फरार आरोपी अक्षय कुलथेच्या उत्तर प्रदेशातून आवळल्या मुसक्या.. पत्रकार दातीर खून प्रकरण; पोलीस उपाधीक्षक संदीप मिटकेंसह पथकावर कौतुकाचा वर्षाव
नायक वृत्तसेवा, राहुरी
येथील पत्रकार रोहिदास दातीर खून प्रकरणातील फरार आरोपी अक्षय कुलथे याच्या उत्तर प्रदेशमधून मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. सदर धडाकेबाज कारवाईबद्दल पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांच्यासह पथकावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
पत्रकार रोहिदास दातीर हे आपल्या घरी परतत असताना मल्हारवाडी रस्त्याने अचानक आलेल्या एका पांढर्या रंगाच्या स्कॉर्पिओतील काही इसमांनी पत्रकार दातीर यांना बळजबरीने स्कॉर्पिओत बसवून त्यांचे अपहरण करून जीवे ठार मारले होते. यावरुन राहुरी पोलिसांत गुन्हा नोंद क्रमांक 286/2021 भादंवि कलम 363, 341 वाढीव कलम 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी करून आरोपी लाला उर्फ विक्रम अर्जुन माळी (वय 25, रा.जुने बस स्थानकजवळ एकलव्य वसाहत, राहुरी) व तोफिक मुक्तार शेख (वय 21, रा.राहुरी फॅक्टरी) या दोन आरोपींना अटक करण्यात आली होती. यानंतर हा तपास पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांचेकडे वर्ग होताच गुन्ह्यातील मुख्य आरोपी कान्हू गंगाराम मोरे (वय 46) यास नगर-औरंगाबाद रस्त्यावरील त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान समोरील हॉटेल गुरुदत्त येथून अटक केली होती. परंतु अक्षय कुलथे हा फरार होता.
दरम्यान, उपाधीक्षक मिटके यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपी अक्षय कुलथे यास उत्तर प्रदेशमधील चटिया (ता.बीनंदनकी, जि.फतेहपूर) येथून शिताफीने अटक करून जिल्हा व सत्र न्यायालय फतेहपूर यांच्या समक्ष हजर केले असता 72 तासांची ट्रांझिट रिमांड कस्टडी देण्यात आली आहे. यापूर्वी आरोपी कुलथे याच्यावर राहुरी, राहाता व कोपरगाव पोलिसांत विविध गुन्हे दाखल आहेत.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षिका डॉ.दीपाली काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ, उपनिरीक्षक शेळके, नीलेशकुमार वाघ, नीरज बोकील, मधुकर शिंदे, सहा.उपनिरीक्षक राजेंद्र अरोळे, मुख्य हवालदार सुरेश औटी, पोलीस नाईक फुरकान शेख, शिवाजी खरात, पोलीस शिपाई रवींद्र मेढे, विकास गुंजाळ, सुनील शिंदे, नितीन शिरसाठ, आजिनाथ पाखरे आदिंनी केली आहे. याबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.