पंतप्रधानांच्या ‘एक है, तो सेफ है’च्या घोषणेला संगमनेरात हरताळ! स्थानिक पातळीवरील गटबाजी कायम; ‘ईव्हीएम’च्या समर्थनार्थ निवेदनातून प्रदर्शन..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
सहा महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत अति आत्मविश्‍वासामुळे भाजपची मोठी पीछेहाट झाली. बहुतेकवेळा लोकसभा निवडणुकांमध्ये महायुतीच्या पाठीशी राहिलेला संगमनेर विधानसभा मतदारसंघही त्याला अपवाद राहीला नव्हता. त्यातून सावध झालेल्या भाजपने संघाशी वाढलेला दूरावा नष्ट करण्यासह स्थानिक पातळीवरील गटबाजी संपवून सर्वांना सक्रिय केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ‘एक है, तो सेफ है’चा नारा देत जातीय समिकरणांसह कार्यकर्त्यांना एकतेची ‘साद’ घातली. त्याचा सकारात्मक परिणामही विधानसभा निवडणुकांमध्ये बघायला मिळाला. मात्र आता निवडणुका संपताच स्थानिक भाजपमधील अंतर्गत गटबाजी उघड होवू लागली असून गुरुवारी ‘ईव्हीएम’च्या समर्थनार्थ देण्यात आलेल्या निवेदनातून त्याची प्रचितीही मिळाली. केवळ ‘भारतीय जनता पक्ष, संगमनेर’ अशा शीर्षकाखालील कागदावर लिहिलेले निवेदन देताना विद्यमान पदाधिकार्‍यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली. त्यातून संगमनेर भाजपमधील अंतर्गत खद्खद्ही बघायला मिळाली असून असेच सुरु राहिल्यास आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ‘त्या’ पक्षाला त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे.


मागील काही वर्षात स्थानिक भाजपमध्ये निष्ठावानांना डावलून महत्त्वकांक्षी असलेल्यांची संख्याच अधिक झाल्याने त्यातून अंतर्गत गटबाजीही पोसली गेली आहे. 2014 पर्यंत गटबाजीचा जुन्या कालखंड विसरुन एक झालेल्या स्थानिक भाजपमध्ये केंद्रात आणि त्यानंतर राज्यात स्थापन झालेल्या सरकारमुळे पुन्हा ती खद्खद् जिवंत झाली. गेल्या दहा वर्षात त्याचे दुष्परिणामही बघायला मिळाले आहेत. कधीकाळी संगमनेर नगरपालिकेत दहाच्या आसपास असणारी महायुतीच्या नगरसेवकांची संख्या सद्यस्थितीत शून्यावर आली आहे. पक्षातील प्रत्येक महत्त्वकांक्षी व्यक्तिने आपल्यासाठी एकएक ‘गॉडफादर’ निर्माण केल्याने त्यांचा वापर करुन पदं मिळवायचे आणि त्याचा मनमानी वापर करायचा अशा प्रकारची पद्धत बोकाळल्याने पक्षातील अन्य कार्यकर्त्यांमध्ये त्याचा विपरित परिणाम होत गेल्याचेही भाजप कार्यकर्ते खासगीत सांगतात.


काहींच्या कुटुंबातील व्यक्तिंनी पक्षाच्या शीर्षस्थ भूमिका बजावल्याने तो पक्ष त्यांना आपल्याच मालकिचा भासू लागला. त्यामुळे अशांनी आपला कार्यकाळ संपताच वेगळी चूल मांडली. त्यानंतर आलेल्यांनीही त्यांचीच री ओढल्याने परिस्थिती आणखी बिघडत गेली. पदं असलं तरच काम करणारं अशा विचारानेही दरम्यानच्या काळात मोठी जागा व्यापली. सत्तेचा लाभ घेण्यासाठीची काहींची ही धडपड मात्र मोठी परंपरा असलेल्या भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षाला खुंटवून ठेवणारी ठरली. तेच चेहरे आणि तेच पदाधिकारी यामुळे स्थानिक भाजपकडे नवीन कार्यकर्त्यांचा ओघही आटला. मात्र त्याचे कोणतेही सोयरसुतक नसल्यागत प्रत्येकजण आपलाच ढोल वाजवण्यात मस्त असून मुठभर असलेल्या तालुक्यातील पक्षाचे चार दिशांना असलेले वेगवेगळे गट आपल्याच गाण्यावर धुंद होवून सत्तेचा आनंद घेत असल्याचे आता हळुहळु समोर येवू लागले आहे.


याचा पहिला प्रत्यय गुरुवारी (ता.19) अनुभवाला आला. भाजपचे ज्येष्ठनेते राम जाजू यांच्या नेतृत्त्वाखाली माजी अध्यक्ष राजेंद्र सांगळे, दिनेश सोमाणी, भारत गवळी, जग्गु शिंदे, सुशिल शेवाळे, दिलीप रावळ, नीनाद भोर, बाबाजी लोखंडे, भरत ढोरे, पायल ताजणे, उषा कपिले, ज्योती भोर, कांचन ढोरे अशा डझनभर भाजप कार्यकर्त्यांनी स्वतंत्रपणे प्रांताधिकारी शैलेश हिंगे यांची भेट घेत ‘ईव्हीएम’वरुन सध्या सुरु असलेल्या आंदोलनाकडे त्यांचे लक्ष वेधण्यासाठी निवेदन दिले. या निवेदनात निवडणूक प्रक्रिया आणि राज्यातील जनतेने दिलेले बहुमत यावर भाष्य करण्यात आले असून राज्यातील निकालांसह झारखंड विधानसभा, नांदेड लोकसभा यांचे दाखले देत सर्वोच्च न्यायालयाने केलेली टिपण्णीही नमूद करण्यात आली आहे.


वास्तविक या निवेदनामागील हेतू काय? याचा कोणताही उल्लेख संपूर्ण निवेदनात कोठेही आढळून आलेला नाही. एकंदरीत प्रांताधिकार्‍यांच्या नावाने दिलेल्या या निवेदनावरुन जणू प्रांताधिकार्‍यांनीच ईव्हीएमवर शंका घेतली आहे आणि भाजपचे स्थानिक माजी पदाधिकारी त्यांना वृत्तवाहिन्यांवरील बातम्या पाहुन लिखित उत्तर देत आहेत असाच हा प्रकार दिसून आला. सोशल माध्यमातून ईव्हीएम हॅक होते किंवा त्यात छेडछाड करता येते असा गैरसमज पसरवला जात असल्याचे सांगताना तसे करणार्‍यांवर कारवाई करावी अशी मागणी मात्र कोठेही दिसून आली नाही. यावरुन आगामी निवडणुकात स्वतःचे महत्त्व निर्माण करण्यासाठी भाजपमधील अंतर्गत गटबाजी पुन्हा उफाळू लागल्याचेच स्पष्ट होत आहे.


उपविभागीय दंडाधिकार्‍यांना केंद्र आणि राज्यात सलग तिसर्‍यांदा सत्ता उपभोगणार्‍या भाजपकडून देण्यात आलेले निवेदनही टायपीस्टकडून मोठ्या अक्षरात ‘भारतीय जनता पक्ष, संगमनेर’ असे लिहिलेल्या कागदावर ईव्हीएमवरुन देशात सुरु असलेली चर्चा लिहिण्यात आली होती. खरेतर, भाजपचे शहर आणि तालुका अध्यक्ष सहज उपलब्ध असतात. त्याशिवाय पक्षाने अधिकृतपणे जाहीर केलेले अन्य पदाधिकारीही स्थानिक पातळीवर लगेच उपलब्ध होतात. मात्र असे असतानांही त्यांना पाठ दाखवून परस्पर आपल्या कार्यकाळातील सहकार्‍यांना सोबत घेत गटांची स्थापना सगळ्याच राजकीय पक्षांसाठी धोक्याची असून संगमनेर भाजपला मात्र त्याची लागण झाल्याचे चित्र दिसत आहे.


गेल्या दहा वर्षांचा विचार करता केंद्र आणि राज्यात सत्ता असूनही संगमनेरात भाजपची वाढ झाल्याचे दिसून येत नाही. या कालावधीत संघटनात्मक पातळीवर खांदेपालटही घडले, मात्र त्यात थोपलेल्या पदाधिकार्‍यांचाच अधिक भरणा दिसून आला. परिणाम तेच ते चेहरे पाहुन पक्षात येणार्‍यांचा ओघ आटला. मात्र त्याचे सोयरसुतक नसल्यागत माजी झालेल्यांनी आपापले गट स्थापन केल्याने मुठभर असलेल्या स्थानिक भाजपमध्ये अनेक गट निर्माण झाले आहेत. स्थानिक संघटनेची पुनर्रचना करताना वरिष्ठांना या गोष्टींचा गांभीर्याने विचार करावा लागणार आहे. अन्यथा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये त्याचा फटका बसण्याची शक्यताही नाकारता येणार नाही.

Visits: 112 Today: 1 Total: 313013

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *