पठारभागातील डिझेल चोर पोलिसांच्या हाती उभ्या वाहनातील डिझेलची चोरी; बेकायदा साठाही झाला जप्त..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर तालुक्यातील पठारभागात रात्रीच्यावेळी ढाब्यांवर उभ्या राहणार्या चारचाकी वाहनांमधून डिझेल चोरी होत असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत होत्या. मात्र घारगाव पोलिसांना आजवर त्याचा छडा लावण्यात अपयश आल्याने पोलिसांविषयीच संशय निर्माण झाला होता. मात्र सोमवारी पहाटे खंदरमाळ शिवारातून एका स्थानिक वाहनातील डिझेलचीच चोरी झाल्याने आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी संशयीत असलेल्या एका दुकानावर छापा घालण्यास पोलिसांना भाग पाडले आणि गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु असलेल्या डिझेल चोरीच्या प्रकरणामागील रहस्य उघड झाले. या प्रकरणी खंदरमाळच्या प्रवीण लेंडे यांच्या तक्रारीवरुन एकावर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून घारगाव पोलिसांनी डिझेल चोरी व त्याची साठवणूक करणार्या चंद्रकांत उर्फ साईनाथ गणेश शेळके याला अटक केली आहे.

याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार. खंदरमाळ येथे राहणारे प्रवीण लेंडे रविवारी (ता.15) आपल्या मालकीच्या मालट्रकमध्ये (क्र.एम.एच.17/सी.व्ही.2712) पशूखाद्य घेवून सटाणा येथून घारगावला आले. तत्पूर्वी त्यांनी हिवरगाव पावसा येथील पेट्रोलपंपावरुन आपल्या वाहनात 165 लिटर डिझेलही भरले. घारगावला आल्यानंतर त्यांनी आपली गाडी खाली केली व तेथून नेहमीप्रमाणे खंदरमाळनजीकच्या 19 मैलांवर राहणार्या आपल्या मित्रांच्या घरासमोरील मोकळ्या जागेत गाडी लावून ते घरी गेले. त्याच दिवशी रात्री अकराच्या सुमारास लेंडे मित्राच्या घरी आले त्यावेळी त्यांनी आपल्या वाहनाच्या डिझेलची टाकी तपासली असता ती व्यवस्थित असल्याचे त्यांनी पाहिले.

त्यानंतर काहीवेळ गप्पा मारुन ते आपल्या घरी निघून गेले. दुसर्या दिवशी (ता.16) सकाळी साडेसातच्या सुमारास परिसरात राहणार्या त्यांच्या एका नातलगाला सदरील मालट्रकच्या डिझेल टाकीचे झाकण उघडे असल्याचे दिसल्यानंतर त्यांनी तत्काळ त्याची माहिती प्रवीण लेंडे यांना दिली. त्यांनीही लागलीच येवून आपले वाहन तपासले असता अवघ्या 12 तासांपूर्वी भरलेली टाकी पूर्णतः रिकामी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या घटनेनंतर संबंधित वाहन मालकासह त्यांच्या अन्य नातेवाईक व मित्रांनी आसपास शोध घेतला असता त्यांना कोणताही मागमूस लागला नाही.

सदरील गोष्ट खंदरमाळात समजताच 50 ते 60 गांवकरी वाहनमालक प्रवीण लेंडे यांच्यासह घारगाव पोलीस ठाण्यात आले व त्यांनी डिझेल चोरीची माहिती देण्यासह संशयीत असलेल्या परिसरातील साई गणेश वॉशिंग सेंटरवर संशय व्यक्त करीत तेथे छापा घालण्याची मागणी केली. सुरुवातीला पोलिसांनी काहीसे आडेवेढे घेतल्याने उपस्थितांचा संशयही बळावला, मात्र सदरची बाब लक्षात येताच पोलिसांनी ग्रामस्थांसह ‘त्या’ ठिकाणी जावून त्यावेळी बंद असलेल्या वॉशिंग सेंटरचे शटर तोडून आंत पाहीले असता आतील भागात दोन हजार लिटर क्षमतेच्या टँकसह अनेक छोटे-मोठे ड्रम आणि त्यात कमी-अधिक प्रमाणात डिझेल असल्याचे उघड झाले.

या नंतर पोलिसांनी सदरील दुकानातील सर्व मुद्देमाल ताब्यात घेत दुकान मालकाचा शोध घेतला असता तो आढळून आला. या प्रकरणी प्रवीण लेंडे यांच्या फिर्यादीवरुन खंदरमाळ येथील चंद्रकांत उर्फ साईनाथ गणेश शेळके (वय 25) याच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे. या कारवाईने गेल्या अनेक दिवसांपासून पठारभागातील ढाब्यांवर रात्रीच्यावेळी मुक्कामी थांबणार्या लांब पल्ल्यांच्या मालवाहूक वाहनांमधील डिझेल चोरीला पायबंद बसण्याची शक्यता आहे. सदरील चोरट्याची सखोल चौकशी करुन त्याने यापूर्वी केलेले सर्व प्रकार उघडकीस आणावेत अशी मागणीही आता होत आहे.

डिझेलची विक्री अथवा त्याची साठवणूक करण्यासाठी शासनाचा अधिकृत परवाना अनिवार्य आहे. त्याशिवाय कोणीही डिझेलची विक्री अथवा त्याचा साठा करु शकत नाही. अन्यथा अशा व्यक्तिविरोधात जीवनावश्यक वस्तू कायद्यान्वये कारवाई होवू शकते. या प्रकरणात पोलिसांनी एका बेकायदा डिझेल सेंटरवर छापा घालून मोठ्या प्रमाणात डिझेलचा साठाही जप्त केला आहे. मात्र संंबंधित चोरट्यावर घारगाव पोलिसांनी केवळ चोरीचा गुन्हा दाखल केल्याने ग्रामस्थांच्या मनात पुन्हा एकदा घारगाव पोलिसांविषयी संशय निर्माण झाला आहे.

