महामार्गावरील अतिक्रमणांवरही आजच संक्रांत! पालिका व बांधकाम विभागाची संयुक्त कारवाई; शहराच्या सौंदर्यात भर घालण्याचा प्रयत्न : आमदार खताळ..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
मतपेढीच्या राजकारणातून गेल्याकाही वर्षांपासून खोळंबलेल्या पुणे-नाशिक महामार्गाच्या तिसर्या टप्प्याच्या कामाला अखेर आज ‘संक्रांती’चा मुहूर्त लागला. मात्र नगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने संयुक्तपणे राबवलेल्या आजच्या अतिक्रमण हटाओ मोहीमेपूर्वीच अनेकांनी नेहमीप्रमाणे साफसफाई केली होती. त्यामुळे जेसीबी चालकांना किरकोळ अपवाद वगळता फारकाही परिश्रम घ्यावे लागले नाहीत. या मोहीमेच्या संदर्भात आमदार अमोल खताळ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी शहराच्या सौंदर्यात भर घालणारा हा महामार्ग असल्याचे सांगितले. मात्र हस्तांतरणात राज्य सरकारकडे आलेल्या या मार्गाची रुंदी एकसारखी नसल्याने खूप मर्यादा आहेत. लोकांच्या इच्छेतून मार्ग निघाल्यास भविष्यात या महामार्गावरील जागांचे महत्त्व खूप वाढणार आहे. त्या भागातील नागरिकांशी बोलून मार्ग काढण्याचाही प्रयत्न करु, मात्र तोडगा न निघाल्यास किमान तीनपदरी रस्ता होईल असा आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्याचे त्यांनी दैनिक नायकला सांगितला. त्यातून आज सुरु झालेल्या मोहीमेतून फारकाही तोडफोड होईल ही चर्चा निष्फळ ठरली आहे.
अमृतवाहिनी ते विश्रामगृह आणि रायतेवाडी फाटा ते प्रवरा पूल (पिंपरणे फाटा) या दोन्ही बाजूंच्या पुणे-नाशिक महामार्गाचे रुंदीकरण आणि सुशोभिकरण होवूनही प्रवरा पूल (पुणेनाका) ते बसस्थानक या रस्त्याचे काम मात्र प्रदीर्घकाळ ताटकळत ठेवल्याने त्यात ‘मतपेढी’चे राजकारण असल्याच्या चर्चाही शहरात झाल्या होत्या. मतदारसंघात यावेळी परिवर्तन होवून शिवसेनेचे अमोल खताळ निवडून आल्यानंतर या मार्गाच्या कामाला गती येईल अशी आशाही निर्माण झाली होती. नववर्षाच्या दिनी एका धार्मिक कार्यक्रमात दैनिक नायकशी संवाद साधतांना आमदार खताळ यांनी पुढील पंधरवड्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापासून ते पुणे नाक्यापर्यंतची अतिक्रमणं हटवली जाणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार बरोबर मकर संक्रांतीचा मुहूर्त धरुन संगमनेर नगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने संयुक्तपणे पोलीस बंदोबस्तात पुणेनाक्यापासून आज मोहीमेचा शुभारंभ केला.
प्रशासनाने यापूर्वीच बजावलेल्या नोटीसा, अतिक्रमण हटोओ मोहीमेबाबत झालेली चर्चा या सर्वांचा परिणाम अनेक अतिक्रमण धारकांनी मोहीमेपूर्वीच माघार घेतली. त्यामुळे या मोहीमेत सहभागी झालेल्या दोघा जेसीबी चालकांना फार घाम गाळावा लागला नाही. काही दुकानदारांनी समोरच्या जागेत बसवलेल्या फरशा, काँक्रीट, पेव्हर ब्लॉक, फारतर पायर्या उखडत उखडत अवघ्या दोन तासांतच ही मंडळी तीनबत्ती चौकात पोहोचली. या मोहीमेतून फारकाही मोठं घडल्याचे कोठेही दिसून आले नाही. त्यातून खरोखरी या रस्त्याचे रुंदीकरण होईल का?, झालेच तर दुभाजक बसवण्या इतपत जागा असेल का?, रस्त्याच्या दुतर्फा फूटपाथ होवू शकेल का? असे कितीतरी प्रश्न निर्माण झाले आहेत.
याबाबत आमदार अमोल खताळ यांच्याशी संपर्क साधला असता, मुंबईकडे जा असतांना बोलतांना त्यांनी वाहतुकीच्या कारणातून शहरात रोज काहीना काही घटना घडू लागल्याने रस्त्याचे रुंदीकरण आवश्यक झाल्याचे सांगितले. महामार्ग प्राधिकरणाकडून हा रस्ता राज्य सरकारकडे आल्यानंतर तो कोठेही एकसारखा राहीला नाही. त्यातही छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापासून पुढे तो कमी-अधिक होत गेला आहे. त्यामुळे रस्त्याचे चौपदरीकरण होण्याची शक्यता खूप कमी असल्याने किमान तीनपदरी रस्ता होईल असा आराखडा तयार करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या मार्गात भररस्त्यात विद्युत खांब ही मोठी समस्या आहे, त्यामुळे या मार्गावर भूमिगत विद्युत वाहिन्यांचा प्रस्ताव तयार करण्यास सांगितले आहे. या सर्व प्रक्रियेत दोन-तीन महिन्यांचा कालावधी जाईल. मात्र त्यामुळे रुंदीकरणातला मोठा अडथळा कमी होईल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
या कालावधीत नगर परिषदेच्या सांडपाणी संदर्भात अथवा पिण्याच्या पाईपलाईची काही कामे असतील तर ती देखील पूर्ण करण्याच्या सूचना मुख्याधिकार्यांना दिल्याचे त्यांनी सांगितले. जागेची कमतरता असली तरीही आज मोकळ्या केलेल्या जागेवर पुन्हा अतिक्रमण होणार नाही यासाठी आवश्यक गोष्टी करण्याचे स्पष्ट निर्देश बांधकाम विभागाला दिल्याची माहितीही आमदार खताळ यांनी यावेळी बोलताना दिली. हा महामार्ग संगमनेरच्या सौंदर्यात भर घालणारा आहे. आवश्यक प्रमाणात रुंदीकरण करण्यासाठी जागा मिळाल्यास तो अगदी सुंदर करता येईल. त्यासाठी निमुळत्या असलेल्या महामार्गावरील मुस्लिम बांधवांसह अन्य लोकांशी चर्चा करुन काही मार्ग काढता येईल का याचाही प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. रुंदीकरणामुळे या रस्त्याचे महत्व वाढणार असल्याने नागरिकांनी थोडे सहकार्य केल्यास अधिक चांगले काम करता येईल अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ प्रतिमेबाबतच्या प्रश्नावरही त्यांनी महाराजांना साजेशा जागेतच त्यांची प्रतिमा बसवण्यासाठी आपण आग्रही असल्याचे सांगितले. स्मारकाऐवजी छत्रपतींची अश्वारुढ प्रतिमा बसस्थानक चौकात मधोमध बसवून तेथे सर्कल केल्यास वाहतुक व्यवस्थेला शिस्त लागण्यासह शहराच्या सौंदर्यातही मोठी भर पडेल या शक्यतेवरही गांभीर्याने विचार सुरु असल्याचे सांगत त्यांनी शहरातंर्गत अतिक्रमणांवरही लवकरच जेसीबी फिरवण्याचे संकेत दिले. नगर रस्त्याच्या दुतर्फा उंचवट्यावर बांधलेल्या गटारी वाहतुकीस अडथळा ठरत असल्याने त्या सपाट करुन रस्त्याची रुंदी वाढवण्याच्या सूचना दिल्याचेही ते म्हणाले. प्रायोगिक तत्त्वावर शहराच्या काही भागात सिग्नल सुरु करण्याचाही विचार असून पोलिसांकडून त्यावर अभ्यास सुरु असल्याची माहितीही त्यांनी या संवादातून दैनिक नायकला दिली.
दोन दशकांपूर्वी पालिकेवर प्रतिनियुक्तिवर आलेल्या भारतीय प्रशासन सेवेतील डॉ.प्रवीण गेडाम यांनी संगमनेरच्या ऐतिहासिक बाजारपेठेतील व्यापार्यांना भविष्याचा विचार सांगून रुंदीकरणासाठी काही जागा सोडण्याचे आवाहन केले होते. मात्र त्यावेळी भरभराटीला असलेल्या बहुतांशी व्यापार्यांनी त्याला विरोध केला. त्यानंतरच्या काळात अरुंद असल्याच्या एकमेव कारणाने या बाजारपेठचे महत्त्व संपुष्टात आले. त्यानंतर बरोबर 20 वर्षांनी विद्यमान आमदार अमोल खताळ यांनीही महामार्गाच्या रुंदीकरणासाठी अरुंद असलेल्या जागेवरील मालकांनी औदार्य दाखवण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या या आवाहनाला अशा ठिकाणांवरील जागामालक प्रतिसाद देत भविष्याचा वेध घेतात की आहे त्या सुविधेतच समाधान मानतात हे पाहणं आता औत्सुक्याचे ठरणार आहे.