संगमनेरच्या खंडोबा मंदिरावर चढणार सोन्याचा कळस! सुवर्ण कलश दान रथाद्वारे खंडोबा भक्तांची संगमनेरकर भाविकांना साद..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडोबारायांच्या जेजुरीला ‘सोन्याची जेजुरी’ म्हणून ओळखले जाते. संगमनेरातही ऐतिहासिक महत्त्व असलेली खंडोबादेवाची अनेक ठिकाणं आहेत. त्यातीलच एक असलेल्या साळीवाड्यातील मंदिराचा जिर्णोद्धार सध्या अंतिम टप्प्यात आहे. भाविकांच्या यथाशक्तीतून उभ्या राहिलेल्या या मंदिरालाही जेजुरीप्रमाणेच सोन्याचा साज असावा यासाठी येथील खंडोबाभक्तांनी संकल्प केला असून नव्याने उभारण्यात आलेल्या मंदिरावर सव्वा किलो वजनाचा सुवर्ण कलश बसविण्याचा मनसुबा जाहीर करण्यात आला आहे. त्यासाठी संगमनेरकरांना मदतीची साद घालण्यात आली असून यळकोट.. यळकोट.. जय मल्हारचा घोष करीत खंडोबाभक्तांकडून निधी संकलनाचे काम सुरु करण्यात आले आहे. संगमनेरकरांकडून त्याला मोठा प्रतिसादही मिळत आहे.

प्रागैतिहासापासून संगमनेरला अनन्य महत्त्व असल्याचे विविध धार्मिक व पौराणिक ग्रंथातून दिसून येते. संगमनेरातील अनेक मंदिरांना मोठा इतिहासही लाभला आहे. त्याच श्रृंखलेत साळीवाडा परिसरात नारळवाले पडताणी यांच्या जागेत असलेल्या खंडोबा मंदिराचा समावेश होतो. कधीकाळी या ठिकाणी असलेले देवाचे स्थान हलविण्याचा प्रयत्न झाला आणि त्यातूनच येथील देवांच्या मूर्ती त्याच ठिकाणी असलेल्या आडात विसर्जीत करुन तो आड बुजविण्यात आला होता. सदरची घटना अनेक वर्षांपूर्वी घडली असल्याने त्याबाबत कोठेही वाच्चता नव्हती. मात्र काही दशकांपूर्वी या जागेचे मालक असलेल्या पडताणी यांना देवानेच दृष्टांत देवून आडातून बाहेर काढण्यास सांगितले.

त्यानुसार दुसर्‍याच दिवशी त्यांनी मजूरांकरवी दृष्टांतात दिसलेल्या जागी खोदकाम सुरु केले असता पूर्वी तेथे आड असल्याच्या खुणा स्पष्टपणे दिसू लागल्या. त्यामुळे देवाने स्वप्नात येवून सांगितलेल्या सर्व गोष्टी सत्य असल्याची प्रचिती मिळताच पडताणी यांनी संपूर्ण आड पुन्हा खोदून काढला. आडाला पाणी लागताच चमत्कार व्हावा त्याप्रमाणे त्या पाण्यात खंडोबारायांची चमचमणारी पितळी मूर्ती मजूरांच्या दृष्टीस पडली. त्यांनी लागलीच मालकाला त्याबाबत सांगितल्यावर मोठ्या श्रद्धेने ती बाहेर काढण्यात आली व त्याच ठिकाणी छोटेखानी मंदिर बांधून त्यांची प्रतिष्ठापना करण्यात आली.

तेव्हापासून या मंदिराचे महत्त्व असून संगमनेरातील शेकडो खंडोबाभक्त दर रविवारी येथे दर्शनासाठी गर्दी करतात. काही वर्षांपूर्वी या मंदिराच्या देखरेखीसाठी विश्वस्त मंडळाची नेमणूकही करण्यात आली असून सध्या मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम वेगाने सुरु आहे. छोटेखानी मंदिराच्या जागी आता प्रशस्त मंदिराची उभारणी करण्यात आली असून आकर्षक दगडी दीपमाळही तयार करण्यात आली आहे. पुढील वर्षीच्या माघी पौर्णिमेपूर्वी या मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम पूर्ण करण्याचा मानस असून ज्याप्रमाणे देवाच्या जेजुरीला सोन्याची जेजुरी म्हंटले जाते, त्याप्रमाणे येथील मंदिरावरही सोन्याचा साज चढवण्याचा संकल्प येथील भाविकभक्तांनी केला आहे.

त्यासाठी ‘श्री खंडोबा मंदिर सुवर्ण दान संकल्प रथ’ तयार करण्यात आला असून दररोज सकाळी हा रथ शहरातील विविध भागात जावून खंडोबा मंदिराच्या सुवर्ण कलश संकल्पासाठी भाविकांकडून मदत जमा करीत आहे. संगमनेरचे धार्मिक महत्त्व फार मोठे आहे. त्या श्रृंखलेत तेजोमय इतिहास असलेल्या साळीवाड्यातील खंडोबा मंदिराच्या सुवर्ण कलशासाठी संगमनेरकरांनी रोख अथवा सुवर्ण स्वरुपात सढळ हाताने दान करावे असे आवाहन श्री खंडोबा देवस्थान विश्वस्त मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.

Visits: 146 Today: 1 Total: 1114248

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *