यक्षात कोठेही नजरेस न पडणार्या उपरस्त्यांसह (सर्व्हिसरोड) जुन्या उपरस्त्यांचे रुंदीकरण व डांबरीकरणाचेही काम सुरु केले आहे. मोठ्या लोकसंख्येच्या गावांमधील शाळांमध्ये जाणार्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेवून चंदनापुरीजवळ स्कायवॉकही (पादचारी उड्डाणपूल) तयार केला जात आहे. सोबतच बोर्हाडे यांच्या याचिकवरील निर्णयानुसार महामार्गाच्या मध्यासह दुतर्फा एकूण 24 हजार झाडांचे रोपणही केले जात आहे. सध्या सुरु करण्यात आलेल्या महामार्गाच्या मजबुतीकरणाच्या कामासाठी दोन वर्षांची मर्यादा निश्चित करण्यात आली असून या कालावधीत रस्त्याचे काम पूर्ण करावे लागणार आहे.
संगमनेर तालुक्यातून जाणार्या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर रस्ता सुरक्षा समितीने चार गंभीर ब्लॅकस्पॉट रेखांकित केले असून त्यात सायखिंडी फाटा, हॉटेल स्टेट्स, रायतेवाडी फाटा व आंबी फाटा या ठिकाणांचा समावेश आहे. यातील तीन ठिकाणी उड्डाणपुलांची कामे सुरु असून सर्वाधीक अपघात घडलेल्या आणि अनेकांचा जीव घेणार्या रायतेवाडी फाट्याजवळील उड्डाणपुलाचे काम मात्र तेथील हॉटेल व्यावसायिकांच्या विरोधामुळे बंद आहे. हा उड्डाणपूल झाल्यास आमचे व्यवसाय कमी होतील अशी तेथील हॉटेल व्यावसायिकांची धारणा आहे. मात्र डोळ्यादेखत दररोज अपघात घडत असताना आपला व्यवसाय वाचावा ही अपेक्षाच चुकीची आहे. मात्र या उपरांतही रायतेवाडी फाट्यावरील काही हॉटेलचालक लोकांच्या मढ्यावरही आपले व्यवसाय सुरळीत ठेवण्यासाठी धडपडत असल्याचे दुर्दैवी चित्र येथे बघायला मिळत आहे.